शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

इवली परी


इवली परी
********:

इवल्या परीचे  इवलेसे घर 
इवलेसे दार जरतारी ॥१
इवल्या परीचा इवला संसार 
खाणे कणभर मोती चारा ॥२
इवल्या परीचे पंख मखमली 
सजणे कुसरी हळुवार ॥३
इवल्या परीच्या हाती जादूगरी 
स्वप्नांची नगरी दावी जीवा ॥४
माझिया प्रेमाने कुण्या एकादिनी 
दुनिया सोडूनी आली घरी ॥५
कोण असे ती ग नकोस विचारू 
तूच ते पाखरू मनोहर ॥६
विस्फारून डोळे गिरकी ती घेई 
सांगण्याची घाई जगताला ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

कृष्णस्पंद

कृष्णस्पंद
******::

राधेच्या मनी 
नित कृष्णगाणी 
रिमझिमती नव-
श्रावण होवूनी

कृष्णा आधीही
कृष्ण होता
कृष्ण राहीला
कृष्ण जाता 

त्या कृष्णाच्या 
रूपावरती 
विश्व  उमलती 
आणिक जाती 

राधेविन का 
कृष्ण असतो  
कृष्णाविन न
राधे अर्थ तो  

अनंत कृष्ण 
अनंत राधा 
अनंत गाणी 
अनंत जगता 

कृष्ण स्पंद 
ज्याला कळतो 
तो राधाच
होवून जातो 

 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.



मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

दत्त निवारी

दत्त निवारी
********

दुःखास निवारी देैन्यास विदारी
दारिद्रता सारी दत्त दूर करी ॥१

तयाला शरण जाता भक्तजन 
अकाली मरण येणार कुठून॥२

लोभाचे हनन क्रोधाचे ज्वलन 
काम उच्चाटन करी दयाघन ॥३

जरी तू पतित लोभाच्या मातीत 
जाशी हरवित साधना फलित ॥४

तरी तो निवारी सांभाळी सावरी 
प्रभू सर्व काळी धरूनिया करी ॥५

विक्रांत तयाच्या ऐकून किर्तीला
शरण रिघाला जीव आसावला ॥६


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

स्वामी स्वरूपानंद

स्वामी स्वरूपानंद (पावस) १५ ऑगष्ट 
*******************

स्वरूपी राहिले आनंद होऊन 
देह पांघरून जगासाठी ॥१

सोहं मंत्रराज सगुण साकार 
घेई अवतार जणू इथे ॥२

उच्च जीवनाचे ध्येय मानवाचे 
फलद्रूप साचे झाले इथे ॥३

सहज शब्दात प्रकटले गूढ
परमार्थ पथ उजू झाले ॥४

कोवळ कोमल मोगरा कर्दळ 
गुलाब कमळ उमलले ॥५

सार गीतार्थाचे योगाचे ज्ञानाचे 
झाले जगताचे संजीवन ॥६

आजन्म विक्रांत असे ऋणी त्यांचा 
मन गाभाऱ्याचा नंदादीप ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

विझली सुखे


विझली सुखे
**********

विझलेल्या त्या सुखांचे
कोळसे मी वेचतांना 
माखलेले हात काळे 
शुभ्र वस्त्रा पुसतांना 

जाहलो मलीन उगा
पुन्हा सुख शोधतांना 
मिरवितो जगात नि
जुन्याच त्या लांछनांना 

हाय कोणा काय सांगू 
रिक्ततेत जळतांना 
पूर्णतेची तीच ओढ 
पुन्हा पुन्हा डसतांना 

शब्द रूप स्पर्श यांच्या
मार्गीकेत फिरतांना 
पसरून झोळी तीच
करतो का मी याचना 

कोण हवे कशासाठी 
तुटलेल्या सुमनांना 
मृतिकेचा स्पर्श अंती 
कवटाळतो जीवना 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.


रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

दक्षिण द्वार


दक्षिण द्वार
*********

द्वार दक्षिणेचे जल 
होते वाहत वरून 
देह पाण्यात डुंबून 
होतो पायरी धरून 

वाटे सरावे जीवन 
जावे इथेच संपून 
कृष्णा पाण्यात इथल्या 
देह जावा हरवून 

परी घडले ना रे ते 
आलो वर उसळून 
भोवती अथांग माय
होती पाहत हसून 

हट्ट धरला परत 
एक डुबकी परत 
आलो वरती परत 
देह मनाच्या सोबत 

बरे ठिक महाराज 
म्हटलो सोडून हट्ट 
घेई ठेवून मागणे 
हेच प्रार्थतो विक्रांत 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

भाग्याची कविता


भाग्याची कविता
*************
त्या जुन्या घरासम देवालयी 
भक्तीने भारावली जेव्हा ती गेली 
देवीच्या रूपात तिला आई भेटली 
सात्विकता हृदयात होती उचंबळली
प्रेमसरिता डोळ्यात ओघळून आली

देवीला साडी वाहियाला खण 
हार फुले दिवा लाविले कुंकुम 
कडकडून अन दिेले अलिंगन
भक्ती भावाने करून नमन 
निघाली ती बळे पाय जडावून 

तोच एक कामकरी वृद्धा देवळात आली 
गोड बोलून एखादी साडी दे म्हटली 
हिनेही सहजच सोबत आणलेली 
दुसरी साडी तिला दिली 
तेव्हा तिच्या डोळ्यात उचंबळली
पौर्णिमा हिला दिसली
हसून मग ती म्हणाली 
मी इथेच असते  येत जा भेटत जाईल 
आणि बाहेरही पडली आली तशी गेली 
मागे तिच्या ही सुद्धा सहज बाहेर आली 
पाहते तो 
देवळाच्या बाहेर 
कोणीच नव्हते दूरवर 
कोण ती कुठली कुठूनिया आली 
लगेचच अशी कशी कुठे गेली 
क्षणभर अवाक हि क्षणभर गोंधळली 
आणि अचानक मनी उमजली 
येऊन ती आई भेटूनिया गेली 
प्रेमाला तिच्या जणू पोच ती मिळाली 
डोळ्यात पाणी उभ्या रोमावळी
दाटून ये कंठ देही वीज भरली 
भाग्याची कविता शब्दावीन लिहिली.


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...