बुधवार, १ जानेवारी, २०२५

डॉ संजय चोगले

डॉक्टर संजय चोगले
****************
जीवनात अनेक मित्र भेटतात 
काही टिकतात काही हरवतात .
काही विसरले जातात 
काळोखात अन काळाच्या ओघात 
खरच मैत्री रुजवणे जोपासणे टिकवणे
हे तेवढे सोपे नसते 
त्या पाठीमागे लागते उदार मन 
मोकळेपण आत्मीयता प्रेम आणि हळुवारपण 
दुसऱ्यासाठी कष्ट उचलण्याची तयारी 
आणि उणीवा पोटात घेण्याची वृत्ती 
हे सगळे डॉक्टर संजय चोगले यांच्यात आहे 
म्हणून तो मैत्रीचा महामेरू आहे 

असे नाही की त्याच्या आयुष्यात 
सारे काही आलबेल होते 
दारात प्राजक्ताचे सडे पडत होते 
आणि छतावर मोर नाचत होते 
संकटे दुःख यातना त्याच्याही वाट्याला आल्या 
इतर कुणापेक्षा काकणवर जास्त आल्या 
पण त्यामुळे आली नाही त्याच्या जीवनात 
कुठलीही कटूता उद्दीग्नता निराशा  
 सदैव चैतन्याचे उत्साहाचे आशेने 
भरलेला तो अश्वस्थ वृक्ष आहे ..
ज्याचे अस्तित्व असते 
जीवनाच्या प्रत्येक झुळकीला प्रतिसाद देत 
लहान सहान आनंदाने डोलत 
मॅगीच्या डिश पासून मेडिसिनच्या पुस्तकापर्यंत 
गप्पांच्या फडापासून कोरकाच्या संगीतापर्यंत 
जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी आनंद शोधला 

रुग्ण आणि रुग्णसेवा हा त्याचा 
सर्वात आवडता छंद सर्वात आवडती गोष्ट 
प्रत्येक रुग्णासाठी धावून जाणे 
त्याला मदत करणे आणि त्याला बरे करणे 
यात जे सुख असते 
ते खऱ्याखुऱ्या डॉक्टरलाच कळते 
त्या अर्थाने तो परिपूर्ण डॉक्टर आहे 

आपल्याला काय आवडते हे समजणे 
आणि त्याप्रमाणे वागायचे ठरवणे
त्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि दूरदृष्टी लागते म्हणूनच आलेले प्रमोशन नाकारून 
डीएचएची पदविका घेऊन ही 
येणाऱ्या अधिकारी खुर्चीला दूर ठेवून 
तो राहीला मस्त  त्याच्या जगातच 
त्याचा तो निर्णय किती अचूक आहे 
हे कळते आम्हाला स्वीकारून प्रमोशन 
करताना ऍडमिनिस्ट्रेशन ..

कर्म हा संजयचा धर्म आहे आणि 
सत्कर्म करणे हा त्याचा पिंड आहे
चांगल्याची आवड प्रेम आत्मीयता त्याला आहे 
त्यामुळे त्याच्या कळत नकळतही 
तो गुणराशी झाला आहे 
सेवा हा त्याचा स्वभाव आहे 
त्यामुळे तो तपो राशी झाला आहे 
असे मित्र भाग्यानेच मिळतात 
आणि मला तो भेटला आहे 
हे माझे अहोभाग्य !
निवृत्ती दिनानिमित्त त्याला आभाळभर शुभेच्छा !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

दत्त देव

दत्त देणे
******"
गुरु माझा दत्त प्रभू माझा दत्त 
आत्मदेव दत्त सर्वव्यापी ॥

पथी त्याच्या चालू जन्म सदोदित
जडो माझे चित्त तया पायी ॥

तया विन काही नुरे जगी पाही 
भरुनिया राही  तोच सारे ॥

त्याच्यासाठी घडो अगा सारे जिणे
तया विन जिणे जन्म नको ॥

अहंकार हा मरता शून्यवत होता 
दत्त येतो हाता म्हणतात ॥

परी ते ही असे दत्ताचीच देणे 
कृपेचे हे लेणे मिळो मज ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

घेई सोबत

घेई सोबती
********
कंटाळून जगताला 
म्हणे विक्रांत दत्ताला 
का हो टाकले मजला 
ऐश्या या भोगवट्याला 

तुम्ही घेतले ते छान 
एक कौपीन ओढून 
आणि संसार चिंध्यांचा 
मजला दिला बांधून 

बरी ठेवली सोबती 
चार श्वानांची संगत 
आणि ठेवले मजला 
या जगताशी भांडत 

करी कौतुक भिक्षेचे
स्कंधी झोळीस बांधून 
पण मज गुंतविले 
गळा बांधून दावण 

काय देवा सांगा दीना 
ठकविणे बरे असे
घेई सोबती मजला 
अन्य मागणे ते नसे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

तन्वीस

तन्वीस
******
सुखे सारी तुजसाठी
यावी आकाश होऊन 
निळी कुसुंबी सोनेरी 
सहा ऋतूत सजून 

कधी सावळ्या मेघांनी 
तुज घ्यावे लपेटून 
ओल सौख्याची मृदुल
तुज जावी भिजवून 

कधी शरद किरणे 
तू गं घ्यावीत ओढून 
तुझ्या हास्यात चंदेरी 
जग जावे उजळून 

शुभ्र अभ्रांचा पसारा 
तुझ्या पदाला विसावा 
तुझ्या पाऊला कधी 
स्पर्श काट्यांचा न व्हावा 

लाखो तारकांनी तुज 
घेण्या आर्जव करावी 
तुझ्या प्रेमाने भरून 
आकाशगंगा वहावी 

नाती निर्मळ प्रेमळ
तुझी सजावी धजावी 
तुझ्या कोमल करांनी 
धरा मिठीत तू घ्यावी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

आधार

आधार
********

भिजल्या प्रश्नास कोरडे उत्तर 
ते ही बरोबर हवे कुणा ॥

रुजलेले बीज शुष्क माळावर 
किती जगणार कोणा कळे ॥

थकलेला देह यशाच्या शिखरी
वयाच्या उतारी किती काळ ॥

रोज नवी दिशा वाट नवी फुटे 
सरती संकटे काय कधी ॥

उतारी वाहतो प्रवाह पतित 
चाले हुडकीत सुख कुठे ॥

अवघे बुडती प्रश्नांच्या भोवरी 
शोधती आधारी सत्य काही ॥

घडो पुरुषार्थ जन्म जगण्याचा 
अर्थ कळण्याचा खुंटलेला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

ओझे

ओझे
****
वाहिले रे ओझे 
दिलेस तू दत्ता 
वाहवेना आता 
पुरे झाले ॥१

तुझे तूच सारे
घेई रे परत 
मज भगवंत
ठेव पायी ॥२

हिंडलो बहुत 
उबले जीवित
तुझिया मिठीत
पडो देह ॥३

इथे काही अर्थ
दिसेना मजला 
निरर्थ चालला 
प्रवास हा ॥४

दत्ता दयाघना
येई रे धावून 
जाई रे घेऊन 
मजलागी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

अलख

अलख
******
जन्म असा ओढाओढ 
पायावरी आले फोड 
तर मग काय झाले 
दत्त वैद्य सवे गोड ॥१

मळलेल्या जीवनाचे 
ओझे तेच वाहायचे  
परी मनी घंटा वाजे 
धूप गंध गाणं गाजे ॥२

प्रारब्धाची काठी पाठी
उकळते शब्द ओठी 
परी मनी स्वप्न सजे 
दत्त धन दिसे गाठी ॥३

कोण ओढे कुणास ते 
चालणारा चाले वाटे
ज्योत निरंजन पुढे
अलख पुकार दाटे  ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.blogspot 
☘☘☘☘ 🕉️ .

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...