बुधवार, १ जून, २०२२

डॉ.अलका माने मॅडम १


डॉ.अलका माने मॅडम १
******************

ती एक धारदार तलवार .
शिस्तीच्या
नियमाच्या 
प्रामाणिकपणाच्या 
म्यानात असलेली .
अन
आरपार जाणारी
कामचुकारपणा 
मोडून काढणारी 
अव्यवस्थितपणा 
छाटणारी
अकर्तव्याचे तण
दूर करणारी

भ्रष्टाचारी तर 
तिच्या परिघामध्ये सुद्धा 
उभे राहत नाहीत 

पण तिच्या 
आक्रमकतेच्या मागे 
आहे एक सहदयता
करुणा  वत्सलता 

ती रक्षणकर्ती आहे
आपल्या घराची 
आपल्या पिलाची
आपल्याआदर्शाची .
कष्टाच्या कमाईची
जपलेल्या स्वप्नाची
लाडक्या लेकाची
तसेच
गच्चीतल्या बागेची 
अन रात्री उमलणाऱ्या 
त्या कृष्ण कमळाची

नाही नाही 
तिला समजून घेण्याच्या 
भानगडीत 
पडू नका तुम्ही 
ती कळणारच नाही कुणाला 
एक अगम्य डोह आहे ती 

ती मैत्रीला जीव देणारी 
तर शत्रूला परास्त करणारी
ती कामात चोख असणारी 
पण वेळेवर येणारी नि जाणारी
ती माणुसकी जपणारी  
अन बेईमानांना धारेवर धरणारी
ती बाहेर आग धडधडणारी 
पण घरात शांत जलागत वाहणारी 

अशा तिच्या असंख्य प्रतिमा 
अनेक गुण 
अनेक स्वभावपैलू ,
पण या सार्‍यातून 
ठळकपणे दिसणारी 
आणि मनामध्ये 
ठसा उमटवणारी 
किंबहुना 
अधोरेखित करणारी 
तिची ती प्रतिमा 
म्हणजे आईची
बाकी साऱ्या प्रतिमा 
विसरायला लावणारी
मला अत्याधिक आवडणारी 

अन तू माझी आईच हो 
असं म्हणायला भाग पाडणारी 

ती प्रतिमा मनात घेऊनच 
मी त्यांचा निरोप घेतो .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




रविवार, २९ मे, २०२२

कामना



कामना
******

कामना धनाची 
कामना मनाची 
कामना यशाची 
जगतात ॥
कामना रुपाची 
कामना सुखाची 
कामना देहाची 
निरंतर ॥
सारी नाव रूपे 
क्षणाची काळाची 
तरीही जीवाची 
घालमेल ॥
मिरवती गादी 
संताचे संगती 
उभारली गुढी 
लौकिकाची ॥
कामनेचा अंत 
तरीही होईना 
जीवन पुरेना
भोगावया॥
म्हणुनी कामने 
द्यावे दत्त रूप 
मन आपोआप 
शांत होय ॥
काम क्रोध लोभ 
दत्ताला वाहून 
रहावे पडून 
दत्त पदी ॥
विक्रांत विकार 
पाहतो देहात 
परी आटोक्यात 
दत्त कृपे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, २८ मे, २०२२

भाग्य

भाग्य 
*****
रांगोळीच्या ठिपक्या गत 
अस्तित्व असते आपले 
रांगोळी चा भाग होणे 
कर्तव्य असते आपले

रांगोळीत ठिपक्यांच्या 
असतात ही ठिपके 
आणि नसतात ही ठिपके 

ठिपक्या शिवाय रांगोळी 
होतच नाही कधी
पण होताच रंग भरुनी 
ठिपके उरतच नाही कधी 

या विश्वाच्या दारातील 
या महारांगोळीत 
मिसळून 
पुसले जाणे अस्तित्व 
हे आपले भाग्य आहे 

त्याहून मोठे भाग्य 
आपले ठिपका असणे 
या स्वीकारात आहे 
ते ओळखण्यात आहे 

त्यातून येणाऱ्या 
कृतज्ञता अन विनम्रतेच्या 
उदयात आहे .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, २७ मे, २०२२

प्रेम निरवधि




प्रेम निरवधि 
**********
सुखात दुःखात 
आठवतो दत्त 
सदा असे हस्त 
डोईवरी ॥१

घडे पापपुण्य 
काही जे हातून 
तयाला सांगून 
टाकतसे ॥२

घेई बा सांगतो 
तया सांभाळून 
लेकरू अजाण
महामूर्ख ॥३

कधी ना कळते 
कधी न वळते 
मन उंडारते 
जगत्रयी॥४

परी देवराय 
न दे अंतराय 
करतो उपाय 
सांभाळण्या॥५

किती अपराध 
तया न गिनती 
अपार ती प्रीती 
अबाधित ॥

काय सांगू दत्त 
प्रेम निरवधि 
भेटला विक्रांती 
पूर्वपुण्ये॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, २६ मे, २०२२

दुषित अन्न

दुषित अन्न 
********
चायनीज बोटी  मेल्या कोंबडीची 
सकाळी ती घाई होय पळण्याची ॥१

करावया जाशी चैन ती जीवाची 
हाय आणशी तू पीडा विकतची  ॥२

चव जिभेला ती लय लय भारी 
गळा दाटे परी  कडूच ओकारी ॥३

खाई डाळ भात चटणी चपाती 
मोले घेतो का रे रोग शरीराती॥४

पोटच्या कळांनी जीवा होय त्रास 
पडे बाहेर त्या नरकाचा वास ॥५

अरे जीवा किती कितीही कामना
घ्यावे देवा लागी अन्न हे सेवना ॥६

मग तेच अन्न प्रसाद होवून 
निववे जीवास साधनी आणून॥ ७

जीभ ही नामास विक्रांत वाहून
न दे विटाळून कदा घसरून ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, २५ मे, २०२२

मुक्ताईचे जाणे


मुक्ताईचे जाणे 
************
निरोपा वाचून मुक्ताई चे जाणे 
मज जीवघेणे  वाटे फार ॥

नाही पुण्यक्षेत्र नाही महास्थान 
सहज गमन कैसे केले ॥

नाही आयोजन निरवानिरव 
हरपला ठाव क्षणार्धात ॥

विमान न येणे गुही न बसणे
समाधी बांधणे काही नाही ॥

कुठून आलीस कुठे नि  गेलीस 
चैन या मनास माझ्या नाही 

असे का हे कुणी जाते क्षणार्धात 
पंचमहाभूतात हरवून ॥

जरी बोललीस आले नच  गेले 
स्वरूपी साचले तत्व मीच ॥

जाणतो गे माय जरी तत्त्वज्ञान 
कोरडा पाषाण असे मी गं ॥

तेव्हा तुझे जाणे मज लागी गमे
माझेच तुटणे का न कळे ॥

विक्रांत उद्धट क्षमा करी माय 
सांग करू काय प्रेम फार ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

नस्ती


नस्ती
*****

रूप बदलते 
नस्ती मिरवते 
खरे काय खोटे 
कोणी न जाणते ॥१

चुका लपवते 
हतबल होते 
सह्या देहावरी 
उगाच झेलते ॥२

साहेबाच्या दारी 
तिष्ठत बसते 
होता कृपा त्यांची 
पळत सुटते ॥३

गोल गोल शब्द 
तरबेज बोटे
आहे तसे काल 
जग हे चालते ॥४

कशाला पुसशी 
विक्रांत चालले 
सारे पोखरले 
लाल निळे किल्ले ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘





दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...