बुधवार, २२ जानेवारी, २०२५

पाटी

पाटी
*****
तुझ्यासाठी लिहलेली दत्तात्रेया तुझी गाणी 
सांभाळली हरवली कुठे कधी नेली कुणी 

तुझ्यासाठी तुझे गाणे उतरले माझ्या मनी 
मोठेपण काय त्यात सारे गेलो विसरूनी

भक्ती माझी वाढली का जरी मज ठाव नाही 
कवितेत ओघळले  तेही माझे नाव नाही 

जयासाठी शब्द होते तया हृदयात गेले 
हेलकरी भारवाही चाकरीचे काम झाले 

शिजेल मी आणलेले येईल प्रसाद हाती
तोवरी रे माथ्यावरी सुखे वाहायची पाटी 

तुझे शब्द तुझ्यासाठी तुज भजण्याची युक्ती 
उतरून अलगद येऊ देत सदा ओठी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

प्रवेश

प्रवेश
*****

माझिया माहेरा मज ना प्रवेश 
दारी गणवेश राजमान्य ॥

जारे जारे मागे कमानी दारात 
उभा राहा रांगेत गपचूप ॥

तिथे चढाओढ चाले रेटारेटी 
विसन्नेली भक्ती काठोकाठ ॥

दिसे व्हिडिओत एकेका गचांडी
भक्तही बापुडी आनंदात ॥

अगा ज्ञानदेवा भक्तीची ही रीती
 मज ना कळती काही केल्या ॥

नको रे कार्तिकी पुन्हा बोलावूस 
उगा सतावूस गर्दीमध्ये ॥

विक्रांत तुझ्यात राहू दे झिंगला 
वाट विसरला बाजाराची ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

सोमवार, २० जानेवारी, २०२५

ती वाट

ती वाट
*******
ती वाट तुझ्याकडे येणारी रोज खुणावते मला 
ते वळण जीवघेणे  रोज टाळावे लागते मला 

तुझ्या डोळ्यात स्वागत असेलच असे नाही 
माझे बोलणे  पूर्वी गत होईलच असे नाही 

सुखदुःखात आपण वाटेकरी ही होणार नाही 
मनी लाख ठरवून क्षितिज हाती लागणार नाही 

संकटात कुण्या एकमेकां आपण दिसणार नाही 
समांतर हे जग आपले भेट तशीही होणार नाही 

छाया टाळून  वृक्ष जातोच ना उन्हाच्या दिशेला 
जगणे वाढणे स्थिरावणे हेच तर हवे जीवनाला 

तरीही ते वळण वाकडे का पाऊलांना जड करते 
आणि ती वाट पाहून मन उगाचच कासावीस होते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

रविवार, १९ जानेवारी, २०२५

कृपामेघ

कृपामेघ
*******
कधी बरसून माझिया मनात 
आषाढागत येशील दत्ता ॥

कृपेचे मेघुटे येई रे होऊन 
सावली घेऊन जीवनात ॥

अतृप्तीचा व्रण खोल रितेपण 
जावू दे भरून कृपा जले  ॥

एकाच थेंबाला तृषार्त चातक
पुरवी रे भाक दीनानाथ ॥ 

प्रार्थने वाचून काही न हातात
जाणतो विक्रांत शरणागत ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

भक्ती

भक्ती
*****

दत्तात्रेया माझा त्याग करू नकोस कधीही 
सोवळे न माने मी राग धरू नकोस तरीही ॥

दत्ता तुझ्या त्या चार रेषा नाही मला पटत 
अन स्त्रीधर्म प्रकरण नाहीच दयाळा पचत ॥

सारे जग हे आहे ना तुझीच प्रभू काया 
निराकारा मग कुणी भेदले सांग रे वाया ॥

भेदभाव व्यर्थ आहे  जाती जातीत पडले 
आत्मतत्व चोखट ते रे कणाकणात भरले ॥

या हवे तर जन्माला दावा अन नवी कथा 
वठल्या झाडा तोडुनी नवा धर्म द्या जगता ॥

जळू देत सारी व्यर्थ कर्मकांड अडगळ 
शुद्ध धर्म विज्ञानाचा इथे नांदू दे केवळ ॥

जाणण्याचे  वेड जयाला तोच असे रे भक्त 
मिटो भेदाभेद सारे दिसो माणसात भगवंत ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

निंदेचे पातक




निंदेचे पातक 
**
इथल्या वनात विष अमृताचे 
वृक्ष जीवनाचे जागोजाग .1

जया हवे जे ते मिळते त्वरित 
इथली रे रीत हीच आहे 2

काटे पाहणाऱ्या  मिळतात काटे 
आणि फळ गाठे फळकांक्षी .3

त्रिगुणी संसार सत्व रज तम 
गुणाचे हे काम कळो यावे .4

निंदेचे पातक नका घेवू माथी 
पुण्याची ती माती येणे गुणे 5

जाण रे सुजाना हित तू आपले 
धोंडे का फेकले मलमुत्री 6 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

संतांचे दर्शन

संतांचे दर्शन
**********

संतांचे दर्शन संताचीच कृपा 
बाकी अर्थ नसे काही खटाटोपा 

संत बोलावती तेव्हा घडे जाणे
अन्यथा घडते नित्याचे जगणे 

कुणा घडे रोज कुणाला क्वचित 
भाग्य वा प्रारब्ध तयात खचित 

आपल्या हातात असते भजने 
त्यांनी जे दिले ते तसे जगणे 

तया चैतन्याचा दिवा हृदयात 
विक्रांत निवांत ठेवतो तेवत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...