गुरुवार, १६ मार्च, २०२३

पाझर

पाझर
******

तुझ्यासाठी जरी 
लिहितो मी गाणी 
काय तुझ्या कानी 
पडती का ?   ॥

तुज आळवतो 
प्रार्थना करतो
हाकारे घालतो 
पुन:पुन्हा ॥

पाझर फुटेना 
कातळ तुटेना 
मज तू भेटेना
काही केल्या ॥

हळूहळू हाका 
होतात रे क्षीण
ज्योत मिणमिण
विझू पाहे ॥

विक्रांत न मागे 
तव प्रेमाविन 
दत्त दयाघन
अन्य काही  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १५ मार्च, २०२३

टाइमपास

 टाइमपास
*****
ते तुझे चॅट णे
जुने नि पुराने 
आज वाटतसे 
अर्थ शून्य गाणे 

ते तुझे रुसणे 
ते तुझे हसणे 
मनातील भाव 
स्मायलीत देणे 

आज ना जिवंत 
शब्द भावना ती 
रिते खुळखुळे
जणू वाजताती

सहज हातात 
आज हे आले 
प्रांगणी खणता 
खेळणे मिळाले 

शब्दात नव्हता 
काही अर्थ जरी
विचारपूस ही 
होती वरवरी

जुळणेच होते 
कुठे कुणीतरी 
अजबसे मैत्र 
असे काहीतरी

गप्पाच फुकट 
तोंड न बघता
टाईमपासच
एक खुळा होता

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, १४ मार्च, २०२३

ज्ञानदेवा

ज्ञानदेवा
*******
शब्द प्रकाशाचे 
ज्ञानदेवा तुझे 
करी जीवनाचे 
सोनें माझ्या ॥१

तुझिया प्रज्ञेचा 
प्रकाश किरण 
हृदयी झेलून 
धन्य झालो  ॥ २

अर्थाचे रुजून 
सौंदर्य चित्तात
एकरूप त्यात
बुद्धी झाली ॥३

भ्रांतीचा काळोख 
फिटून मिटून
आनंद दाटून 
मनी येई ॥ ४

विक्रांता पदाशी
घेई गा ठेवूनी
हीच विनवणी 
वारंवार ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .
 

तुझे चित्र


तुझे चित्र
********

तुझे चित्र मनी माझ्या 
नित्य नित्य पाहतो मी 
त्याच डोही निरागस 
पुन्हा पुन्हा डुंबतो मी ॥

तेच तुझे शब्द जरी 
रोज रोज ऐकतो मी 
नवे दव नवे मोती 
ओंजळीत भरतो मी ॥

तू न जीवनात मूर्त 
पर्वा नच करतो मी 
कणकण क्षण क्षण 
व्यापून तू जाणतो मी ॥

देवू तुला काय कसे
हात रिक्त पाहतो मी 
रिक्तते सवेत मग 
तुझ्यात रिक्त होतो मी ॥

मुक्ततेचा लोभ नाही 
बद्धताच मागतो मी 
हृदयास जाळणाऱ्या
वंचनेत रंगतो मी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

रविवार, १२ मार्च, २०२३

स्वामी स्मरताच

 स्वामी स्मरताच
**************
स्वामी स्मरताच माझ्या हृदयात 
प्रेम बरसात होते सुरू ॥१
स्वामी स्मरताच माझिया मनात 
सुखं दाटतात अनामिक ॥२
स्वामी स्मरताच माझिया डोळ्यात 
मेघ भरतात आषाढाचे ॥३
स्वामी स्मरताच माझ्या सभोवत 
चैतन्याचा झोत पिंगा घाली ॥४
स्वामी स्मरताच झरे फुटतात 
कोंब फुटतात देहावरी ॥५
स्वामी स्मरताच श्वास थांबतात 
उंच उडतात प्राण पक्षी ॥६
कृपाळूवा होत इवल्या हातात 
स्वामी ओततात वर्षा ऋतु ॥७
भरलो आकंठ कृपा कौतुकात 
मागे भक्ती फक्त विक्रांत हा ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ११ मार्च, २०२३

सय

सय (उपक्रमासाठी )
**
जाणतो मी होता तुझा खेळ खुळा 
फिरलो मी दोरा बांधुनिया गळा ॥
येरे म्हणता तू धावतच आलो 
नको म्हणता तू गुमान बसलो ॥
नादान करती मोहून कामना 
वाचले जाणले घोकलेले मना ॥
परी उघडता दार त्या जगाचे 
पडली भुरळ गाणं पारध्याचे ॥
अन कुण्या दिसी हाकलून दूर 
घेतलेस पुन्हा लावून तू द्वार ॥
कितीतरी वेळ पायरी बसून 
पचवून व्यथा निघालो तिथून ॥
परी येता सय तया दिवसाची 
जळते अंतर  काहीली जीवाची ॥
भुंकण्याचे बळ नच चावण्याचे 
जगतो गुमान जिणे लाचारीचे ॥
अजूनही भीती आहे मनातही 
बोलवता तू मी घेईल धाव ही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

शुक्रवार, १० मार्च, २०२३

होळी

होळी
*****
आग पेटली पेटली ज्वाला नभामध्ये गेली 
रात्र नटली सजली ठिणग्यांनी ॥१

गंजी पेटली धडाड लाल केशरी उजेड 
झाली सजीवशी झाडं चहुकडे ॥२

उठे गलका चित्कार बोंबा शिव्या भरपूर 
पडे जगाचा विसर अवघ्यांना ॥३

कुणी नैवेद्य आणला कुणी नारळ वाहिला 
राख लावली भाळाला कुणी भावे ॥४

वृक्ष जळतांना ओला कुणी हुंदका ऐकला 
कुठे ओलावला डोळा जीवनाचा ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...