मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

अतृप्ती

अतृप्ती
******

अतृप्तीचा वृक्ष तुझा 
तूच वाढवू नको रे 
कुढुनिया जल त्यास
रोज ते देऊ नको रे ॥

तुझ्याहून दु:खी इथे 
बघ बहू जग आहे 
डोकावून पहा जरा 
जिथेतिथे आग आहे ॥

भेटली जी सुखे तुला 
मूल्य त्याचे थोर आहे 
प्राक्तनाच‍ा हिशोब हा
बघ काटेकोर आहे ॥

दत्त दाखवितो खुणा 
सोहं ध्वनि गुंजे काना 
निद्रा असो जाग किंवा 
प्रश्न नको आता मना  ॥

दत्ती जीव रमे कैसा 
भजुनिया पहा जरा 
वाहतो विक्रांत वारा
शिखरी मस्त भरारा


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

भिकारी

भिकारी
******

दत्ताचिया दारी 
सदा मी भिकारी 
भक्तीची भाकरी 
मागतसे  ॥१

नको हिरे-मोती 
सुवर्णाची नाणी 
ओठी देई गाणी 
प्रेमाची रे ॥२

तुझ्या दर्शनाची 
आस आहे मनी 
लोचनी अजुनी 
दिसेना तू ॥३

घडो घडेल ते  
जेव्हा जसे जसे 
मज प्रेम पिसे 
लागो तुझे ॥४

विक्रांत याचक 
जन्म जन्मांतरी 
तुझ्या दारावरी 
राहो परी ॥५
****  

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

गढूळ पाणी

गढूळ पाणी
****

पाणी गढूळ मनाचे 
आहे वाहत कधीचे 
कणकण ओघळतो 
ओझे कुठल्या जन्माचे ॥

पाणी इथले का खारे 
पाणी तिथले का गोड 
अशा असंख्य प्रश्नांचे 
कुणा सुटते ना कोड ॥

मना असतो का रंग 
हे तो वासनांचे अंग 
तरी भोगतो अवघे 
जणू होऊन सवंग ॥

जरा वाहू दे वाहू दे 
कुण्या गंगेला मिळू दे 
सारे मिटतील क्षोभ 
अंती सागर पाहू दे  ॥

रंग पिवळा मातट
लाल सावळा ही कधी 
त्याचे नव्हतेच कधी 
झाला वृतीतला बंदी॥

रंग कर्पुरगौराचा 
आज मागे अवधूता 
रंग मिटुनिया सारे 
करी निर्मळ विक्रांता ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

नमो एकनाथा

नमो एकनाथा
***********:

नमो एकनाथा
जनार्दन सुता 
भागवत श्रेष्ठा
महाराजा ॥१

नमो एकनाथा
ज्ञानेश वरदा 
परम सुखदा 
सोयरिया॥२

नमो एकनाथा
प्रभो शांतीब्रह्मा
भक्ती देई आम्हा 
तव जैशी ॥३

नमो एकनाथा
मुर्त मानवता 
साकार जगता 
तव रुपे ॥४

नमो एकनाथा
भेदभावातिता 
उन्नत पतिता 
समरूपा ॥५

नमो एकनाथा 
श्रेष्ठ सुधारका 
अनाथ पालका 
दयारूपा ॥६

नमो एकनाथा
ज्ञानेश ह्रदया
दावी विक्रांता या 
युक्ती काही ॥७

नमो एकनाथा
होत माझे मन 
जनार्दनी लीन
दत्त पाहो


*****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********






गुरुवार, १ एप्रिल, २०२१

रिवाजी

रिवाजी
******

प्रीत रिवाजी 
मित रिवाजी 
रित रिवाजी 
जगाची ॥

देहा मधले 
धना मधले 
पुढे विटले 
होते रे ॥

ओढ उथळ 
जोड उथळ 
मौज केवळ 
क्षणाची॥

सुख असूनी 
धावे कामना
काय कारणा
कळेना ॥

मन अश्व तो 
का उधळतो
काय शोधतो 
न कळे  ॥

अहा जगणे 
पिसे फिरणे 
सुख पाहणे 
सर्वत्र ॥

श्रीगुरुदत्ता 
वाचव आता 
तव विक्रांता 
थकल्या ॥

बुधवार, ३१ मार्च, २०२१

टाहो

टाहो
*****
व्यर्थ माझा टाहो 
जाऊ नये देवा 
सांभाळ या जीवा 
तहानल्या  ॥१

पिल्लू हे अजान 
असे कोटरात 
घास दे मुखात 
उघडल्या ॥२

प्रभू वाहतो हे 
क्षण प्राक्तनाचे 
करुनी आशेचे 
द्वार डोळे ॥३

फुटताच पंख 
आकाश होऊन 
जाईन निघून 
कृपे तुझ्या ॥४

अन्यथा मातीत 
कृमी कीटकात 
जीवनाचा अंत 
ठरलेला ॥५

तुझी आस मज 
लागली दयाळा 
श्री दत्तकृपाळा
त्वरा करी ॥६

विक्रांत व्याकुळ
विनवितो तुज
भेटी देई मज  
एकवार ॥७


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, ३० मार्च, २०२१

दशरथ शिंदे

दशरथ शिंदे
********

अंतर्बाह्य जसा आहे 
तसा माणूस जर 
तुम्हाला पाहायचा असेल 
तर तुम्ही दशरथ शिंदेला पहावे.

दशरथ शिंदे यांचे वैशिष्ट्य 
म्हणजे जे काही करायचे 
ते पूर्णपणे करायचे 
मनापासून करायचे 
शंभर टक्के करायचे 

हा माणूस 
जीवाला जीव देण्याइतके 
प्रेम करणार 
गाढ निरपेक्ष मैत्री ठेवणार 
आणि सदैव मदतीला धावणार 
तसेच राग आल्यावर 
तो मुळी सुद्धा न लपवता 
स्पष्टपणे बोलून दाखवणार 

अर्थात असे प्रसंग विरळाच !

या सरळ मनाच्या माणसाचे
प्रेम राग आदर मैत्री दुश्मनी
सारेकाही सरळ आहे 
तिथे लपवाछपवी नाही 
राजकारण नाही 

अशी माणसे 
डावा हात दुखला तरी 
उजव्या हाताने काम करतात 
पण दोन्ही हात आखडून 
कधीच बसत नाही 

खरतर दशरथचा या विभागात 
दशरथदादा म्हणून दबदबा आहे 
आणि मोठ्या भावाच्या 
या प्रतिमेचा त्यांनी रुग्णालयाला
सदैव उपयोगच करून दिला 
कित्येक लहान-मोठ्या आपदा
ड्युटी मध्ये येण्यापूर्वीच 
दूर केल्या आहेत 
त्यामुळे कॅज्युल्टीत काम करताना 
त्याचा मोठा आधार 
प्रत्येक सिअेमोला वाटायचा 

दशरथ आता निवृत्त होत आहे 
त्याचे मोकळेपणी बोलणारे 
सुवर्ण रंगात झगमगणारे
आणि वय होणे थांबलेले
व्यक्तिमत्व 
आपण सदैव स्मरण करत राहू .
त्यांना निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!
***

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...