शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

निर्मळ मन

निर्मळ मन
*********
धरून हातात संताचा तो हात 
नाम गंगा काठ पहावा रे 
घ्यावी ओंजळीत सांगती ते नाम 
तेणे  तुझे काम होईल रे 
ओंजळी ओंजळ लाग ते गोडी
 मग घेई उडी तया माजी
शिरता प्रवाही नुरेल हा देह 
नामाचेच गेह होईल रे 
जातील वासना अवघ्या कामना 
भाग्याचा देखाणा मुर्त होसी
निर्मळ मनात येतो भगवंत 
सांगतात संत आवर्जून 
विक्रांत धरी ते शब्द हृदयात 
नाम ओंजळीत सुख वाटे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

अनुसंधान


अनुसंधान
********

अनुसंधान हा देहभाव व्हावा 
नच विसरावा कदा काळी ॥१

चालता बोलता हसता खेळता 
जेवता निजता स्थिरपणे ॥२

जैसी माय नच विसरे पदरा
देह मन घरा वावरता ॥३

डोईवर घडा घडा घड्यावर 
पाणी पथावर नच पडे ॥४

घडतात कर्म अचूक सहज 
परि चित्त निज साधनात ॥५

सांगती विक्रांता श्री ब्रह्मचैतन्य 
मिळवणे काय नाम जपे ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

दत्त भक्त

दत्त भक्त
*****
मन दत्त ज्याचे
सदैव स्मरते 
ओठात नांदते 
कीर्ती गीत ॥

तया संगतीची 
काय वाणू गोडी
सुखाचे वाहती 
लोट तेथे  ॥

भक्तीचे लाघव 
करती वर्षाव 
सुखावतो जीव 
तेणे संगे ॥

दत्त कीर्तनात 
दत्त भजनात 
दाह हरतात 
संसाराचे ॥

स्वयं दत्त तया 
असे संगतीत 
शब्द बोलतात 
शब्द विन ॥

होतो जैसा नभी
अरुण उदय 
प्रकटतो सूर्य 
नंतरच ॥

भक्त आगमन 
तैसे जीवनात
करूनिया दत्त 
प्रगटतो ॥

साठवी डोळ्यात 
सुख हे विक्रांत 
संग कौतुकात 
मिरवतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

संतसंग

 संत
****

झालास पतित वासनेत रत
 घडले अहित वेळोवेळा ॥

कृपाळू ते संत माऊली मनाचे
देतील दयेचे परि हात ॥

बाहेर काढती सुस्नान घालती 
आणि हाती देती नामकाठी ॥

कधी रागावती पोटाशी धरती 
हाती भरवती घास मुखी ॥

विश्वहितीरत तयांचे हृदय 
क्षमा अवयव जणू  काही॥

विक्रांत तयांची घेई पायधुळ 
सोयरे सकळ हेचि माझे॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

दास्य

दास्य
****

दत्ता तुझे दास्य हेच माझे काम 
इतर तो भ्रम कर्तव्याचा ॥

दत्ता तुझे नाम हीच माझी सेवा
उठाठेव देवा अन्य नको ॥

असो अधिकार सत्ता मातब्बरी 
परी ती चाकरी भिक्षेकरी ॥

काय भिकाऱ्यास असे त्यात तोष
साधन पोटास लाजेचे ते ॥

अहो देवाविन घडे जे जे काही 
व्यर्थ सारे पाही जगतात ॥

विक्रांत दास तो केवळ दत्ताचा 
वाही संसाराचा भार जरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

रविवार, २९ जानेवारी, २०२३

एकांत

एकांत
*****

घडो घनदाट मनात एकांत 
तुझ्या स्मरणात दत्तात्रेया 

स्वरूपात बुडी देऊनिया चित्त 
राहू दे निवांत दयाघना

 तुच आत्मतत्त्वी तुच तू स्वरूपी
 चिदानंद रुपी सर्वाकार

 असु दे बाजूला चालला संसार 
जगाचा व्यापार सुखनैव 

जावे रानीवनी संसार सोडूनी 
मनाला घेऊनी कासया ते 

जगात राहुनी जग न होऊनी
 तुझ्यात मुरुनी राहो मन 

जाणतो विक्रांत हेच खरे तप
 रूपात अरूप पाहणे रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

रेषा


रेषा ( उपक्रमासाठी)
***

कोण मारते कशास रेषा 
कधी कुणा कळत नाही 
कधी उमटती चित्रावली
कधी उमटती कविता ही

रंग बदलते शाई तेव्हा 
चित्रही किती वेगळे होते 
कुठले पेन कुठल्या हाती 
चिरकालीन ते नाते जुळते 

ती त्याच्यावर लिहिते फिरते 
सारे आयुष्य ओतून देते 
तिच्याच साठी मग तो उरतो 
तिच त्याची ओळख ठरते 

फाटत फाटत पान जाते 
परी तिची साथ न सुटते 
शाईचाच तो कागद किंवा 
कागदाचीच शाई असते 

कोरा दिसे कागद कुठला 
पण तरी तो कोरा नसतो
न दिसणाऱ्या तो रेषा देही 
खोलवरी जपत असतो 

अन शाई ती पेना मधली 
झरल्या वाचून कधी वाळते 
वाऱ्यावरती उडून गेल्या 
कागदाला स्मरत असते 

द्वैत त्या पाना रेषा मधले 
जेव्हा मिटते अक्षर होते 
अमृताच्या कल्लोळात मग
विश्व हे तरंगत असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...