रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

नाटक

 नाटक
*******
तसे तर जन्माच्या नाटकात 
प्रवेश घेणे आणि जाणे 
सारे ठरलेलेच असते 
तो लेखक किंवा तो दिग्दर्शक 
त्याचे शब्द आणि त्याच्या सूचना 
त्या बर हुकूम सारे घडते 
आणि जीवन असते 
एक प्रेक्षक होऊन बसलेले 
वर्तमानात खिळून गेलेले रंगून

पण कधी कधी घडते भलतेच
कुण्या कुठल्या पात्राची
एन्ट्री किंवा एक्झिट होते अचानक 
आणि चुकते सारे गणित
आणि तो प्रेक्षक जीवन नावाचा 
जातो बावचळून 
कधीकधी प्रवेशाची वेळ टळून जाते 
आणि त्या सरदाराची राणी 
दुसऱ्या कोणाची तरी होते
तर कधी कधी प्रवेशाची जागा बदलते 
अन प्रियजन वैऱ्याची सेना होते 
सह कलाकार घेतात सांभाळून 
वेळ मारून कधी कधी नाटक जाते वठून
पण त्या चुकलेल्या नटाच्या 
मनाचा विभ्रम संपत नाही 
भलत्या वेळी भलत्या जागेत असण्याची 
किंवा जाण्याची खात्री मिटत नाही 
तरीसुद्धा ते नाटक चालू राहते 
तिसऱ्या अंकाचा पडदा पडेपर्यंत .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

शोध

शोध
****"
माझ्यावाचून माझा मी मला कसा येईल कळुनी 
रे पहिल्या पाऊलात का कुणा देव जाईल मिळूनी 

खण खण खण खोलवर ओल लागेल तोवर 
एका जागी जोर धर माती उकर रे भरभर 

खात्री नसेल नसू दे रे वेळ जाईल जाऊ दे रे
संतांच्या त्या शब्दावरती पण विश्वास राहू दे रे

नाम घे नाम घे अन् ध्यानासाठी वेळ दे 
पूजा कर भक्ती कर शुद्धीसाठी कळ घे 

वाचलेले सारे सरू दे कळलेले आत वळू दे 
व्यर्थ येथे काही नसते फक्त जीव तळमळू दे 

गादीवर लोळतवाचत देव कुणा मिळत नाही 
व्यंजनात रमता गमता देव कुणा कळत नाही 

घरदार सोडून सारे इथे नग्न व्हावे लागते  रे
नि तलवारीच्या धारेवरती चालावे ते लागते रे

तेव्हा कळते तेव्हा वळते बाकी खाज बुद्धीची रे
कुणाकुणा कधी सुटते नि खाजवता जिरून जाते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

निरोप

निरोप
******
नसूनही इथे माझे 
खरेच असणे होते 
वाचूनी वदल्या काही 
हितगुज होत होते ॥१
तसे मित्र भेटती नि 
दुरावती जगतात 
परि मैत्र सदैव ते 
उरते खोल उरात ॥२
तशीही गरज काही 
नव्हतीच भेटण्याची 
मने उघडीच होती 
सदैव तुझी नि माझी ॥३
भेटू बघ कधीतरी 
माय रेवेच्या किनारी 
मुक्कामी कुठल्या किंवा 
चालताना तीरावरी ॥४
शक्य आहे ओळखू ना 
जरी कधीच आपण 
तार नर्मदेची उरी 
जाईल ती झंकारून ॥५
बस हेच प्रयोजन 
असेल या ही भेटीचे 
ओठावरती सदैव
यावे नाव नर्मदेचे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

विसावणी

विसावणी
********
तुझिया पायीचा लेप चंदनाचा 
माझिया भाळाचा लेख झाला ॥१

सारे मिटू गेले मागे लिहलेले 
पुढे ठरवले स्पर्शे तुझ्या ॥२

उमटला ठसा तुझा अवधूता 
जन्मोजन्मी माथा मिरविला  ॥३ .

ठरविले नाव तूच घर गाव 
तुझ्या पदी जीव रुजू झाला ॥४

विक्रांत वाहणी सरली कहाणी 
होय विसावणी दारी तुझ्या ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

प्रथमेश

प्रथमेश
******
निर्गुणी उदेला देव प्रथमेश 
रुप हे विशेष घेऊनिया ॥ १

पंचतत्व मेळा जाहला रे गोळा 
जणू आले खेळा शून्यातून ॥ २

उमटला शब्द निर्वाती प्रणव 
जाहला प्रसव जगताचा ॥ ३

रूप रस गंध ठाकले सकळ
जाहवे सफळ जन्मा येणे ॥४

महासुखा आले दोंद आनंदाचे 
नाव ते नाहीचे उमटेना ॥५

पाहुनिया मूर्त कल्पना अतित 
विक्रांत चकित वेडावला ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

रविवार, २८ जानेवारी, २०२४

घरकुल

घरकुल
******
एक एक काडी आणूनी मांडला 
संसार रचला त्याने तिने ॥
होता तो करत रात्रंदिन कष्ट 
घरासाठी फक्त प्रिय त्याच्या ॥
आणि ती ठेवत हिशोब खर्चाचा 
एक एक पैशाचा नीटपणे ॥
हट्टा वाचून उडणारी पिले 
पोट जे भरले पुरे तया ॥
भरडे नेसली ठिगळ लावले 
अंग जे झाकले चिंता नाही ॥
चालले जीवन मायेच्या उबेत
सुखाच्या छायेत छान पैकी ॥
छोटेसे असते महा सुख किती 
कळे त्याची मिती आज मना ॥
अहा ते भाग्याचे रानच्या वाटेचे 
बोरी बाभळीचे धन्य झाले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

पालघर

पालघर 
******
तीच पाच बत्ती अन्
तीच मनीषा डेअरी 
परी किती वेगळी रे
दिसे दुनिया ही सारी 

ती घरे चिमुकली 
कुठे कशी हरवली
अन् घनगर्द झाडी ही 
कुणी गिळून टाकली  

तेच वसतिगृह जुने
तेच रुग्णालय पुराणे 
त्याच भिंती तेच जीने
स्नेहाचे परी मधु तराणे 

 रम्य त्या स्मृतीच्या 
खळाळत्या प्रवाहात 
अजूनही मन वाहते
नादवल्या यौवनात 

हळू हळू जग बदलते 
जुने जाते नवे येते 
नव्याखाली जुन्याचे पण
एक जिवंत गाणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️




भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...