बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

ग्रांट मेडिकल कॉलेज


ग्रांट मेडिकल कॉलेज 
****************

मी माझ्या कॉलेजला 
त्या जि एम सि ला 
धन्यवाद कसे देऊ 
माझे हे ह्रदय  
शब्दात कसे ठेवू 

ज्ञान दिले तिने मला 
विज्ञान दिले तिने मला 
उत्कृष्ट साधन दिले
 जगण्याला 
जगात अभिमानाने
 मिरवायला 

कुण्या एका पावसाळ्यात 
आलो मी या प्रांगणात 
खरंच सांगतो पाहून तिला 
ह्रदयात लागले धडधडायला 
एवढा मोठा पसारा पाहून 
गेलो हरखून गेलो हरवून 
जरा घाबरून जरा बावरून

ओळखीचे तर कोणीच नव्हते 
पण बहुतेक सर्व हुशार चेहरे होते 

दगडात बांधलेल्या त्या
मोठ्या प्रशस्त इमारती 
अवाढव्य भव्य आरामदायी 
एक गाव होईल एवढी वस्ती
जणू काही आधुनिक 
गुरूकुलाची देखणी मूर्ती 

मग पहिला 
तो लांब-रुंद उंच शवविच्छेदनाचा हॉल 
तिथे टेबलावर ठेवलेले 
ते फार्मुलीनच्या भयंकर वास येणारे 
डोळ्याची आग करणारे
मेंदूला झिणझिण्या आणणारे
ते मृत मानवी देह 

पुढे ती अनिवार्य चिरफाड 
थोडे कुतूहल 
थोडी घृणा
आणि खूप करूणा
यांनी ओथंबून गेलेले मन 

खरंच मी क्वचितच  
स्कालपेल  हातात घेतले होते 
क्वचितच विच्छेदन केले होते 
मानवी जीवनाचे व देहाचे 
क्षणभंगुरत्व मला
व्यापून राहिले होते  

फिजिओलॉजी त्यामानाने बरे होते 
तेथे समजून घेणे होते 
एक विलक्षण जगच 
न पाहताही समोर दिसत होते 
आणि त्या मातीच्या देहातील 
ती अमाप असीम विलक्षण प्रज्ञा 
मला चकित करुन सोडत होती 
पेशी पेशीचे कार्य 
रक्तवाहिन्यांची जाळ
ती संप्रेरक ते सूक्ष्म विद्युत प्रवाह 
अवघे एखाद्या जादूगाराच्या 
गोष्टी सारखं वाटत होतं 
 
आधीच अंतर्मुख असलेले मन 
अधिकाधिक खोल जाऊ लागले होते 
या विलक्षण देहातील घडामोडी पाहून 
त्याची क्षणभंगुरता जाणून 
ते जगण्याचा अर्थ शोधू लागले होते 

मला बाहेर 
विज्ञानाची दिप्ती जाणवत होती 
आणि अंतरी अनुभूतीची गुहा उघडत होती


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

उपाधीत जगणे

उपाधीत
********

उपाधीत जगणे 
उपाधीत मरणे 
मज लाजिरवाणे 
करू नको ॥

असे रुतलेलो 
गाळी अडकलो 
मरणा लागलो 
सोडवी रे ॥

घेई देह सारा 
मनाचा पसारा 
सोडून दातारा 
जाऊ नको ॥

धावे बळेविन 
गातो गळ्याविन 
भजे भक्तीविन 
तुजलागी ॥

आलोय शरण 
तुज दयाघन 
इतुके जाणून 
हात धरी ॥

दोषांचे भांडार 
भरले अपार 
दृष्टी तयावर 
देऊ नको॥

दत्त दत्त दत्त 
हृदयात गीत 
भरो तुझी प्रीत 
कणोकणी ॥

अजून ते काही
मागणे रे नाही 
विक्रांता या पायी 
राहू दे रे॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

कोरोना योद्धा

कोरोना योद्धे
****:*****:
बंद होत्या  गाडया 
बंद होती  रेल्वे 
बंद होती विमाने 
सारे रस्ते सामसुम 
बंद सारी दुकाने
नव्हते  कुठे 
चिटपाखरू

कणा कणात भिती होती
मनामनात भिती होती 
हवेची प्रत्येक  झुळुक 
दहशत घालत होती 
भेटणारी प्रत्येक व्यक्ती 
नकोशी वाटत होती 

हि भिती  
महाभिती होती
कारण ती
मृत्यू भिती होती 
कारण
मृत्यू घेवून जाते 
सारे काही . .
तन मन 
आप्त जन 
प्रियजन 
मिळवलेले धन
मानपान 
क्षणात हिसकावून

अन आपल्यानंतर 
मागे राहिलयाचे 
काय होईन
या चिंतेचे वादळ.
राहते मन व्यापून

या सार्‍यात 
स्वीकारलेले कर्तव्य 
प्राणपणाने निभावनारे 
मरण समोर असूनही 
ठामपणे उभे राहणारे 
जे काही लोक होते 
ते सामान्य असूनही
असामान्य होते
ते खरोखर योध्देच होते 

ते हि पळ काढू शकत होते 
घरात लपुन राहू शकत होते 
नोकरी तर जाणार नव्हती 
शिक्षा मोठी होणार नव्हती 

जीवापेक्षा इथे काय मोठे असते 
जीवावर येताच 
माकडी हि पिलावर उभी राहते 

म्हणुनच
प्राण पणाला लावणार्‍या
या महावीरांना 
घेतलेले वाण 
निर्धाराने निभावणार्‍या
या परमवीरांना 
लाख लाख सलाम.

******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********







.

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

उशीर (उपक्रमासाठी)

वेडा वृक्ष हा आता वठून गेला आहे 
पान पान सांडून जळून गेला आहे 
येता येता किती तू उशीर केला आहे 
वर्षाराणी जन्म हा सरून गेला आहे

एक एक बिंदू दवाचा वेचून जगत होतो 
पान पान वाचवत वाट पाहत होतो 
दिसायची दूरवर तू क्षितिजी मिरवतांना 
सावळ्या त्या बटावर स्वप्न उधळत होतो 

काय तुवा कळलेच ना हे अंतर जळत होते  निशिदिन स्मरत तुजला जणू तप करत होते झालोय असा बदनाम या प्रेमास जग हासते सरणासाठी फांद्यावर कुऱ्हाड आता चालते 

नाही कसे म्हणू मी तुवा अनंत दिधले होते कितीतरी ऋतू सुखाचे  देहात माळले होते  
येणे तुझे सुखावत झाड चिंब भिजले होते
तुझ्यासाठीच फांदीवर मखमल ल्यायले होते 

गेलीस कधीतरी तू पुन्हा आलीच नाहीस
न कळे कुठल्या जगात  हरवली होतीस
आलीस आता स्मरूनी वा सहजी अशी तू 
पण आता सांग इथे कुणा कशी भेटशील तू
********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

पाहीले समर्था

पाहीले समर्था
***********

पाहीले समर्था 
स्वप्नीचिया सृष्टी
आनंदाची वृष्टी 
झाली जणू ॥१

कौपिनधारीन
शांत यतिरुप 
साजिरे स्वरूप 
तेजोमय ॥२

होते देवघर 
अज्ञात कुठले 
आसनी बसले 
गुरूराय ॥३

वदले मजला 
घे रे घे मागून
इच्छा पुरवून 
मनातली ॥४

कळल्या वाचून 
पदी कोसळून
घेतले मागून 
तेच पाय ॥५

ठेवा निरंतर 
याच या पदाला 
अन्य ते मजला 
नको काही ॥६

पाठी पडे थाप 
डोईवर हात 
जाहला कृतार्थ 
विक्रांत हा ॥७

***
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

गाडे

गाडे
****

अडलेले गाडे माझे 
अजूनही अडलेले 
पाठीवर ओझे अन् 
पाय खोल गाडलेले ॥
 
अंधुकशा दिशा सार्‍या
तारे तमी काजळले
हाके नच प्रत्युत्तर 
दीप सारे विझलेले  ॥

वाटाड्या तो येईल का ?
घेऊनिया जाईल का ?
किंवा इथे असाच हा 
मार्ग माझा खुंटेल का ?॥

घनघोर प्रश्न मनी 
काळजाचे पाणी पाणी 
डोळ्यांमध्ये प्राण सारे 
अन मौन आळवणी ॥

फांदीवर बसलेले 
पाप माझे हसते का ?
पायाखाली वळवळ 
कर्म माझे डसते का ?॥

दाटलेले जागेपण 
कणोकणी हाकारते 
पापण्यांशी वैर तरी 
दृष्टी सदा पाणावते ॥

वाट पाही विक्रांत हा 
शीत घेई अंगावरी 
हरकत नाही मुळी 
मरूनिया गेला तरी ॥

जागेपण राहो पण 
डोळ्यांमध्ये भरलेले 
दत्त पदी नवा जन्म 
स्वप्न तेच उरलेले ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

अक्का


अक्का
*******
तुझिया रुपात 
मूर्तिमंत कष्ट 
होते ग नांदत 
घरात या  ॥१॥
परी त्या कष्टाचे 
तुजला न भान 
जीवनसाधन 
जणू काही  ॥२॥
चार भिंतीच्या या
जगात रमली
आणिक सरली 
गाथा तुझी ॥३॥
जर का कधी  तू
पडती बाहेर 
झेंडा जगावर
उभारती ॥४॥
होतीस हिरा तू
मुकुटा वाचून
तेज न जाणून
आपुले ग ॥५॥
अपार तुझिया 
 प्रेमात वाढत
आकाशी उडत
गेलो उंच ॥६॥
हातात आता या 
हजार चांदण्या 
परी त्या पाहण्या 
नाहीस तू ॥७॥
जरी  उलटली
तपे दोन माय 
येते तुझी सय 
सदोदीत ॥८॥
जन्मजन्मांतरी
भेट तुच आई
अन मज घेई
कुशीत ग॥९॥
आई वाचुनिया 
नसतेच घर 
विक्रांत माहेर 
जिवाचे या॥१०
***********-

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********




वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...