सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

चाकर

मजलागी पडे 
भक्तीचा विसर 
जगाचा चाकर 
होऊनिया ॥१
धावतो हातात 
घेऊन नोकरी 
ठेवून पगारी 
लक्ष सारे ॥२
जाहलो बेजार 
संसार लाचार 
चित्त नामावर 
लागे ना रे ॥३
कुणी ना कुणाचा 
जरी हे जाणतो 
बंधात पडतो
पुन्हा पुन्हा ॥४
आता जीवलगा 
करुणा सागरा 
तुझ्यावर सारा 
भार माझा ॥५
विक्रांत दत्ताची 
मागतो चाकरी 
उभा दारावरी 
अर्जी देत ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मराठी साहित्य संमेलन


मराठी साहित्य संमेलन
********

हे अध्यक्ष लोकांचं वाचून 
गंमत वाटली.
हसायालही आलं.
माणसच असतात शेवटी सारी.
कुणी भडकलेले .
कुणी अडकलेले .
कुणी दडपलेले.

कुणी कुणाला निष्ठा वाहिलेले .

आणि अध्यक्षाला 
असं काय किती महत्व असतं 
हे फक्त प्रकाशकालाच कळत 
अन खरेतर ते गणिताचंही असतं.

बाकी आम्हाला काय त्याच ?
कुणी का बसाना तिथं 
कुणी का बोलेना !
किंवा ना बोलेना का!

कधीकाळी डोळ्यातूनही 
आग ओकणारा वाघ 
पोट भरला की शांत होतो.

अन तशीहि वाघांची गणणाही 
फार कमी होत आहे आता.

पण पुस्तकांचा प्रकाशकांचा 
अन  लेखकांचा कवींचा  
हा वसंत ऋतुच .

तिथे हवसे नवसे गवसे 
आवर्जून येणारच .

अन कुठल्यातरी
भिरभिरत्या डोळयात 
उत्सुक मनात 
हरखल्या जीवात
 माय मराठीचे बीज पडणार 

त्या एका बीजासाठी तरी 
हा सारा उपद् व्याप सार्थ आहे .
**
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

कपटा

कपटा
*****

जन्म वितळत आहे 
अस्तित्वाचा अर्थ न कळता 
घनीभूत झालेला 
प्रत्येक प्रश्न सतावत आहे 
खोलवर आत 
मोडलेला काटा होत
सदैव ठसठसत .

उपायांचा निरुपाय झाल्यावर 
राहावे लागते जगत 
आपल्या व्याधीला 
आपणच स्वीकारत 
तसेच काहीसे होत जात 
काळही करतोच बोथट 
वेदना संवेदना 
मनास गुंतवतो 
कशात नि कशात 
कधी संगीतात कधी सिनेमात 
कधी कवितात कधी आठवणीत 
कधी अध्यात्मिक ग्रंथात 
अन् मनोराज्य असतातच शेवटी 
मग आपण जातो 
निद्रेच्या राज्यात 
सारे काही विसरत 
स्व त: ला हरवत.

पण कधीकधी असेही होत
अर्ध्या रात्रीही करमत नाही 
मन कशातच लागत नाही 
पराजयाची ध्वजा 
फडफडते उरावर 
असहाय निष्क्रियता 
व्यापुन उरते जगावर 
हीसुद्धा एक लाट असते 
मिटणार हे माहीत असते 

पण मग ती रात्र ती लाट 
व ते जागेपण 
यांच्या वादळात 
मी पणाचा कपटा 
त्या प्रश्न सकट राहतो 
भिरभिरत आपटत 
फाटत विदीर्ण होत

वाटते कधीतरी 
कुठल्यातरी लाटेत 
सरतील प्रश्न 
या अस्तित्वाच्या कपट्यावरील 
पुसतील सहज 
भिजत भिजत
वा संपेल तो कपटाच
त्या प्रश्न सकट 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

भिकारी

भिकारी
******

जर उघडले 
नाही एक दार 
जातो दुज्यावर 
भिकारी तो॥१

आणि दारोदार
पडता धुत्कार 
उकिरड्यावर 
शोधे अन्न ॥२

खाई विटलेले 
कुणी फेकलेले 
कधी नासलेले 
बळे बळे ॥३

पडो पडे तेव्हा 
ओझे या देहाचे 
तोवरी भुकेचे 
भागू देतो ॥४

तैसा हा विक्रांत 
विटल्या सुखात 
सोडुनिया वाट 
प्राप्तव्याची ॥५

कैसे महासुखी 
लाचावले मन 
येतसे फिरुन
संसारात ॥६

अहो महाराजा
थोडी कृपा करा
उघडून दारा 
भाकर द्या ॥७

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

चळणे

चळते
******

बुद्धी का चळते
मन का मळते 
कुणास कळते 
काय कधी ॥१

कधी विश्वामित्र 
कधी पराशर 
तपस्वी हे थोर 
घसरती  ॥२

तेथे कुणाचा रे
लागतो ना पार 
भय हे अपार 
भक्ताठायी ॥३

धरून हाताला 
चकवा चुकवा  
मार्गाधारे लावा 
साधनेच्या ॥४

तरी तो तरेल 
यातून सुटेल 
तुजला भेटेल 
दयाघना ॥५

देऊन सुकाणू 
प्रभू दत्ता हाती 
विक्रांत वाहती 
नाव झाला ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

शिणलो

शिणलो
******

भक्तीच्या वाटा 
शिणलो बहुत
जहाले न प्राप्त 
परी काही ॥
असेल तो देव 
दिसेल तो देव
केली उठाठेव 
वाया गेली ॥
कैसे नि दैवत 
प्रसन्न त्वरित
म्हणूनिया वाट 
पाहिली म्या ॥
कुणा काय देऊ 
उगाचच दोष 
मन मज वश
झाले नाही ॥
दत्ता चालो तुझा 
थोर कारभार 
संसाराचा भार 
वाहतो मी ॥
विक्रांत सोडली 
अवघीच आशा  
अध्यात्माचा गाशा 
गुंडाळतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

मनाचे रंजन


मनाचे रंजन 
*********:

मनाचे रंजन 
थांबता थांबेना 
भले ते कळेना 
काही केल्या ॥

संगीतात मग्न 
नाटकात दंग 
पाहातसे रंग 
भावनांचे ॥

कुणाच्या सुखात 
कुणाच्या दुःखात 
कुणाच्या हास्यात 
रममान ॥

कधी काही खोटे 
कधी काही खरे 
चित्रबद्ध सारे 
जुने क्षण ॥

भोगते ते मन 
आता समजून 
राहते गुंतून 
सर्वकाळ ॥

येणे काय होई 
हा तो क्षण जाई
दाटलेला राही
मनी तम ॥

दत्ता दे रे मन 
सजग करून 
विक्रांत शरण 
म्हणुनिया ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...