बुधवार, ८ जून, २०२२

ती

ती
********

लखलखत्या डोळ्यात 
स्वप्न सोनियाचे
स्मित  मोगऱ्याचे धुंद
जणु चांदण्याचे

अर्थ मागणारे धीट
ओठ  प्रश्नकारी 
वेड पांघरले त्याचे
शब्द वाऱ्यावरी 

रंग  उधळले कुणी
गूढ संध्याकाळी
मिटणाऱ्या क्षितिजाचे
स्वप्न हे अवेळी

एकटेच यमुनेला
कुणाचे असणे
सभोवार उधळले
चांदण्याचे गाणे 

ओंजलीत प्रकाशाचे
किती कवडसे 
हरखला जीव तरी
कुणा द्यावे कसे ?

जगण्याचा डाव झाला
खेळणेच आता 
हरणे जिंकण्याचा
प्रश्नच नव्हता

तिच्यातील तोच जरी 
रुपडे बाहेरी 
तिची मूर्त बाहुतली
तयाच्या अंतरी


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘






सोमवार, ६ जून, २०२२

त्याची आई

 त्याची आई
**********
आपल्या बापाच्या 
मृत्यूनंतर 
आपली आई  गेली पळून
सर्व पैसे घेऊन 
कुणाचातरी हात धरून 

हे सांगताना 
तो वरमला नाही 
त्याने नाही केली 
आईची नालस्तीही  

तो सांगत होता 
आपल्या आर्थिक 
आपत्ती ची कारणे 
कदाचित ती घटना 
झाली होती एक 
सामान्य घटना ...
त्याच्या आयुष्यातील 
आणखी एक दुर्घटना 

तो धरून चार भावंडे 
ती कशी जगली 
कशी वाढली 
हे विचारायचे धाडस 
नाही केले मी 

दुर्धर आजाराने 
कोसळलेला डोलारा 
सावरता सावरता 
तो जगत होता 
तो पडला होता 
जखमी झाला होता 
पण हरला नव्हता 

ताकत तर माझ्यातही नव्हती 
त्यातून त्याला बाहेर काढायची 

पण ती त्याची कहाणी 
तो संदर्भ 
इतका खोल रुतला माझ्यात 
की मातृत्वाची दिव्य स्वरूप .
माझ्या समोरून गेले तडकत 
काय गुदरले असेल त्याच्यावर 
कल्पनाच नव्हती करवत 

आणि सहज जगजाहीरपणे 
तो ही का असेल सांगत .
 हे सगळे
जग  त्याच्याकडे 
चमत्कारिक नजरेने 
असता पहात  

का हेच असेल औषध 
त्याच्या व्यथेचे वेदनेचे 
उघडे करणे हे घाव दुःखाचे ?
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सौदा


सौदा
*****

जिथे असे सौदा जिथे असे पैसा .
तिथे भरवसा ठेवू नये॥१

गरीबी मिरवे पैश्याविन राहे
मुळी न पाहे उच्चनीच॥२

देवाविन वाणी आणिक न बोले 
संसाराचे टोले साही सुखे ॥३

ऐसा साधू कधी कुणा सापडता 
वाहावे जिवीता तया पायी ॥४

तोवर विक्रांता दत्त ज्ञानेश्वर 
घ्यावा रे आधार चिंता नको ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, ५ जून, २०२२

दत्ताचिया दारी


दत्ताचिया दारी 
**********

दत्ताचिया दारी 
भक्तांच्या पंगती 
सुख ओरगती 
सारे येथे ॥१

राजे-महाराजे 
येती सरदार 
नोकर चाकर 
भक्तिभावे ॥२

पुण्यवान येती
येतात पापी ही
म्हणतात त्राही 
त्राही देवा ॥३

सावही येतात 
चोरही येतात 
प्रसाद घेतात 
मिळेल तो ॥४

प्रभु पदी चित्त
ज्याचे सदोदित 
ओठ दत्त दत्त 
म्हणतात ॥५

तया देही अन्न 
होय नारायण 
प्रकाश पावन 
मोक्षदायी ॥६

आणिका जेवण 
उदर भरण 
कांजीचे मागणं
कल्पद्रुमा ॥७

विक्रांता दाविले 
दत्ताने म्हणून 
हातात घेऊन 
भिक्षापात्र ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, ४ जून, २०२२

त्राण


त्राण
*****
तुझ्या ओठी माझे गाणे 
कधी सजलेच नाही 
तापलेले पंख माझे 
कधी भिजलेच नाही 

आकाश हे भरलेले 
ऋतू होता आषाढाचा 
पेटलेले माळरान
डोंब विझलाच नाही 

अगणित बीज मूक 
हृदयात पडलेली 
अंकुराचे भाग्य तया
कधी लाभलेच नाही 

लावलीस थोडी माया
थंडगार आला वारा
थरारला कण कण 
स्वप्न सजलेच नाही 

विरहाचा ऋतू आता 
जीवनात उरला या 
साहण्या प्रतिक्षा परी
त्राण उरलेच नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, ३ जून, २०२२

घसरण




घसरण
******

जर दोन अडीचशे 
करून गिरनार 
कुणाच्या कामना 
नसतील जाणार 
तर मग कशाला 
हव्यात या भानगडी 
रहावे घरीच आपल्या
सांभाळत लफडी 

कशाला करावा सोस
शेकडो प्रवचनांचा 
कशाला धरावा हट्ट 
पुस्तक लिहिण्याचा 

मान्य, सहज भुरळ 
घालतात सुंदर स्त्रिया 
मान्य, घसरायला 
होतेच तिथे लीलया 
अन ते क्षमापित ही 
केले जाऊ शकते 
आमच्यासारख्या 
सामान्य जनाला 

पण तुम्ही महाराज 
जेव्हा बसत असता
देवतांच्या शेजारी 
घेऊन अनुभुतीचि 
भली मोठी शिदोरी 
तेव्हा ते पचत नाही 

कदाचित ती शिदोरीही 
खोटीच असावी 
याची खात्री होऊ लागते 
परिकथेतील चमत्कारिक 
गोष्टींची आठवण येऊ लागते 

आणि ते तथाकथित 
करोडोंचे याग 
उभे करतात पुढे 
प्रश्नचिन्हांची धग 

महाराज तुमचे हे 
असे घसरणे
असे विवादास्पद होणे
 करून टाकतात 
आमची दिव्य स्वप्न 
छिन्नभिन्न
ज्याला आपण समजत होतो   
देवाचे निकेतन 
तेच कुणाचे तरी  
निघावे दुकान
हे पचवणे
खरंच किती कठीण असते

आणि त्या गोष्टी 
ते अनुभव पूजन ते अर्चन 
ते देऊळ बांधणे वगैरे वगैरे 
सारेच भंकस वाटू लागते

जिथे वैराग्य 
तिथेच ज्ञान असते 
जिथे ज्ञान असते 
तिथेच भक्ती उगवते 

तर मग  महाराज 
एक सल्ला ऐकाल का ?
तुमच्या त्या कथाची 
उतराई म्हणून सांगतो

खाली उतरा
बुवा असल्याची झुल 
दूरवर फेकत
बसा सगळयांच्या सोबत 
मान्य करत 
आपली कमतरता 
इतरा सारखेच
देवाला नमत 
आपले अपराध स्वीकारत 
हातून न होण्याची 
करूणा भाकत

कदाचित हीच असू शकते 
परिमार्जनाची चावी
साऱ्या पापांची

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, २ जून, २०२२

सुखाचा शोध


सुखाचा शोध
**********
कुणाचे पाहणे 
असे जीवघेणे  
जसे की चांदणे  
पुनवेचे ॥१
कुणाच्या डोळ्यात 
भाव दाटलेले 
हातून सुटले 
काचपात्र  ॥२
कुणाच्या मनाचा 
खुळा पाठलाग 
स्वप्नास ये जाग 
अनाठाई ॥३
कधी जीवलग 
स्पर्श हृदयास 
कधी खुळी आस
युगांची ही ॥४
घनदाट कधी
पाश बांधणारे 
जन्म वाहणारे 
सुख पथी ॥६
कुणासाठी कृष्ण 
कुणासाठी राधा 
पूर्णा चिया शोधा
जीव वेडा ॥७
विक्रांत पाहतो   
शोध हा सुखाचा 
सावळ्या मिठीचा 
घनश्याम ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

वाट (नर्मदा काठावरील कविता)

वाट (नर्मदा काठावरील कविता) ******* देही सजलेली वाट मळलेली  उधळून माती नभी दाटलेली  तीच तीच वाट जरी पायाखाली  हर दिन नव्या स्पर्...