सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

साद


साद
*****

तुझ्या डोळीचे चांदणे 
साद घालती कुणाला 
ओठ व्याकूळ अधीर
याद करती कुणाला

स्वप्न तेच जरी जुने 
नवी फुटली पालवी 
ताप साहून उन्हात 
मनी उभारी हिरवी 

बटा पिंगट मोकळ्या 
सोन झळाळी मिरवे 
फुलपाखरू अल्लद 
तिथे कुणीतरी यावे

काय कानी तुझ्या पडे 
बोल गुज अलगुज 
जग द्वाड चहाटळ 
नको ऐकू कुजबुज

तुझा यमुनेच्या तीर
चिंब अमृत पुनव 
मनी घालतो ना रुंजी 
मंद बासरीचा रव   ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


रविवार, १२ डिसेंबर, २०२१

नसे खेळ

नसे खेळ
********
अरे नसे खेळ 
दत्ता तुझी भक्ती 
पेलावया शक्ती 
लागे फार ॥१
हरलेत किती 
रथी-महारथी 
जिंकू जे म्हणती 
तुज लागी॥२
ध्यानी धुरंधर 
दानी ते उदार 
ज्ञानाचे भांडार 
जगात या ॥३
कोण पारायण 
करी जन्मभर 
तपी ते अपार 
कोण श्रमी ॥४
कोणी नामावळी 
केल्या कोटी कोटी 
कुणी ते भ्रमती 
तीर्थ लक्ष ॥५
जरी उचलून 
घेशील तू दत्ता 
तरीच विक्रांता 
आशा काही ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

प्रार्थना

प्रार्थना
******
होऊन व्याकुळ 
करतो प्रार्थना
 मज दयाघना 
साहय करी ॥

नाही मी मागत 
ऐश्वर्य जगाचे 
झेंडे कीर्तीचे 
तुजलागी ॥

नको ते नेतृत्व 
नको ते दातृत्व 
आणिक भोक्तृत्व 
कशाचेही ॥

नितळ निर्मळ 
देई तुझी भक्ती 
अपेक्षांची वृत्ती 
नसलेली ॥

जसे बाळावर 
आईची ती प्रीती  
तैसा मजप्रति 
होई दत्ता ॥

विक्रांत गांजला 
जगी भटकला 
शरण हा आला 
अवधूता.॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बंध

बंध
****

असू देत बंध 
कुठल्या जन्मांची 
तया तुटायची 
वेळ आली ॥

बंधातून बंध 
जातात वाढत 
जीवा आवळत 
पुन्हा पुन्हा ॥

बीजातून बीच 
येतसे जन्माला
देतसे रानाला 
जन्म मोठ्या ॥

म्हणूनिया जड 
झालो भगवंत 
सुखाची संगत 
सोडुनिया ॥

सुखा घाबरतो 
दु:खा बिलगतो 
जेणे कंटाळतो 
जन्माला या ॥

विक्रांत आर्जव 
करतो दत्ताला 
करी रे मोकळा 
मज लागी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

महाऋतू

महाऋतू
******:

नकोस विचारू 
लायकी ती माझी 
गटारे गंगेची 
वाहणी ही  ॥

आहेत भरले 
अवघे विकार 
नाही पारावार 
तया देवा ॥

राहतो चक्रात 
जगरहाटीत 
मनाच्या मर्जीत 
रात्रंदिन ॥

कोसळशी जरी
वर्षा तू होऊन 
जाईल वाहून 
सारा मळ ॥

विक्रांत शरण 
तुज दयाघन
येई गा होवून 
महाऋतू


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

लय

लय
*****
बापा गजानना 
करी मजवर
एक उपकार 
फक्त आता॥
करी गा भास्कर 
मजलागी देवा 
हळूच सोडवा 
भवातून ॥
मृत्यू न टाळता 
देह न बाटता 
कर दिवा विझता
झाकलेला ॥
रे क्लेशा वाचून 
मरण वरन
दिले भगवन 
तया जैसे ॥
करी तैसा गोड 
दिन शेवटचा 
लय विक्रांतचा 
होतं स्वात्मी ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

गणित

 
गणित.
******
 गणिताचे अनेक प्रकार असतात 
साधं सोप्प गणित 
चुकलेले गणित 
मुद्दाम चुकवलेले गणित 
आणि चुकूवूनही बरोबर आहे 
असं दिसणारे गणित . 

आपापल्या गणिताचा प्रकार 
ज्याने-त्याने स्वीकारायचा असतो.
तो अत्यंत वैयक्तिक असतो 
त्याला कुठल्याही 
व्यवसायाचे क्षेत्राचे बंधन नसते.

खरतरं गणितात प्रश्नांगभुत 
असते नितळता
अन उत्तरात अपेक्षित असते 
ती अचुकता 
कितीही गुंतागुंत असली तरी
सिद्धांत मोडता कामा नये.
प्रमेय चुकता कामा नये.

तशी बेरीज वजाबाकी 
करावीच लागते 
प्रत्येकाला जीवनात.
किंबहूना ती होतेच 

पण जर ते सिद्धांत
धूसर असतील मनात
अन अनाकलनिय प्रमेय 
टाकत असतील बुचकळ्यात
तर गणित कधीच सुटत.नाही

या सार्‍या कटकटीत पडण्यापेक्षा 
मी निवडले साधे सोपे गणित 
स्वकष्टाने कमवायाचे 
अन तारतम्याने खर्च करायचे .

आपली बेरीज पक्की आहे.
हा आता वजाबाकीत घसरतात आकडे 
पण तोही सोप्या गणिताचा नियमच आहे.

एकदा आपले गणित पक्के झाले 
कि इतरांच्या गणिताचे 
आपल्याला तसे सोयरसुतक नसते 
कारण ते नीट करायला
आपल्या हातात कधी छडी नसते.

अन जरनआवडले नाही तर
नापसंतीने नाक मुरडले जाते 
बस तेवढीच मोकळीक असते.
कारण आपण स्थितप्रज्ञतेचे 
रसायण कधी प्यायले नसते .

पण माझे गणित 
मला सापडले आहे .
अन त्यात मी सुखी आहे 
या  एकाच ताळ्यावर 
मी अगदी निर्धास्त आहे..

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .









 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...