सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

कधी भेटेन (घेई उचलूनी)

घेई उचलूनी
*********
कधी भेटशीन मज बोलावून
समाधी सोडून ज्ञानदेवा ॥१

कधी मी पाहिन डोळे हे भरून 
निवृत्ती सोपान मुक्ताबाई ॥२

कधी रे कळेन गुह्यतम ज्ञान 
ठेविले पेरून ग्रंथांतरी ॥३

एवढीच आस घेऊन मनात 
तुझिया दारात आलो देवा ॥४

याहून आणिक नाही रे मागणे 
अशक्य ना देणे तुज काही ॥५

चातकाच्या चोची थेंबूटा आषाढ 
तैसा जीवनात माझ्या येई  ॥६

विक्रांत हा दास तुझ्या पायरीचा
जोहार दारीचा हाका देई ॥७

फिरे जन्मोजन्मी मायेत भुलला
घेई एक वेळा उचलूनी   ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

मोरया

मोरया
*****

तुझ्या कृपेची सावली 
मज मिळाली मोरया
पदापदावरी शांती 
मज वरे देवराया

काम विघ्नांचे रे इथे 
सदा संकटे आणणे
दीना गांजणे छळणे 
सैरावैरा पळवणे

होता दास तुझा देवा 
गेले दुःख ते पळून
झाले जगणे चांदणे 
गेलो सुखाने भरून 

अगा जगी तम नाही 
ऐसे कधी झाले नाही 
तुझे अधिष्ठान होता 
दिव्य दिशा झाल्या दाही 

मिळो मायेची पाखर 
अन्य काही नको देवा 
सदा रहा तू जीवनी 
नित्य घडू दे रे सेवा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

थेंब

थेंब
*****
उघडून बाहू उभे सागरात
इवले शिंपले स्वाती नक्षत्रात 

पडूनिया थेंब कुणाच्या मुखात 
फळेल हे भाग्य मोतीया रंगात 

तया ठाव असे कृपेचे इंगित 
केवळ प्रार्थना तयाच्या हातात 

उलटून स्वाती जाते संवत्सर
माहीत तयाला थांबणे तोवर 

तीच परिक्रमा त्याच पथावर 
कधी ओघळेल कृपा देहावर 

पसरून बाहू आपल्या मनाचे 
गात असे गाणे विक्रांत दत्ताचे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

डॉ .हेमा साळवे ( निवृत्ती दिना निमित्त )

डॉ .हेमा साळवे ( निवृत्ती दिना निमित्त )
************
फार कमी लोक असतात 
ज्यांना ठाऊक असते कि
 त्यांना कसे जगायचे ते 
जीवनाच्या हिंदोळ्यावर होऊन स्वार 
येणाऱ्या सुखद वाऱ्याचा 
झोत झेलत चेहऱ्यावर 
पोटात उठणाऱ्या श्वास रोधक 
गोळ्याचा अनुभवत थरार 
कधी उंच उंच फांदीला स्पर्श करत 
कधी मातीवर पायाला हलकेच घासत 
तशी मला डॉक्टर हेमा साळवे वाटते

झोपाळ्यावर करावा लागतो बॅलन्स
सावरावा लागतो स्वतःचा 
अन झोपाळ्याचा तोल 
तसा संसार आणि नोकरीचा तोल सावरत 
सुख टीपत पाखरांना सांभाळत 
भिंतींना सावरत आकाशात भरारत
जगणाऱ्या मुंबईतील लाखो भगिनींचे
ती मूर्तीमंत प्रतीक आहे .

हे सारे जीवन तिने 
आनंदाने साजरे करत जगले 
येणाऱ्या साऱ्या प्रसंगांना 
डोळे उघडे ठेवून सामोरे जात पाहिले 
कदाचित ते तिला तिच्या स्वभावातील 
 संवेदनशीलता मोकळेपणा निर्भीडपणा स्पष्टवक्तेपणा त्यामुळे तिला सहज जमले 

दुःखाचे डोह शोधून 
त्यात मन गुंतवून बसणे 
अन गंभीरतेच्या अवकाशात 
जगण्याचे कारण शोधणे 
हे तिने कधी केले असेल 
असे मला वाटत नाही 
ती मैत्रीचे झरे जवळ करत 
खळखळणाऱ्या प्रवाहात 
स्वतःला झोकून देणारी
त्यात नर्तन करणारी 
निर्मळ प्रसन्न जलपरी आहे 
असेच मला सदैव वाटते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

कुंभमेळा व बळी

कुंभमेळा व  बळी
*****************
कुठलाही धर्म कुठलेही कर्मकांड 
जीवाहून मोठे नसते.
पण नीट पाहिले तर कळते 
प्रत्येक श्रध्दा ही अंध श्रद्धाच असते.
ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे 
संस्कारा प्रमाणे ती आकार घेते.
ज्या श्रध्देने देश धर्म समाज 
आणि व्यक्तीचे अहित होते 
ती त्यागणे श्रेयस्करच.
हे एक सत्य आहे की 
इथे व्यवस्थापन अपुरे पडले.
पण कोट्यवधी लोकांना सांभाळणे 
तेवढे सोपे नसते
प्रत्येक यात्रेत जत्रेत 
अफाट गर्दी होत असते
त्यात मध्ये चेंगराचेंगरी 
होण्याची शक्यता असते
जिवलग हरवण्याची शक्यता असते .
तरीसुद्धा या जत्रांची गर्दी कमी होत नाही 
याचे काय कारण एकच असते
देहामनापर नेणारे क्षितिज 
त्यांना तिथे खुणावत असते .
अस्तित्वाचे नग्न सत्य भूल घालत असते.
त्यांच्यासाठी ते स्वप्न 
जीवावर उदार व्हावे एवढे अफाट असते.
चेंगराचेंगरी मध्ये मरण तर कुठेही येत असते 
ते दादरच्या परळच्या पुलावर येत असते 
आणि कुंभमेळ्यातही येत असते 
पण ते शेवटी एका अपघाताचे फलित असते 
तिथे श्रद्धा अंधश्रद्धचे नाते नसते.
🌾🌾🌾
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

बुधवार, २९ जानेवारी, २०२५

कारण

 कारण
*******
प्रीतीच्या कवणा प्रीतीचा अंकुर 
फुटल्या विना न येतो रे बहर ॥

अन्यथा विझतो हरेक निखारा 
राखेचा आणिक उरतो ढिगारा ॥

भक्तीच्या कवणा भावना तरंग 
मिळताच येती भक्तीला रे रंग ॥

अन्यथा पाखंड कोरडा वेदांत 
जीवना वाचून वठलेले झाड ॥

शौर्याच्या कवणा देशाभिमान 
यावच लागतो मनात दाटून ॥

अन्यथा निरस पगारी कविता 
जन्मास येते रे नसलेला आत्मा ॥

विक्रांत जगणे जीवना कारण 
कळल्या वाचून अवघे सरण ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

किती वेळा

किती वेळा
********
किती वेळा तुझ्या दारी पुन्हा पुन्हा मी रे यावे 
एकदाही तुज का रे न वाटे मज भेटावे ? ॥१

काय करू हृदय हे तुझ्या पदी अंथरले 
बजावते मन किती परी तया ठोकरले ॥२

याद तुझी आली नाही दिस असा गेला नाही 
मोह माझा घनीभूत तुला सोडवत नाही ॥३

सारे काही सोडूनिया जाईल मी देशोधडी 
तुझी स्मृती ठेवीन रे करूनिया खोल घडी ॥४

येऊ नये तुझ्याकडे पाहू नये तुझ्याकडे 
गोळा पुन्हा करू नये काळजाचे हे तुकडे ॥५

ठरविले लाख वेळा जमले न एक वेळा 
धाव घेती तुझ्याकडे प्राण डोळा होत गोळा ॥६

एक वेळ यावयाला तुज काय धाड पडे ?
जळतो मी अंतरात अन् तुझा खेळ घडे ॥७

जाळूनिया छळुनिया काय सुखी होशील तू 
दुर्लक्षून मज असे मजेत का राहशील तू ? ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...