बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

कळ

कळ
*****
दत्ता काळजाची कळ  
माझ्या मिटत नाही रे 
तुज पाहण्याची ओढ 
बघ सरत नाही रे ॥ १

जरी सरू सरू आली 
माझी मांडलेली कथा 
तुज भेटल्या वाचून 
नच मिटणार कदा ॥ २

तुझा स्पर्श जीवनाला  
सांग होणार तो कधी
सार्थकता जगण्याची
चित्ती भरणार कधी ॥ ३

आता उमटत नाही 
शब्द हरवले सारे 
घेई समजून माझे 
तूच खुळे हे इशारे ॥५

व्हावा विक्रांत निशब्द 
महा शून्यात तुझिया
उगा उठला तरंग ।
जावा जाणून विलया ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

साठी



साठी 
******
जरी साठी आली गाठी 
नाही आठी कपाळाला ॥१

कधी व्यथा पाठी पोटी 
नाही चित्ती आटाआटी ॥२

आले ऋण गेले ऋण 
हाती धन ठणठण ॥३

छान पैकी जगलो की
अहो नवकी शंका नाही ॥४

मनी गाणी मित्र जनी
शत्रु कुणी सुद्धा नाही ॥५

अन ऐक बात पक्की
वजाबाकी कुठे नाही ॥६

तर मग माझे जग
तगमग शुन्य पाही ॥७

जगण्यात सदोदीत
हा विक्रांत मस्त राही॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .


रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

ॐ कार तू

  ॐ कार तू
********

निराकारी उमटला संपूर्ण स्वयंभू आकार तू         
मिती आली जन्माला विश्वसंकल्प साकार तू

महास्फोटा आधीची अनाकलनीय उर्जा तू 
नेणिवेचा अथांग सागर जाणीवेचा गर्भ तू 

ज्ञानाची सीमा पुसली चक्रावणारा अनंत तू  
विज्ञानाची घुसळण इवली सर्वदा अस्पर्श तू 

थकली बुद्धी ठकला विचार अगणित अपार तू 
माझ्या मनी सजविलेला ज्ञानेशाचा ॐ कार तू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

सुख

ऋतुराज 
****
सुखाचा धबाबा होतसे वर्षाव 
आनंदाचा गाव
भेटी आला, ॥१
इवल्या क्षणाचे झाले महायुग
आटुनिया जग
मनी गेले ॥२
कशाला बोलणे शब्द आता उगे
स्वरूपात जागे
तुझे पण ॥३
अवघे कोंदाटे तुझेेेच असणे 
माझे हे पाहणे
मंत्रमुग्ध ॥४
फिरे मोरपीस तनमनावर
जागेपणावर
स्वप्न भास ॥५
विक्रांत धुमारे आनंद फांदीला
आला रे भेटीला
ऋतुराज ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

वरदान


वरदान
******
तू उधळलीस 
सुमने काही
माझ्यासाठी 
माझी नसूनही 

त्या गंधाने 
त्या रंगाने 
झालो बेभान 
मृगासमान 

नाभीमधला 
दडला प्राण 
श्वासात भरून
आलो उधळून 

माझे मजला
कळल्या वाचून
जणू की होवून
आनंद रान 

आता  रंग ते
आणिक गंध 
झाले आहेत 
प्राण तरंग

तुझे हात अन
दैवी वरदान 
करती शिंपण
स्पर्शामधून

अनुभूतीच्या 
आकाशातून
साक्ष देतात
साथी होवून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आरती


आरती
******
खणाणती टाळ सुर ठरलेले 
शब्द रुळलेले ओठी जरी ॥१

परि भाव नवे मनी क्षणोक्षणी 
चाले ओवाळणी आरतीची ॥२

तीच ती प्रार्थना सुखाची याचना 
मागताना मना लाज नाही ॥३

हे तो असे एक आनंदाचे गाणे 
जीवना भेटणे जीवनाने ॥४

देव भक्ता पडे देहाविन मिठी 
रेशमाच्या गाठी अंतरात ॥५

विक्रांत पेटली ज्योत अंतरात 
रोम रोमी दाट तेज फाके ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

गणेश रूप

 रूप
****
पाहता सुंदर रूप मनोहर
हर्ष अनिवार मनी दाटे ॥
लोभस साजरी मूर्ती गणेशाची 
बटू बालकाची कांतीमान ॥
शुभ्र मोत्यासम असे एकदंत 
कृपा वक्रतुंड मुखावरी ॥
निळसर शेला पीत पितांबर 
लेणी देहावर सुवर्णाची ॥
कटीसी मेखला हातात कंकण 
पायात पैंजण रुणझुण ॥
योगिया दुर्लभ भक्तासी सुलभ 
प्रेमाचे वालभ मुर्त असे ॥
रूप पाहूनिया हरपले भान 
मन झाले लीन पायी तया ॥
विक्रांत हृदयी नित्य विनायक 
पाहतो कौतुक भक्तीचे हे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...