सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

बळ

बळ
*****

इथे पाप वाहण्याचे काय कुणा बळ आहे 
सभोवती भक्त गोळा दक्षिणा बख्खळ आहे

घुमतात कोणी इथे पिसाटल्या झाडागत 
जिरवला घाम देही तेवढीच ओल आहे 

घडो पूजा अर्चा कुण्या सजविल्या मंदिरात 
अंतरात जाळ माझ्या प्रारब्ध कंगाल आहे 

म्हणोत विक्रांत कुणी वाया गेला पार आहे 
दत्ता तुझ्या पायाखाली माझे रे जिव्हार आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

सखा गिरनारी

सखा गिरनारी 
***********

माझा जिवलग सखा गिरनारी 
हृदया माझारी नित्य वसो ॥१

बहु भाग्यवान आलो तया दारी
पुन्हा या संसारी पडू नये ॥२

जगावया देह घडो काही काज  
कानी पडो गाज दिगंबर ॥३

मग मी दातारा उलट प्रवासी 
वाचून सायासी जाईल रे ॥४

विक्रांता जगती दत्त पायावरी
राहो जन्मभरी मागणे हे  ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

दत्ताने म्हटले

दत्ताने म्हटले 
*********
दत्ताने म्हटले माझा मज जेव्हा 
मिळवाया तेव्हा नुरे काही ॥१

उघडले डोळे सरला अंधार 
मनाची चुकार धाव कळे ॥२

तोच नाभिकर दाटे कणोकणी 
घडे क्षणोक्षणी याद त्याची ॥३

अहो स्वामी राय असे माझी माय
आता मागू काय कोणास मी ॥४

विक्रांत जगणे दत्ता विना उणे 
आले हातीवणे  चिद् रत्न ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

साधन

साधन
*****
श्वासाची या लय पाहू पाहू जाता 
बिघडतो सांधा त्याचा तोही ॥१

 मनाचा प्रवाह जुन्या बाजारात 
स्वप्नाच्या गावात उधळतो ॥२

नामाचे साधन शब्दाचा आधार 
यंत्र गरगर फिरतसे ॥३

शक्तीचा जागर गुरुचा आधार 
भाग्याचा प्रकार दिसतो ना ॥४

गूढ व्यवहार प्रकाश प्रवास 
ज्याचा असे त्यास चालण्याचा ॥५

कोणा काय भेटे ज्याचे त्यास ठाव 
दत्त असे भाव विक्रांतचा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .
 

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

लक्ष्मण रेखा

लक्ष्मण रेखा
**********
बरे झाले खेचली तू  एक रेखा लक्ष्मणाची
इथे कुणा ठाव दुनिया राम का रावणाची

तूच रेखा तूच सीता एकटीच या काननी 
स्मित सारे बोलावती संभावित चेहऱ्यांनी 

देह ओलांडून जाते मैत्र क्वचित लाभते 
असे दिसे जगतात सत्य आजही टोचते 

साधू कोण कोण लूच्चा काळ वेळ ठरवते 
मग परीक्षा का हवी अग्नी प्राशन व्यर्थ ते 

तुझी रेषा तुला ठाव दुनियेला नित्य दाव 
तुच तुझे शिवधनु उचलण्या न कुणा वाव

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, ८ डिसेंबर, २०२४

दत्त कृपेनी

दत्त कृपेनी
********
माझ्या असण्याचे भान जगण्याचे 
सार जाणिवेचे दिसू दे रे ॥

संत वचनात सत्य निर्देशित 
उरात किंचित स्फुरु देरे ॥

मनास कळावे स्वरूप आपले 
धूके दाटलेले विरू दे रे ॥

ज्ञानी सदोहर भेटतात आप्त 
दावतात वाट कळू दे रे ॥

श्री दत्त दिसूनी हर्षित होवूनी
मजला कृपेनी भरू दे रे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

स्वप्न चिंतन

स्वप्न चिंतन
*******
निजल्यावर
डोळ्यासमोर उमटणारी
कुठल्याही शेंडा बुडखा नसलेली 
 चित्र म्हणजे  स्वप्न नसतात
प्रसंग व्यक्ती विचार स्मृती
यांचा हा असंगत प्रवाह 
म्हणजे स्वप्न नसतात
तर खरी स्वप्न 
ही जागेपणीच पडतात.

अर्थात जागेपणी पाहिलेली 
 सारी स्वप्न काही पूरी होत नसतात 
जीवनाला जगण्याला सीमा असतात 
स्वप्नांना त्या कधीच नसतात.
कुणी या स्वप्नांना ध्येय म्हणतात 
कोणी या स्वप्नांना कर्तव्य म्हणतात 
कोणी या स्वप्नांना दिवास्वप्न ही म्हणतात

महापुरुषांची स्वप्न ही महान असतात अग्निदव्यातून जाणारी
तापून निवलेल्या सुवर्ण सारखी 
लखलखीत असतात

सामान्य माणसाची 
स्वप्नही सामान्यच असतात 
चार भिंतीत मावणारी
चार माणसांचे सुख पाहणारी
पण निर्मळ प्रेमळ असतात 

तशी स्वप्न तर मलाही पडतात 
कधी पूर्ण होतात कधी अपूर्ण राहतात 
पण माझे स्वप्न कधीच वाया जात नाहीत
कारण साऱ्याच माझ्या स्वप्नांच्या 
कविता होतात 

उतरताच स्वप्न सत्यात
साऱ्या सुख संवेदनांना टिपून 
अलगद कागदावर उमटवतात
कधी मनातले दुःख
ओघळत कागदावर 
आतल्या दुःखाचा निचरा करतात 
हलकेच गोंजारत मनाला 
शांत निवांत करतात 
तर कधी केव्हाही पूर्ण न होणारे 
स्वप्न शब्दात भोगवत 
विषादाची काहीली दूर करतात 

ही स्वप्न जागेपणातील 
कधी कधी जागेपणालाही भिववतात
उंच ताशीव कड्यावर आणून सोडतात 
कोणी कधी तिथून पडतात पाय घसरून 
तर कोणी कधी देतात तिथून स्वतःला झोकून

स्वप्न जगवतात स्वप्न मारतात 
स्वप्न हसवतात स्वप्न रडवतात 
पण तरीही सारे स्वप्न पाहतात 
स्वप्ना वाचून जगण्याला 
खरंच काहीच अर्थ नसतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे kavitesathikavita. .
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...