शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

दास


दास
****
हीन दीन दत्ता तुझा मी रे दास 
घेई हृदयास मजलागी ॥

नाही पुण्य गाठी नाही सेवा काही 
तूच तुझा देई बोध मज ॥

 जाणतो अजून बहु चालायचे 
तुज भेटायचे तप थोर ॥

चालतो पांगळा पाहतो आंधळा 
येता तुझ्या दारा दया घना ॥

म्हणुनिया माझ्या मनी काही धीर 
होऊ दे उशीर मर्जी तुझी ॥

तुझ्या पालखीचा असे मी रे भोई 
करूनिया घेई सेवा रुजू ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

मृगजळ


मृगजळ
*****

मृगजळा मागे धावणारे मन 
असते कारण मरणाला ॥१

असून बरड दृश्य भासमान 
थांबते न मन काही केल्या ॥२

आशेची सावली सुखाची तहान 
वाहते जीवन रात्रंदिन ॥३

वळो कृपाकर मेघ दिनावर 
तृष्णेची लहर मिटावया ॥४

एकला हा जीव अथांग हे रण 
दत्ता आठवण ठेव माझी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

डॉ.बावा


डॉक्टर बावा 
*********
जगातील सर्व टेन्शन 
ज्याच्याकडे यायला टाळत असतात
अन टरकत असतात
अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बावा

 कसे जगावे आनंदाने 
कसे राहावे शांतपणे 
अंतरामधील घोर बाहेर 
न दाखवता बिनघोरपणे 
आणि वेळ येताच भिडावे 
प्रसंगाला संकटाला  
त्याची पूर्ण टेहळणी करून  
हे युद्ध तंत्र त्याच्यात जन्मजात असावे
अन  कामाला म्हणावे तर
ते त्या कामाचे मूल्यमापन 
त्यांच्या दृष्टीने करून 
त्याला किती महत्व द्यायचे 
कुठे किती  करायचे हे ठरवत
आणि मग ठरवल्यावर
न कंटाळता  लाज न बाळगता
आपले 100% त्याला  देऊन 
ते काम ते फत्ते करीत *
किंवा सरळ त्याला 
डस्टबिन दाखवत असत .
"कुछ नही होता सर 
टेन्शन मत ले लो "
हे त्यांचे परवलीचे शब्द असत
म्हणून काम कसे करावे 
हे शिकावे बावा सरांकडून 

हा माणूस जगत मित्र 
म्हणून जन्माला आला 
असे मला नेहमी वाटते 
फक्त तुम्ही त्याच्यासारखे 
मनमोकळे स्पष्ट असायला हवे 
कद्रूपणा शूद्रपणा राजकारणीपणा
यांचा त्यांना अतिशय तिटकारा 
भांडण तंट्या पासून सदैव दूर जाणारा 
निसर्ग दत्त  सौम्यत्व असणारा 
त्यांचा स्वभाव !
डॉक्टर बावा एकदा मित्र झाला की 
आयुष्यभर मैत्री निभावणारा 
दिलदार सरळ सरदार माणूस
माणसे कशी जमवावीत 
कमवावीत आणि जवळ करावीत
हे ही त्यांच्याकडून शिकावे

तरीही व्यवहार ज्ञान हे त्यांच्यात
पूर्णपणे भरलेले आहे
त्यांना कोणीही असेच उल्लू 
बनवू शकत नव्हता 
कधी कधी मात्र ते 
आपण उल्लू बनलो 
असे सोंग घ्यायचे ते ही 
त्यांच्या फायद्याचेच असायचे

फाळणीनंतर पाकिस्तानातील 
पंजाबमधून आलेले 
बावा सरांचे वडील
त्यांचा धोरणीपणा लढाऊपणा
जिद्द मित्रता दूरदृष्टी
हे हे गुण बावा नेहमी वाखाणत
त्याचवेळी  बावामध्ये ही 
ते गुण मला दिसत

असा हा भला माणूस 
चांगला मित्र चांगला डॉक्टर 
आज निवृत होत आहे 
त्यांच्या सेवापूर्ती दिना निमित्त 
त्यांना खूप खूप शुभेच्छा !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

अभाव

अभाव
****
तिमिराची डोळे तेजाने फुटले 
म्हणता जाहले व्यर्थ शब्द ॥१

तेजाचा अभाव तिमिराचे गाव 
कळू येते राव मित्र येता ॥२

तैसे मज देवे दावीला संसार 
रोहिणीचे जळ भासमान ॥३

आता मी उगाच नांदतो सुखात 
अंतरी पहात घनशून्य ॥४

इथल्या जगाची कळे धावाधाव 
विक्रांता अभाव काठोकाठ ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

दोन जग

दोन जग
*******
कॉलेजमध्ये गेल्यावर 
मी पाहू लागलो होतो 
इंग्रजी सिनेमे मोठ्या कुतूहलाने 
न्याहाळू लागलो होतो
त्यातील पाश्चिमात्य संस्कृती 
त्यांचे मुक्त वागणे मुक्त जगणे
 मनस्वी प्रेम करणे उधळून देणे स्वतःला
सहज ओलांडत देहाची बंधने 
तसेच त्यांचा तो बेदरकारपणा 
कसलीही तमा न बाळगणे 
साऱ्या जगण्याला व्यापून राहिलेली 
एक नशा सुखाची अधिक सुखाची 
एक उर्मी भोगाची अधिक भोगाची 
ती त्यांची सुंदर शहरे ते सुंदर चेहरे 
वाटायचे स्वर्ग हाच असावा 
पण मग हळूहळू कळू लागले 
तिथल्या कथा आणि व्यथा 
भोगाच्या मागे दडलेली निराशा 
अभिलाषे मागील भिती 
रिक्तता भग्नता व्यर्थता 
जी दुःखे येथे आहेत ती तिथेही आहेत 

ती दुःख दारिद्र्यात लपेटलेली 
भुकेत अडकलेली स्वार्थात पेरलेली 
भ्रष्टाचारात गुंतलेली दुनिया
इथल्यासारखेच तिथेही आहेत 
कोपऱ्या कोपऱ्यात बसलेले 
रक्त शोषण करणारे धुर्त व्यापारी 
संधी साधू राजकारणी आणि 
रगेल घट्ट चामडीची नोकरशाही
अन काम चुकार मनोवृत्ती ही
तिथेही आहेत देवाच्या नावावर 
चालणारे व्यापार 
मजा करणारे डोनेशनच्या नावावर 
इथे फक्त दिसतो तो फक्त
अशिक्षितपणा अस्वच्छपणा 
नियम माहित असूनही भिंतीवर 
थुंकणारी बेपर्वावृत्ती 
पण माणूस तोच आहे मन तेच आहे 
देशांच्या सीमा पार करत 
सात समुद्र ओलांडून पसरलेला 
हा एक प्रचंड तुरुंग मनाचा 
तो तसाच आहे 
बदललेत ते फक्त रंग 
गजाचे भिंतीचे आणि कुलपाचे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

प्रवास

प्रवास
******
सारा प्रवास जीवाचा चाले त्याच चाकोरीत 
जन्मोजन्मी तीच रीत प्रत्येकाची तीच गत॥ १

सखेसंबंधी नातीगोती साऱ्यांनाच असतात
पण सारेच चेहरे रंगा खाली लपतात ॥२

सगळ्यांची सुख दुःख ती तशीच असतात 
वेगळाली नाव त्यांना भोग तेच असतात 

प्रेम द्वेष वैर मैत्री आल्याविना न राहते
कुणा कमी काहीतरी कुणा अधिक मिळते ॥४

चालता चालता वाटा अरुंद होत जातात 
हळू हळू जीवलग संवादही तुटतात

कधी धरलेले हात हातातील सुटतात 
येतात जातात ऋतू पहावेच लागतात ॥६

उगाच कधी कुणाशी सलगीची उर्मी होते 
प्रतिसादा वाचून ती पुन्हा तशीच निमते 

खरोखर की सारे हे खुळे भास आहेत ते 
प्रयत्न कर करूनी मुळी कळत नसते ॥८

जेव्हा आपला मुक्काम जवळ येवू लागतो
जमवल्या सामानाचा या शीण होवू लागतो

एका झटक्यात सारी ओझी टाकून द्यावीत 
 गाणी गात शून्यातली स्वप्न मिठीत घ्यावीत ॥१०
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 कवितेसाठी कविता .
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

उरणे

उरणे 
*****
या मातीच्या मंदिरात देव उतरत नाही 
वासनांचा गंध दर्प मिटता मिटत नाही ॥१

मंदिर हा शब्द फुका मनाला शोभत नाही 
खूप कमी वेळ आणि काम उरकत नाही ॥२

ध्वस्त आता करावी ही इमारत रास्त नाही 
हरवावे अवकाशी अन्य दुजी गत नाही ॥३

म्हणू देत कुणी भक्त उरला विक्रांत नाही 
उरणे नकोच आता उरण्यात दत्त नाही ॥४

घे पांघरून जाळ हा पाचोळ्यात अर्थ नाही
उब उकरडी असे आग पण त्यात नाही ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...