रविवार, २० मार्च, २०२२

ती

ती
***:

भाळी मिरवते 
मोकळी ती बट 
गळा घातलेली 
नाजुकशी पोथ 

डोळीयात लोटे 
मोतियाचे तेज 
चालण्यात दिप्त
लखलखे वीज 

ओठावरी मंद 
हसू झाकलेले 
पापण्याचे मेघ 
सदा झुकलेले 

भुवयात वक्र 
धनुष्य कमान 
नासिका तशीच 
दावी भारी मान 

जरा हालताच
वाजती कंकणे 
चालतांना पथी
गूंजती पैंजने 

पांघरून स्वत्व 
चाले अग्निशिखा 
दारा बाहेरील 
पुसुनिया रेखा 

किती पराजित 
झुकल्या नजरा 
किती उभे अन
जुळवून करा 

वाट नागमोडी 
अंधारही पाठी
मुखावरी फाके
दिशा उगवती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

सहिष्णुता


 सहिष्णुता मूर्खपणा 

*****:*********

हे युद्ध माणसांचे 
जोवर होत होते
जमिनीच्या तुकड्यासाठी 
तोवर ठीक होते 

मुंग्या ही भांडतात 
अन मरतात  
वाघ सिंह ही  
लढतात मरतात 

तसेच हद्दी-
परिसरासाठी
माकडे अन् कुत्रेही 
लचके तोडतात 
एकमेकांचे

तोवर ठीक होते 

त्यात माणसाचे 
पशुत्व शाबीत होत होते 
पण श्रद्धांचे विद्रूपीकरण करून
देवाचे नाव घेऊन 
मारतात 
माणसेच माणसाला 
प्रेषितांची वचने 
मोठ्याने वदून 
यापेक्षा मोठी अमानुषता 
कुठली नसेल 

मानवतेहून मोठा धर्म नाही 
प्रेमाहून मोठे सौंदर्य नाही 
मैत्रीहून काही आनंददायी नाही 

तरीही इथे
सहिष्णुतेचे पाठ म्हणावे 
अन मानेवर 
तलवारीचे वार घ्यावे
या पेक्षा मोठा मूर्खपणा नाही !


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.






शनिवार, १९ मार्च, २०२२

सल


सल. 
*****

झाले लिहून बहुत 
काय आणखी लिहावे 
अर्थ शब्दात अफाट 
वाटे नि:शब्दी बसावे ॥

जन्म जगण्याची वाट 
का रे चाकोरी फिरावे 
घडो जाणणे अवघे
आडवाटे मी पडावे  ॥

किती देणे घेणे असे 
किती बांधल्या त्या गाठी 
फिटो ऋण ते सार्‍यांचे 
जन्म मरणाची भीती ॥

आहे जीवन चालले 
माझ्या येण्याचाही आधी 
माझ्या जाण्याने फरक
मग पडणार तो किती ॥

शून्य पालविते आत
साद घालतेय जीवा
कुठे अडला विक्रांत 
सल काळजात नवा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

गुरुवार, १७ मार्च, २०२२

होळी

होळी
***:::
पेटवली होळी 
विझलेली होळी 
दोन घटका ज्वाळांनी 
सजलेली होळी 

प्रेमाने फुलांनी 
भरलेली होळी 
वाजत गाजत  हृदी
आलेली होळी 

उसळता डोंब
गेली उंच आभाळी 
रव दाटलेली 
थरारली होळी 

सुखाची होळी 
दुःखाची होळी 
जीवनाला धडे 
शिकवणारी होळी 

उसळते भाव 
मावळते भाव 
नर्तनात आगीच्या 
दर्शवती होळी 

संपता आवेग 
संचिताचा भोग 
सारे शांत शांत 
करणारी होळी 

आगीचाच खेळ 
असे अंती होळी 
पुढे रंग राखाडी 
दाखवती होळी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.


बुधवार, १६ मार्च, २०२२

खानावळ


खानावळ
*******

नोकरीची जागा 
एक खानावळ असते 
प्रत्येकाला 
इथे येऊन फक्त 
पोट भरायचे असते 

ही गोष्ट वेगळी आहे 
कोणी पोटापुरते खातो 
कोणी पोट फुटेस्तोवर खातो 
कोणी परवानगी नसूनही 
गुपचूप पिशवीत टाकतो
घरी घेऊन जातो 

कधी जेवता जेवता 
होतात काही गप्पा 
जुळतात स्वभाव  
कुणाकुणाचे 
आदान-प्रदान 
होते विचारांचे 
कुणी ताटातले काढून
देतो दुसर्‍याला 
मैत्र होते जीवांचे

तसे असतात 
काही  फायदे 
प्रत्येक जागेचे 
सगळेच आभाळ 
नसते  उन्हाचे

पण खानावळीला 
काहीच फरक पडत नाही 
त्याच ताटात 
कालच्या धुतलेल्या
आज कोणी दुसरा जेवत असतो 
आवडीचे किंवा नावडीचे 
अन्न खात असतो 
त्याला इलाज नसतो 
कारण प्रत्येकाला
खानावळीचा 
महिना भरायचा असतो 

अन मालक त्या खानावळीचा 
न दिसणारा 
अनंत काळाचा 
राबवत असतो सर्वांना 
खाणाऱ्यांना 
वाढणार्‍यांना 
चोरणार्‍यांना आणि 
भीक मागणार्‍यांनाही 

कधी वाढणारा 
खाणारा होतो 
तर कधी खाणारा 
वाढणारा होतो 
भूमिका बदलतात 
माणसं बदलतात 
खानावळ चालूच राहते 
इथे जात धर्म नसतो 
लिंग वर्ण नसतो 
असतो तो फक्त हिशोब 
पोटाचा अन बिलाचा 

अन तो
काळाचा मॅनेजर
वसूल करत असतो
बील
आयुष्य नावाचे

भरत असते पोट 
रोजचे
सरत असतात दिस
रोजचे
अन आपल्याला वाटते 
आपण जगतोय
जीवन 
विना उपासमारीचे

अश्या अनंत खानावळी
चालू आहेत
पोट भरत आहेत 
आयुष्य सरत आहेत.
उपासमारीच्या 
भयाचे भांडवल करून 

पण मालक तोच असतो .

कधीतरी संपते 
हि पंगत
कुणाला मिळतो 
पेन्शनचा डबा घरपोच 
थोडा कमी असतो 
तसे आता पचवणेही 
अवघड असते पण
आपण वेचलेल्या काळाचाच
तो मोबदला असतो.
थोडक्यात तो ही 
खानावळीचाच 
बांधील असतो.

एकदा स्वीकारली खानावळ
की दिवस मोजायचे 
अन
काळ श्रमाचे  
बील भरायाचे 
मग रिटायर होवून 
मरून जायचे .

वा रे जिंदगी विक्रांत
वा 
खरेच मस्त आहे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

खणत रहा


खणत रहा
*********

खणत रहा 
खणत रहा 
दगड कातळ 
फोडत रहा 

पाणी हवय 
जीवन हवय 
जगण्याला या 
कारण हवय 

तुझ्या रानात 
तलाव नाही 
कालवा येण्यास 
वाव नाही 

तूच तुझ्यात 
खोल खोलवर 
जाय शोधत 
ओल मिळेस्तोवर 

खणता खणता 
मरून जाशील 
ऊर फुटून 
तुटून जाशील 

पण खणायचे 
थांबू नकोस 
स्वप्न पहात 
निजू नकोस 

संपण्यात त्या
असे सापडणे 
 कळल्यावाचून 
 मिळून जाणे

खण खण
कोण मी कोण 
खण खण 
नाहं नाहं

खण खण 
कोहम कोहम 
खण खण 
सोहम सोहम 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

मंगळवार, १५ मार्च, २०२२

खपल्या

खपल्या 
*******
काही राग फाळणीचा 
माझ्याही मनात आहे.
दंग्यात मेल्या मित्राचा
व्रण काळजात आहे.॥

हो मान्य मला सारेच
ते कसाई नसतात 
कबीर मीर गालिब 
आफताब असतात ॥

बॉम्ब स्फोटी तिची गाडी 
काचा या डोळ्यात आहे 
जळून मेल्या सखीच्या 
अजूनी प्रेमात आहे.॥

हो मान्य मला सारेच 
ते दुश्मन नसतात 
शेख कासीम पठाण
जीवास जीव देतात ॥

पण काश्मीर पंजाब 
हे रक्त तापवतात
दावून भय भविष्य
कानी शिसे भरतात .॥

हो मान्य मला सारेच 
ते फितूर नसतात 
कलाम रफी अे आर
ह्रदयात  राहतात ॥

पण काही जखमा त्या 
उरी सदा सलतात 
अन खपल्या भरल्या 
पुन्हा काढल्या जातात.॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.





आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...