रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

गुरु प्रतिपदा


गुरु प्रतिपदा नमन
**********
मनासी कळेना शब्द सापडेना  
नृसिंह देवाचे गुण वर्णवेना ॥
यती वेष घेत प्रकटले दत्त 
लाडक्या भक्तांचा पुरवण्या हेत ॥
अनंत घटना महिमा अपार
ऐकता वाचता डोळा येई पूर ॥
गुरुचे सामर्थ्य दाखवती गुरु 
ग्रंथ नव्हे तो रे कृपेचा सागरू ॥
घेतल्या ओंजळी जरी एक दोन 
तहान लागून संकटा भिऊन ॥
नाभीकार तया येई शब्दातून 
इह पर लोक जातात तरून ॥
वाडीला तयाच्या जावे वारंवार 
हृदयी धरावे श्री गाणगापूर ॥
एकरूप होत तिथल्या ऊर्जेत 
चिंब चिंब व्हावे तया चैतन्यात ॥
मागणे नुरावे मागता मागता 
देह जन्म द्यावा तयाच्या रे हाता ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


माहीत आहे


माहीत आहे
**********
एकमेका वाचूनही जगू शकतो आपण 
तशी इथे अनेक कारणं जगण्याला आहे
तुलाही माहित आहे मलाही माहित आहे ॥

वर्षा ऋतू सरून गेलाय आकाश रिते आहे 
सरला वेग वादळाचा माळरान निशब्द आहे 
तुला माहित आहे मलाही माहित आहे ॥

प्रत्येक मेघ पावसाचा पाणी होत नसतो काही 
जया अंत नसतो कधी अश्या गोष्टी अनंत आहे
तुलाही माहित आहे मलाही माहित आहे ॥

आम्ही पाऊस पाहिला आहे थेंबथेंब झेलला आहे 
देह वस्त्र सुकले आता तरीही खोलवर ओलआहे 
तुलाही माहित आहे मलाही माहित आहे ॥

नवा ऋतू येईल कधी तुला मला ठाऊक नाही 
भेटशील तू नव्या जन्मी मी ही तया उत्सुक आहे 
तुलाही माहित आहे मलाही माहित आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

सरदार

सरदार
******

दरबारातून कायमचेच जाता जाता निघून 
कटू घोट अपमानाचा गेला सरदार गिळून ॥ १

खंत होती जरी न दाखवली चेहऱ्यावर 
होयबांच्या गजराला न देता मुळीच उत्तर ॥ २

शिवशक्ती साठी देऊन आपले सारे जीवन 
होता पूर्ण कृतार्थ तो यश कीर्ती स्वीकारून ॥३

आम्हा काय कुठे कळते कसे ते राजकारण 
पण ज्याने दिले इमान त्याचा व्हावा न अपमान 

संघटनेच्या उत्कर्षात त्यांनी साधला उत्कर्ष 
आणि मिळवत स्वतः यश केला मजबूत पक्ष ॥५

प्रवास होता समांतर प्रवास होता धुरंधर 
तो गड उंच उभा होता  निष्ठेचाच पायावर ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

दत्त दारी


दत्त दारी
*******
दत्ता तुझ्या दारी घडो माझी  वारी 
चैतन्य उजरी  
चित्त व्हावे ॥१
एक एक पायरी प्राणाचे उत्थान 
मनाचे उन्मन 
चक्र गती ॥२
श्वासात सोहम हृदयात दत्त 
डोळीयात आर्त 
भेटीलागी ॥३
मग घडे भेट प्राणात दिवाळी
सुखाची रांगोळी
रोमावळी ॥४
सांडू जातो प्राण परि न सांडतो
म्हणूनिया येतो 
माघारी मी ॥५
खरे तर येणे असते शरीरी 
मन तुझ्या दारी  
जडलेले ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

खोटा पैसा

खोटा पैसा
*******

बद बद बद वाजे खोटा पैसा 
दत्ता मी रे तैसा चालताहे  ॥१

जो जो पाहे मज असे नाकारत
परत फेकत दैवाकडे ॥२

तरीही गर्दीत कुण्या मिसळत 
जाई मिरवत खरेपणे ॥३

येता नजरेत संताप साहतो 
उद्दीग्न करतो घेणाऱ्याला ॥४

जो तो पाहताहे मज खपवाया 
देऊन टाकाया दुसऱ्याला ॥५

कोणी न घेतो आपला म्हणतो 
आता रे पडतो पायी तुझ्या ॥६

आता नशिबात यावा भट्टीवाला 
अस्तित्वा लागला डाग जावा ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

प्रवास

प्रवास
******
हसणे रडणे खेळणे पडणे 
भिणे भिवविणे घडे नित्य ॥१

घडते म्हणून तेही घडू द्यावे 
रंगले दिसावे तयामध्ये ॥२

झेलावे प्रारब्ध देह मनावर 
जैसे हवेवर व्यर्थ वार ॥३

देह दुःख दैन्य मनाचे मालीन्य 
भोगल्या वाचून भोगू जावे ॥४

उपसावे पाणी जैसे चाचूवेरी
 बसून सागरी किनाऱ्याला ॥५

याहून वेगळे नसते साधन
सुटण्या कारण घडे काही ॥६

विक्रांत प्रवास असे फक्त भास
कळता जीवास भ्रांती नाही ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

श्री शिवराय

॥श्री शिवराय ॥
************
तुमच्यामुळे आज राजे 
नाव माझे विक्रांत आहे 
अन देहातील रक्तातून 
हिंदुस्थान वाहत आहे ॥

तुमच्या मुळे आज राजे
 देवघर या घरात आहे 
अन् उपनिषदांचे गूढ ते
हृदयात उलगडत आहे ॥

भाग्यवान ते पूर्वज माझे 
तुम्हा स्कंधी वाहत होते 
तुंग तिकोणा दुर्ग नाव ते
स्वकुळास मिरवत होते ॥

असेल तेव्हा मीही केव्हा 
तव चरणाच्या समीप पाहे
ती गुणसूत्र पुन्हा पुन्हा नि
आजही शिवबा स्मरत आहे॥ 

पेटवली जी ठिणगी तुम्ही 
आज अखंड ज्योत आहे 
करते रक्षण आजही आमचे 
खड़ग भवानी अंतरात आहे ॥

राहील तुमचे नाव महाराज 
जोवर माणूस जगात आहे .
शील शौर्य अन आदर्शही
तुम्हामुळेच तेजाळत आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...