मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

दत्त माझा


दत्त माझा
********

दत्त माझे गीत दत्त माझा मित
दत्त माझी प्रीत सर्वकाळ ॥१

दत्त आळंदीत दत्त पावसेत
दत्त नवनाथ  ठायी ठायी ॥२

दत्त स्वरूपात अवघी दैवत
मज दिसतात नटलेली ॥३

दत्त माझी भक्ती दत्त माझे ज्ञान 
कर्म आणि ध्यान दत्त झाला ॥४

प्रभाती जागृती  दिवसा दे स्थिती 
लय करी राती देव माझा ॥५

आता व्हावे लीन दत्त स्वरूपात
 लागलेली ओढ  सदोदीत ॥६

ऐसा दत्त ध्याता चैतन्यात चित्त 
झाले प्रकाशित अचानक ॥७

सुगंधी व्यापले  सारे आसमंत  
झाले रोमांचित तनमन ॥८

सगुण विरले निर्गुण मिटले 
शून्य ठाको आले घनदाट ॥९

भेटीविन भेटी दिली जगजेठी 
अंतरात दिठी वळलेली ॥१०

विक्रांत चरतो तीच रोजी रोटी 
अमृताची वाटी अंतरंगी ॥११

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

 

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

कळले


कळले
******
कळले कळले गुज उमजले
तूच उघडले तुझे द्वार ॥१

स्वरूप साजरे हृदयी सजले 
व्यापून राहिले तनमन ॥२

अवघे यत्न ते  नाट्यच होते 
मजला कळते सारे आता ॥३

आहे खोडकर प्रभु लीलाधर 
नि कर्म कठोर जसा तसा ॥४

घडले कर्म ते आम्हा न स्मरते
फळच दिसते गोड कडू ॥५

कर्मही मिटले फळही चुकले 
तुजला वाहिले चित्त जेव्हा ॥६

विक्रांत सुटला फेरा मिटला 
भक्तीत उरला येण्या जाण्या ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

अट्टाहास


अट्टाहास
*******
आमचा भक्तीचा 
जरी अट्टाहास 
राहून उदास पाहू नको ॥१
रोजचा याचक 
तुझिया दारचा 
दोन रे घासाचा भुकेला हा ॥२
आशाळभूत हे 
जरी असे मन 
प्रारब्ध वाचून काय मिळे ॥३
तुझिया नियमा
तू न बांधलेला 
म्हणूनया गोळा धाष्टर्य केले   ॥४
विक्रांत प्रवासी 
जन्ममरणाचा 
विसावा घडीचा देई दत्ता ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

प्राजक्त



प्राजक्त 
******
असंख्य मोतीया कळ्यांनी 
बहरून येते प्राजक्त राणी
अधीर वाट पहाटेची पाहत 
फुलण्याची आस ठेवत मनी

आतुरलेली प्रत्येक कळी 
स्पर्धा करत असते जिंकत 
आकाशातील चांदण्याशी
सर्वस्वाचे दान घेऊन हातात

खरखरीत पानांचे प्राक्तन
खुरटलेल्या जागेचे अंगण
साऱ्यांशी झुंजत आणि 
तरीही सारे काही स्वीकारत

असे नाही की फांदीवरून
दवाबिंदू नव्हते ओघळत
कुणी खेचलेल्या मोडलेल्या 
फांद्यांचे व्रण नव्हते दुखावत

पण हसणे फुलणे दरवळणे 
हा तिचा धर्म नव्हताच सुटत
आणि लोक त्या वाऱ्यावरती 
होती उगाचच संशय  घेत
 
सुगंध  कवेत घेण्यासाठी 
सदैव पिसा असतो वारा 
प्राजक्ताच्या अस्तित्वाला 
तोच अर्थ देत असतो खरा 

तरीही इथे जळतात कोणी 
जातात सौदर्या लाथडूनी 
काही पाने पडतात झरुनी
काही कळ्या जातात गळूनी

पण तिचे बहरणे थांबत नाही 
होणे गंधित वारा सोडत नाही
युगायुगांची ही असे कहानी
तरीही कुणाकुणा कळत नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

बाबा स्वामी


बाबा स्वामी
*********
नसे ग्रंथ प्रामाण्य
नसे शब्द प्रामाण्य 
अनुभव सिद्ध हे
गुढगम्य असे ज्ञान ॥ २

न घे शास्त्र आधार 
न दे कर्मठ आचार 
हातातून हातात ये 
अनुभूतीच साकार ॥२

वाहतात हातातूनी
मंद शितल कंपन
नि उघडले देवद्वार 
चित्तवृती हरवून ॥३

करुणचा पदर ये
आता या डोईवर 
पोळता पाय घेती
गुरुवर कडेवर ॥४

जीवीचा जिव्हाळा 
रुतला ग काळजात 
होतो चाहता कधी
खोल बुडालो प्रेमात ॥ .५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .


गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

निळाई


निळाई
*****

बरसले शब्द चांदण्यात न्हावून
बरसले शब्द आकाश होऊन
बसले शब्द हृदयात जाऊन 
मग कोरडेपणा माझे ओशाळून
गेले चैतन्यात चिंब चिंब भिजून

रुजणार बीज हे कोणत्या ऋतूत
घेणार आधार कुठल्या भूमीत
होईल वृक्ष की राहील झुडपात
जाईल नभी का सांदी कोपऱ्यात
कुणास ठाऊक काय प्राक्तनात

सुखावले तनमन आता हे काही
जावे फुटून कवच वाटते वज्रदेही
कुठली भूमी  नकळे आकाशही
प्रार्थनेत शतजन्म जाहले प्रवाही
दाटली डोळ्यात घनगर्द निळाई

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

बाबाजी

श्री गुरु बाबाजी
******
करुणासागर श्री महाअवतार 
तया माझा नमस्कार वारंवार ॥
जगदसूत्रधार मानव्या आधार 
असे चिरंजीव यती धरतीवर ॥
जो कुणी येथे असे भाग्यवंत 
तया जीवनात दिव्यता भरत ॥
जगा देती दिव्य क्रियायोग दीक्षा 
उतरून भवपार नेती स्वयं शिष्या ॥
असे किती झाले महापदास गेले 
देहासवे तत्वा सायुज्या मिळाले ॥
तया भेटण्याची असे जीवा आस
दुर्लभ परी भेटणे बहु अवधूतास ॥
तया भेटण्याची तोच करी सोय 
तया भेटण्यास अन्य ना उपाय ॥
म्हणूनिया होवून लीन शरणागत 
असे रात्रंदिवस तयाला विनवत ॥
कृपेचा तो कटाक्ष पडो मजवर 
दिसो चिदाकाश प्रभू एकवार ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...