रविवार, २४ एप्रिल, २०२२

लौकीक

लौकिक
******::
लौकिकात बहु 
मिरविले दत्ता 
पुरे करी आता 
प्रदर्शन ॥ १
बहु फुगवला 
दत्ता खोटा अहं
पुष्ट केला देह-
भाव माझा ॥
भरे आता पोट 
लौकिक सुखाने 
देवा केले जीणे 
समाधानी ॥
तुझिया दारात 
आता रे येऊन 
राहावे पडून 
जीवा वाटे ॥
पाहिले जीवन 
थोडे ये कळून 
परी तुजविन 
शून्य सारे ॥
शून्य करी मन 
अस्तित्वा हरून 
तुझिया वाचून 
नुरो काही ॥
विक्रांत नसण्या
होय उताविळ 
असण्याचा सल 
अंतरात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

दत्त ह्रदयात

दत्त ह्रदयात
*********

खिन्नता ती मना 
आता नको पुन्हा 
श्रीदत्त जीवना 
स्वामी केले ॥१
सुखाचे दुःखाचे
लोभाचे मोहाचे 
यशाचे र्‍हासाचे 
भागी केले ॥२
दत्त प्रकाशात 
घडे व्यवहार 
तयाला सादर 
रोज व्हावे ॥३
सगुण निर्गुण 
कृपेचा तो घन 
नाम रूपा विन 
दत्त झाला ॥४
जीवा आकळेना 
मार्ग सापडेना 
ओघळे करुणा 
माय रूपी ॥५
म्हणूनिया आता 
उरली नच खंता 
प्रकाशाच्या वाटा 
रूप आले ॥६
निवला विक्रांत 
वाहतोय शांत 
दत्त हृदयात 
ठाण केला॥७


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, २० एप्रिल, २०२२

दुपार

दुपार 
*****

वारा सळसळ 
करतो हलके 
क्षणात दृश्य 
करतो बोलके 

फांदी वरचे 
फुल सावरते 
पराग आपले 
उधळून देते 

पाना मधला 
पक्षी पिवळा 
शीळ घालत 
होतो भरारा 

माऊ बिचकत 
लक्ष हरवते 
खार इवली
निसटुन जाते 

चार पिवळी 
पाने दमली 
बस्स म्हणुनी 
होतात सुटली 

पाना मागील 
फळ पिकले 
क्षणात होते 
कुणी हेरले 

जल पृष्ठावर 
विहिरीमध्ये 
मान वळवून 
झाड पाहते 

क्षणात सगळे 
तसेच होते 
दुपार हलके 
कुस बदलते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १७ एप्रिल, २०२२

उपाधी


उपाधी

लागली उपाधी 
सुटता सुटेना 
मन निवळेना 
ढवळले ॥१

किती सांभाळावे
काय सांभाळावे
कशाला जपावे
जमविले ॥२

जन्मही उपाधी 
जगणेही व्याधि 
भौतीकाच्या नादी 
जीव लागे ॥३

सुटावी सहज 
आसक्ती ही दाट 
असे काही फक्त 
करी दत्ता ॥४

विक्रांत बांधला 
विनवी तुजला 
येवो कळवळा 
भगवंता॥५

  

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

साईनाथ

साईनाथ
****

जीर्ण देहावर 
जीर्ण प्रावरण 
चैतन्य किरण 
डोळीयात  ॥१

कृपेचा कुबेर 
दिनांचा आधार
व्याधी परिहार 
करी वैद्य ॥२

रामाचा फकीर 
एकत्वी पुकार
अल्लास साचार 
ओळखता  ॥३

दिव्य गुरूतत्व
धर्म देहातीत
जे वरदहस्त
सदा भक्ता ॥४

साई नामे ख्यात 
अखिल विश्वात  
जयाचा विक्रांत 
सदा भृत्य ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, १६ एप्रिल, २०२२

वाडी दर्शन


वाडी दर्शन
********
वाडीचे पावन 
जाहले दर्शन 
चित्ती समाधान 
उजळले ॥१

गंध परिमळ 
दाटला चंदन 
सुखे तनमन 
पुलकित ॥२

घडे प्रदक्षिणा 
चित्ताने येथून 
पुण्यांची भरून 
गंगा आली ॥३

देई तुझे प्रेम 
दत्ता दयाघना 
नुठवी कामना 
अन्य काही ॥४

मनी भेटलासी 
तना भेट देई
चातकास होई 
चांदणे गा ॥५

विक्रांत न जाणे 
अन्य तुजविण
कृतार्थ जीवन 
झाले बापा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

चैत्र

चैत्र
*****

चैत्र रंगाचा बहर
पानाफुलात नटला 
जीर्ण फांदीला खोडाला 
कैफ जीवनाचा आला ॥१
गेला ओघळून किती 
जीर्ण संभार पिवळा 
येण्या-जाण्याचा अनादि 
खेळ बंदिस्त चालला ॥२
रंग भरती डोळ्यात 
गंध दाटती मनात 
करी लगबग जाण्या 
ऊन सोनेरी दारात ॥३
स्वप्न जुनाट कोवळे 
हिरवी डहाळी होते 
कानी किलबिल तरी 
मनी विराणी जागते ॥४
धूळ परतीची उडे
मन पाऊल शोधते 
गंध दाटले काळोखी 
नभ निळे याद होते ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...