सोमवार, ९ मे, २०२२

हासताच तू

हासताच
******

बदलून रंग डोळ्याचे 
तू तेव्हा हासली होतीस
मग मीही बदललो थोडा
तू मनात बिंबत होतीस
हलवून हात लगेच 
तू पुन्हा निघाली होतीस 

एकेक केस मोकळा 
वाऱ्यावर लहरत होता
गीत धुंद यौवनाचे 
गंध हवेत दरवळ होता 
विझणार्‍या आकाशात 
अंगारही हलकाच होता 

मग पुन्हा झाला अंधार
पुन्हा उगवला तारा
वाळूवर वाहत्या लाटा 
प्राणात पहुडला वारा 
दाटला व्याकूळ एकांत 
जगण्याची झाली कारा 

अवसेच्या अंधारात 
दिसतेच लख्ख आभाळ 
तम भरल्या अरण्यात 
काजवाच गमतो जाळ
पडताच पुढती पाऊल 
ये कानात कुणाची हाळ .

हे जगणे असेच असते 
कळणाऱ्याला कळते
असण्याच्या तावावरती
कविता एक उमटते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘













रविवार, ८ मे, २०२२

येवो कळवळा


येवो कळवळा
***********
विटल्या सुखाचा 
मनात कल्लोळ 
वाहती ओघळ
नको ते रे ॥१
कैसे मज देवा 
असे फसविले 
संसारी गोवले 
असक्तीच्या॥२
धनदारा सुत 
ठेविले मानात 
ठकविण्या हात 
कोणा ऐसा ॥३
चोरले आयुष्य 
भजना वाचून 
माप ते देऊन  
तोट्यातले॥४
तुझिया मायचे
कळू ये लाघव
परंतु उपाव
सापडेना ॥५
तुझिया वाचून 
तारी अन्य कोण 
म्हणून शरण 
येई तुज ॥६
विक्रांत फुंकतो
दिवाळे विठ्ठला 
येवो कळवळा 
आता तरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘१३३

शनिवार, ७ मे, २०२२

कृपेचा वारा


कृपेचा वारा .
************
कृपेचा तो वारा 
यावा माझ्या दारा 
आणि मी भरारा 
उडू जावा ॥
कस्पटास ठावे 
काय कुठे जावे 
उगे वा रहावे 
कोपर्‍यात ॥
अगा मी ओवळा 
धुळ माखलेला 
प्रारब्धी पडला 
जगण्याच्या ॥
उडण्याचा अंत 
जरी भूमीवर 
कणकण क्षर 
ठरलेला ॥
परी नसण्याचा 
स्पर्श असण्याला 
घडावा जीवाला 
हीच आस ॥
विक्रांत पथात 
पायी अंगणात 
पाउले स्मरत 
श्री दत्ताची ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


शुक्रवार, ६ मे, २०२२

जाणीव जगत


जगत जाणीव
**********
डोळे मिटतात स्वप्न सजतात 
सुख पाहतात आत्मरंगी ॥
परी कानावर पडतो कल्लोळ 
होय होरपळ श्वासात या ॥
पेटल्या मशाली येती डोळ्यावर 
उठवते वेळ पहायला ॥
मना पलीकडे शब्दातीत सुख 
संतांचे कौतूक खुणावते ॥
निगुढ निशब्द प्रज्ञेचा तरंग 
येतो अंतरंग पालवीत ॥
एका निमिषाचे केवढे अंतर 
अनंत पदर पापण्यात ॥
स्वप्न सत्य कधी असे दोन होते 
आत-बाहेर ते वेगळाले ॥
जाणीव जगत भेद हा धूसर 
मन मनावर आरोपीत ॥
विक्रांत जगत पाहतो सुंदर 
शून्यात अपार हरवतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, ५ मे, २०२२

ओढ


ओढावते
********

नको नको म्हणतांना 
मन ओढावते मोही 
कडाडते वीज नभी
जाळ उमटतो देही 

सुखातल्या सुखासाठी 
अनावर वृत्ती होते
माझ्यातले माझेपण 
पानावर लहरते

मिटायचा क्षोभ जरी 
उरात या पेटलेला 
कसा कुठे कुणीकडे 
मेघ असे दाटलेला 

शब्दात त्या हरवावे 
स्वरामध्ये चिंब व्हावे
गंध उरी भरूनिया
रंग रूपी वितळावे

केसातले मेघ निळे
डोळ्यावर ओणवावे
दूर रानी टिपूरसे 
चांदण्याचे गीत गावे 

चित्र म्हणू स्वप्न किंवा 
घनदाट धुके होते 
शहारते भान सारे 
वारे हरवून जाते 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


बुधवार, ४ मे, २०२२

मौन

मौन
****
आता बोलणे हे 
सारे व्यर्थ आहे
अर्थशून्य सारे 
संवादही आहे ॥

शब्दाचा आशय 
शब्दात अडतो 
मनातला भाव 
मना न कळतो ॥

तिथे कुणी कोणा 
काय ते सांगावे 
बंद दारावरी 
डोकेची फोडावे ॥

निरर्थ सतार 
तुटताच तार 
कोसळते झाड 
फुटताच पार ॥

सांभाळणे सारे 
कुण्या हाती आहे 
त्याहुनी बरे की 
उगा उगा राहे ॥

विक्रांता मौनची 
आता पांघरावे 
शिवशिवे जीभ
ओठ बांधू  घ्यावे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, ३ मे, २०२२

शहर


शहर
******
 शहर घडते शहर मोडते 
कळल्यावाचून क्षितिज बुडते 
तोच सूर्योदय तोच तो सूर्यास्त 
सावल्या विक्राळ होती अस्ताव्यस्त 
भरला अंधार तळमजल्यात
आवळतो पाश होतो घनदाट 
वृक्ष कत्तलींचे भेसुर शहर 
मुक  चित्कारांचे होते कुरुक्षेत्र 
जगायला येती कोण ते कुठून 
इथल्या अंधारी जातात संपून 
कोणास खुराडे कुणा काडेपेटी 
अनामिक एक अंतही शेवटी 
शहराची भूक मिटता मिटेना 
रांग येणाऱ्याची थांबता थांबेना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...