बुधवार, ५ जानेवारी, २०२२

चित्र

चित्र
*****

तू हरवून गेलीस 
सोबत तुझी चित्रही
प्रत्यक्ष दुर्लभ जरी 
तो आधार होता काही 

किती दिस उलटली 
स्मृतिचित्रे हरवली 
निर्गुणात याद दृढ 
डोळे कासाविस झाली 

हळूहळू हरवेन
मीही काळवाही येथे 
घडेल वा न घडेल 
गाठ तुझी कधी कुठे

सांगणार नाहीस तू 
गोष्ट तुझी कधी कुणा 
मीही नाही उजागर 
कधी करणार खुणा 

हरवेन  कुजबुज 
विसरेन सारे जग  
पाहायला वेळ कुणा 
पाण्यावरची रेघ  
 
परी मी ते सांभाळून
ठेवीन तुझे चित्र ग 
मनावर उतरले 
तुझे अथांग नेत्र ग  
 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रविवार, २ जानेवारी, २०२२

नरसोबाच्या वाडीला

नरसोबाची वाडी
*************

देव राहातो वाडीला 
माय कृष्णेच्या तीराला 
सदा रक्षितो भक्ताला 
धाव घेतो संकटाला 

त्याने ओढले मजला 
वेड लावले जीवाला 
पदचिन्हात सजला 
ठसा जीवी उमटला

किती चालावे  रिंगणा
किती घालू प्रदक्षिणा 
हौस पुरेना फिटेना 
वाटे पथ व्हावे मना

किती डुंबावे कृष्णेत
मनमोहक तीर्थात 
घोष ह्रदयी गर्जत
किर्ती देवाची मुखात

सुखे भरलो भरलो 
दत्त दर्शन पातलो
साऱ्या चिंता विसरलो 
येणे जाणे हरवलो 

दत्त भरला भरला 
अंतर्बाह्य रे साचला 
काही सांगण्या जगाला
विक्रांत नच उरला

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, १ जानेवारी, २०२२

मावळत्या सूर्याने

मावळत्या सूर्याने
***************

मावळून दिन गेला 
वर्षामधला पहिला 
एक एक बावीसचा 
बघ दोन होत आला 

तारखांना अंत नाही 
सारा खेळ आकड्यांचा 
काळ हा अकाल आहे 
संबंध ना घड्याळाचा 

या क्षणात काळ आहे 
जरी दिसे वाहणारा 
पण चाळा या मनाला 
कल्पनेचा वारा प्यारा 

मावळत्या सूर्याने का 
उगवत्या त्या सूर्याला 
म्हटले असे इथे की 
माझ्याहून तू वेगळा 

जीवन हे व्यक्त ज्यास
जगणे ही आहे भास 
अनाकलनीय तरी
एक दिव्य चिद्विलास 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

काका महाराज


काका महाराज 
************
महाशक्तीचा पुजारी 
स्वामी दीक्षा अधिकारी 
गुरु मूर्त स्वप्नांतरी 
पाहिली  मी ॥१

काका महाराज श्रेष्ठ 
भक्तराज ते वरिष्ठ 
घडे तयांची रे भेट
ऐसी काही ॥२

वेष तसाच नित्याचा 
काळी टोपी धोतराचा 
वरी कोट नि शोभेचा 
सुप्रसिद्ध ॥३

तया पाहता धावलो 
आणि नमिता जाहलो 
माळ रुद्राक्ष पातलो 
हातामध्ये ॥४

जरी साधने पासून 
व्यस्त दूर हरवून 
बीज पेरले येऊन 
पाहताती ॥५

कधी घडली ना भेट 
कधी पाहिली ना थेट 
मुद्रा तरी ह्दयात 
उमटली ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

दत्त कळणे

दत्त कळणे
*********

डोळे पाहत नव्हते 
मन जाणत नव्हते 
दत्त डोळ्यातून या
मनी उतरत होते 

दत्त कळल्या वाचून 
गुण ऐकल्या वाचून 
प्रेम मनात माझ्या 
उगा दाटलेले होते 

दत्त उभा भिंतीवर 
बाल्य बहरत होते 
क्षण क्षण वेडावून 
भक्ती आकारत होते 

दत्त स्वप्नात येऊन 
गेले किंचित भेटून 
वय नादान लहान 
सारे विसरत होते 

खेळ इतका वाढला 
दत्त विसर पडला 
स्वामी साईचा रूपाने 
मज सांभाळत होते

गेलो वाहत वाहत 
दूरवरच्या वाटेने 
अंती थांबलो तेथेच
दत्त प्रभू उभे होते 

दत्ता मी न निवडले 
देवे मज स्वीकारले
कृपा असीम अपार 
विक्रांत बाहुले होते

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

ऋतू

ऋतू 
*****

ऋतू कोरडा तो जाता 
मेघ ओशाळे सावळा 
पान रुसत एकेक  
झाली मातीवर गोळा 

हाती असते कुणाच्या 
इथे रुजणे फळणे 
पाणी ओघळते डोळा 
व्यर्थ हसणे रडणे 

पुढे असेल-नसेल 
जन्म पाहिला तो कुणी 
लाख सुचतात ओळी 
परी होत नाही गाणी

दिसे भिजलेले स्वप्न 
कधी पहाट वार्‍याने 
पण उघडता डोळे 
जग तेच सुने सुने 

दुःख साकळून गाठ 
मनी होय काळी-निळी 
तुझे प्रेम आहे दत्ता 
माझी दवा सर्वकाळी 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

साधू भेटी


साधू भेटी
*******

थोर या जगती
किती ऋषीमुनी
देवाला पाहुनी 
पूर्ण झाले ॥१

परी तयांची ती 
पडेनाची गाठी 
मिटेनाच‌ भ्रांती 
जीवनाची ॥२

भेटून कधी ते 
नच रे भेटती 
उदास वागती 
जगण्यात ॥३

कधी पोहोचणे 
देहा न घडते 
काय आड येते 
कुणा ठाव ॥४

विक्रांत दत्ताला 
मागतो मागणे 
घडू दे भेटणे 
तया सवे ॥५

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...