गुरुवार, १८ मार्च, २०२१

दृढ धरियला


दृढ धरियला
*********
करुनिया गुरु 
घेऊनी आधारु 
हरला अंधारू 
नव्हताच ॥

कितीक साधूंच्या 
गेलो जरी दारा 
कोण असे खरा 
कळेनाच  ॥

पाहिले कुणाला 
मानले आपला 
बुडत्या आधारा 
काडी जैसी ॥

पाच पन्नासाचा 
कुठे हजाराचा 
गुढ त्या मंत्राचा 
भाव केला ॥

काढली लॉटरी 
आत्मसाक्षात्कारी
सोडत ती परी 
तया नाही ॥

विक्रांत बाजारी 
घाली येरझारी
देव व्यवहारी 
सापडेना ॥

एक मन असे 
तुझ्या भांडवला 
संताचा हा सल्ला
आठवला ॥

मग धरियले
दृढ श्री दत्ताला
धन्य जन्म झाला 
एक मार्गी ॥

****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, १७ मार्च, २०२१

इथलीच माती

 


इथलीच माती

***********

इथलेच पाणी 

इथलीच माती 

पाने फुले होती 

झाडावर ॥१

एकेक करून 

पुन्हा ओघळून 

जाती मिसळून 

माती मध्ये ॥२

तैसाचि हा देह 

पेशींचा समूह 

या अस्तित्वासह 

मिरवितो ॥३

माझेपणी मी 

नसूनही मी 

भासतोय मी 

सदोदित॥४

जीवनाचे चाक 

चालते फिरते 

हलते दिसते 

जरी स्थिर॥५

शुन्यातून जन्म 

शुन्यात विलीन  

शुन्याचा गहन 

कारभार॥६

दिड्मुख विक्रांत

तुझ्या जगतात 

अर्थाच्या शोधात 

दत्तात्रेया ॥

*::::***

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
*********

सोमवार, १५ मार्च, २०२१

उडी

उडी (आयेशा साठी)
****

स्वप्न सजलेल्या वाटा 
आशा तुटल्या कड्याला 
खाई मरणाची पुढे 
मन उत्सुक उडीला 

काय वांछिले मनाने 
काय भेटले मनाला 
असे व्हावे तरी कसे 
देह विटला जन्माला 

हसू निर्मळ कोवळे 
चंद्रकिरण हसरे 
का रे अवेळीच तया 
असे ग्रहण लागले 

जन्म कळल्यावाचून 
फुल गेले ओघळून 
गंध हृदयी घेऊन 
जग निष्ठूर सोडून

बाळा तुझिया बोलात 
गोड खट्याळ हास्यात 
तुझा निर्धार मृत्यूचा 
घर करी काळजात 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, १४ मार्च, २०२१

नाम घ्यावे


नाम घ्यावे
*******

सुखाने बसावे 
राम नाम घ्यावे 
उगाच न व्हावे 
उतावीळ ॥१॥

उतावीळ होता 
धैर्य हरविता 
आलेले ते हाता 
ओघळेल ॥२॥

ओघळू न द्यावे 
उदास न  व्हावे 
पुढेच चालावे 
दृढतेने॥३॥

दृढता मनाची 
दृढता ध्येयाची 
दया त्या प्रभूची 
बरसेल ॥४॥

बरसता प्रेम 
अन्य नाही काम 
स्वानंदाचे धाम 
गवसेल ॥५॥

गवसतो दत्त
विक्रांता भक्तीत
सांगतात संत
आण घेत ॥६॥
****

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
***दत्त**

शनिवार, १३ मार्च, २०२१

आठवून दत्त

आठवून दत्त
*********:

आठवून दत्त 
मनी होतो स्वस्थ
आणि कुठे चित्त 
लागू नये  ॥१

सुखाचा पाऊस 
ओघळतो आत 
वाहतात पाट
स्वानंदाचे ॥ २

कर्पुर गौरम 
तेजस आनन  
रुद्राक्ष भूषण 
मनोहर ॥३

शिरी जटाभार 
हातात त्रिशूळ 
त्रिगुण समूळ 
नष्ट करी  ॥४

दिगंबर देही 
कमंडलू हाती 
सर्वांगी विभूती 
दाटलेली ॥५॥

सभोवती श्वान 
बागडती चार 
युगे जणू चार
नम्रभावे ॥६॥

प्रेमाची ती मुर्त 
प्रसन्न गावुली
अवनी जाहली 
प्रेमबळे ॥७॥

स्वामी जगताचा
विक्रांता विसावा 
सदैव राहावा 
ह्रदयात ॥८॥

******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

नकार नाही

नकार नाही
******:::

येण्यास तुझ्या नकार नव्हता 
जाण्यास तुझ्या नकार नाही .
क्षितिजावर रंग उमटती  
कसे कुणास ठाऊक नाही  

काय म्हणू त्या चित्रांना 
जया मुळी आकार नाही 
डोळे भरूनी घ्यावे पिवूनी
रसिकता हि नकार नाही  

ओंजळीत या पडली सुमने 
रंग गंधांवर जीव जडला
कोमेजणार होतीच कधी ती
रागावण्या अधिकार नाही

असेच असते जीवन सारे 
नित्य सवे राहणार नाही  
गत क्षणांचे रंग सुनहरी 
पण मन विसरणार नाही  

आता आताच कुस बदलली 
निज तशी ही येणार नाही 
त्या स्वप्नाचे तुकडे काही 
या स्वप्नाला मिळणार नाही  

***:*
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

प्रमेय


प्रमेय( उपक्रमासाठी )
****


एक दुपार परीक्षेची 
वहीत अडल्या भूमितीची 
विखुरलेल्या दप्तराची 
शाई सोडणाऱ्या पेनाची 
होती रेंगाळत 
हलकेच सरकत 
उष्ण झोत वाऱ्याचे 
अंगावरून वाहत 

समोर होते तेच प्रमेय 
तू सोडविलेले फळ्यावर 
केस मागे सारत 
पुड खडूची झटकत 
जणू माझ्या डोळ्यासमोर 
एक कविता होती उमलत 

तुझे शब्द होते स्पष्ट 
गृहितकही पक्के पाठ 
ओळीमागून ओळी त्या
सहज होत्या झरत

अन सुटताच ते प्रमेय 
विजय मिरवणारे तुझे ओठ 
बाईंची शाबासकी झेलत 
जगत्जेत्याच्या अविर्भावात 
तू बाकावर जाऊन बसलीस 
निसटत्या नजरेने माझ्याकडे पाहत 
माझ्या डोळ्यातील कौतुक वेचत 

ती माझी पहिली कविता 
माझ्या मनात होती नाचत 
शब्दावाचून अर्थावाचून 
मला न कळणाऱ्या 
गृहीतकांना डावलून

******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...