बुधवार, १३ जुलै, २०२२

गुरुविण

गुरुविण
*******

शून्य जन शून्य वन 
श्री गुरुविण हे जीवन
खिन्न मन खिन्न तन 
श्री गुरुविण हर क्षण 

भरे आश्रम फळफुलांनी 
रांगोळ्यांनी भक्तजनांनी 
जयजयकार स्वाहाकार 
घडे समर्पण अपरंपार 

आता आतून बोलावणे न
आळवणे न  होणे बेचैन 
कितीक झाले इथे प्रेमभंग 
अर्धे अभंग रिते अंतरंग 

अरे असू दे वाट दिसू दे 
दत्त असू दे मनी वसु दे 
वदे विक्रांत हे प्रभू दत्त 
जीवन वात आहे तेवत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, १२ जुलै, २०२२

वाहणे

वाहणे 
******
उगवतो दिवस मावळतो आहे 
आणि मी असा वाहत आहे 

उतरण पाहून पठार माळरान 
दऱ्या डोंगराना ओलांडत आहे

पुला खालून धरणा मधून 
कालवा होवून पुढे जात आहे

असंख्य प्रवाह माझ्यात सामावून 
असंख्य प्रवाहात  विखरत आहे

तोच मी नसून तोच तो होवून 
जीवन जगून दाखवत आहे 

प्राप्तव्य नसून प्राप्तव्य ठरवून 
सातत्य लेवून अस्तित्वात आहे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



सोमवार, ११ जुलै, २०२२

अवचित


अवचित
,*******

कुठे अवचित पैंजण वाजले
मातीत निजले गाणे फुलले

अन कुण्याच्या बेचैन डोळ्यात
होत हलचल रंग उमटले

ओठावर मधु शब्द उतरले
मन हरखले जीवन सजले

जणू पहाटेच्या ओल्या क्षितिजी
शुक्र चांदणे हासत आले

सजल्या वाटा प्रकाश भरल्या 
मुठीत कुणाच्या गुलाल भरले

कुण्या नवथर पाऊल रवाने
कंप दाटून तन मोहरले

मनात भरला चाफा हिरवा
श्वासा मधले गंध गोठले

किमया घडली तुझ्यामुळे ही
नव्हते तरीही अंतर मिटले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



रविवार, १० जुलै, २०२२

माझे मन

माझे मन 
********
माझे मन मला म्हणते तू धाव 
शोध अरे गाव 
मुक्कामाचे॥१
कोण चालवतो कोण भुलवतो 
शोध रे कोण तो 
कुठे आहे ॥२
दिशाच्या या भिंती अवघ्या मोडून 
छत हे तोडून 
नभाकार ॥३
देहाच्या पिंजरी वाहतो जो वारा 
तयाच्या उच्चारा 
ऐक जरा ॥३
सोडव रे पीळ कोहम सोहम 
आयुष्याचा होम 
कर आता ॥४
विक्रांत हातात घेऊनिया प्राणा
अनसुयानंदना
अर्थ मागे  ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘५११

शनिवार, ९ जुलै, २०२२

कीर्तनी रंगली



कीर्तनी दंगली 
***********
घणाणतो टाळ 
अणुरेणू मध्ये 
मृदुंगाची थाप 
मना मनामध्ये

भाविक रंगली 
कीर्तनी दंगली 
जन्म जगण्याचे 
भान हरपली 

विठ्ठल गजरी
व्यथा विसरली 
नवे जीव झाली
अमृत पावुली

कामना त्यजली 
भक्ती भारावली 
देवाचिया दारी 
जणू देव झाली

विक्रांत पाहतो 
गाठही सुटली 
पाहता ऐकता 
ब्रम्हानंदी टाळी


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘५०९

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

उघड खिडक्या

उघड खिडक्या
**********
का ग झुकलेली 
तुझी ती नजर 
उतरला रंग 
गालीचा बहर 

कोण तुज बोले 
करी दुःख ओले 
कळेना मजला 
काय तुज झाले

कोमेजले हासू 
डोळ्याची चमक 
फिकट बोलणे 
शब्दात उरक 

नसतेच जग 
कधीच कोणाचे 
सदा मनी वैरी 
दुज्याच्या सुखाचे 

ऐश्या या जगाला 
कशाला विचारी 
तुझी तू होऊन 
अवघ्या अव्हेरी 

ऐकून शब्द हे
नको म्हणू बरे 
उघड खिडक्या 
येऊ देत वारे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘५१२

गुरुवार, ७ जुलै, २०२२

तुझीच मर्जी

तुझीच मर्जी
*********

देहाची या वीणा झणाणे थरारे 
ज्ञानदेवा विना कशी सांभाळू रे ॥

निघाली माऊली  निज माहेराला 
लावून माझिया घोर काळजाला ॥

सर्वत्र भरली विश्वची जाहली 
आतुर पहाया डोळ्यांची बाहुली ॥

घडली न वारी पडलो संसारी
नागवले देवे लाविले व्यापारी ॥

मुकलो दयाळा महा त्या सुखाला 
मी पण माझे रे तिथे सरायला ॥

जाणतो विक्रांत तुझीच ही मर्जी
स्मरतो मनात अक्षर प्रेमाची ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘५१०

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...