शनिवार, २३ जानेवारी, २०२१

उदयस्त


उदयस्त
******
उगवतो सूर्य रोज 
रोज आणि मावळतो  
असे आम्ही उगाचच 
रोज रोज रे म्हणतो

खरंतर सूर्य कधी 
इथे उगवत नाही  
मावळणे बात तर 
मग फार दूर राही 

पृथ्वीचे फिरणे जर 
कधी थांबले असते 
तथाकथित हे असे
दिस घडले नसते  

तर काय कदाचित 
काळ थांबला असता  ?
सृष्टीचा चार्ज रिचार्ज 
सुद्धा घडला नसता  ?

हे नियम जीवनाचे
जगण्याचे मरण्याचे 
दिसती जरी युगांचे
असती काय कामाचे ?

उगवता दिस नवा 
मी ही नवा उगवतो 
अंतरात या तोवरी
तम अज्ञान असतो 

तर  मग काय इथे
मीच विश्व प्रसवतो 
भासमान स्मृतीतून 
उभा डोलारा राहतो.

होते आहे अस्तित्वात
जग हे कश्यावरुन
नसे सुर्य चंद्र तारे 
काहीच माझ्यावाचून 

शब्द शुन्य अर्थशून्य 
जगण्याचा भास शुन्य  
जी न घडलीच कधी  
गोष्ट काय असे अन्य  ?

नाव शुन्य गाव शुन्य 
विक्रांत हा भाव शून्य  
दाटलेल्या व्योमी भासे  
घनदाट महाशून्य .

जाणिवेने जाणलेला 
लय विलय ही नाही  
जाणण्याचे गूढ कोडे 
जाणणारा मी ही नाही.


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

अंगिकार

अंगिकार
*******

माझा अंगिकार 
करा ज्ञानदेवा 
जाणुनिया भावा 
शब्दातल्या ॥
तुमच्या गावाचा 
करा वारकरी 
भरुनिया  उरी
भक्तिभाव ॥
तेथे मी राहीन 
तुजला पाहीन 
सुखाने गाईन 
किर्ती तुझी ॥
देईल ते काम 
देवा मी घेईन 
अवघी झाडीन
जन्म कथा ॥
देई संत संग
किर्तनाचा रंग 
नामी होय दंग 
ऐसा करी ॥
विक्रांत चालला
दिशाहीन कुठे 
घेई तुझ्याकडे 
ओढुनिया ॥
****

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********


शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

मद्यपी

मद्यपी
*****

सोडुनीया हात माझा 
दत्ता मज टाकू नको 
मद्यपी जरी करंटा 
गटारात फेकू नको ॥

झोकती मी प्याले इथे 
सुख त्यात झिंगलेले 
घोट घोट रिचवतो 
सवे दुःख तळलेले ॥

सुटता लगाम जैसा 
अश्व जाई उधळला 
जीभ मन मग जाते 
कुचाळांच्या गावाला ॥

पोटातल्या शिव्या येती 
उतूनिया या ओठाला 
मद्य संग टाळ्या पिटी 
आत्मभान नसलेला 

जाणतो तो नरक रे 
खेचला पण जातो रे 
विस्मृतीचे क्षण सुख 
मी मलाच चारतो रे 

उतरता नशा रोज
पिटुनिया डोके घेतो
आतड्यांचा पीळ अन
वेदनात वाकवतो 

ऐकली मी नशा तुझी 
यदु अर्जुने झोकली 
चिंतनात मदालसा
जग सारे विसरली 

येई बाबा हो कलाल 
आस मज ती लागली 
देई नशा तुझी ऐसी
एका घोटी दडलेली 

झिंगलेला विक्रांत ह‍ा
घेत तुज माथ्यावरी 
तुझे नाव गर्जतांना
जाऊ दे जगदांतरी .


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

चैतन्य


चैतन्य
*****

इंद्रायणी तीरी 
विश्वाचा गाभारा 
देव ज्ञानेश्वरा 
मांडलेला ॥१॥

ज्ञानियाचा राजा 
त्रैलोकाच्या वोजा 
भक्ताचीया काजा 
नित्य जागा ॥२॥

आठशेहून ती
उलटली वर्ष 
दिव्यत्वाचा स्पर्श
तरी तोच ॥३॥

थकल्या वाचून
आभाळ होऊन 
भक्तीचा घेऊन
ओघ येतो ॥४॥

चैतन्य कोवळे 
अखंड झळाळे 
पाहणारे डोळे 
सुखावती॥५॥

विक्रांत वेचतो 
तयाचे ते कण 
आनंद होऊन 
शब्दातीत॥

*+*+*
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, १७ जानेवारी, २०२१

पतंग




पतंग
*****
प्रारब्धाची चक्री
कर्माची ती दोरी
उडे नभांतरी 
पतंग हा ॥१॥

ताणलेली काडी
अहंने भारली
स्वप्न सजलेली
कागदाची ॥२॥

कधी गरगरे 
कधी भिरभिरे
जीवनाचे वारे 
झेलुनिया ॥३॥

कधी  बसे ताण 
कधी मिळे ढिल 
वारीयाचे बळ 
पेलतांना ॥४॥

चाले काटाकाटी 
मांजा गुंतागुंती
कुणा न माहीती 
कुणा जित ॥५॥

क्षणी फडफडे 
क्षणी घरंगळे 
सोडून थोरले
आकाश ते ॥६॥

वाचून नभाचा
होणे रे नभाचा
जन्म पतंगाचा 
सार्थ तेथे  ॥७॥

आणि खेळविता 
कळताच दत्त 
होणे शांतचित्त  
यथास्थानी ॥८॥

विक्रांते जाणिला 
यत्न साकळला
दत्तास अर्पिला  
सर्वभाव ॥९॥
.********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 





बुधवार, १३ जानेवारी, २०२१

सुटू दे ग्रहण

 सुटू दे ग्रहण
*********

सुटू दे ग्रहण 
जन्ममरणाचे 
जन्म प्रकाशाचे 
नाव व्हावे ॥

कितीदा ग्रासती 
तेच राहू-केतू 
वासनेचा सेतू 
बांधुनिया ॥

तेच कामक्रोध 
तेच राग लोभ 
मद अन दंभ
झोंबतात ॥

देई रेआकाश 
निष्कंप निर्वात 
महाशून्य ज्यात 
पहूडले ॥

असण्याची व्यथा  
नसण्याची कथा 
अवघीच गाथा 
हरवून ॥

विक्रांत सावली 
स्मृति हरवला 
असो मिटलेला 
तुझ्यात  रे ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

हजार गाणी

हजार गाणी
**********

हजार गाणी दत्ताची 
नाहीत मुळी कामाची 
जर का  तयात भेटीची 
तळमळ नाही ॥

हजार नावे दत्ताची 
जणू की बोल यंत्राची
अवघा झाला शीणची 
उगा येता-जाता॥

हजार गावे दत्ताची 
परिक्रमा ती व्यर्थची 
जे का  भटकंतीची 
हौस पुरवू जाती ॥

हजार दिल्या दक्षिणा 
भोजने अथवा ब्राह्मणा 
ठेवून मनी कामना 
पायी धोंडा मारती॥

ऐसे प्रेमे उमलून 
यावे हृदय भरून 
दत्त वदल्या वाचून 
जावे की तरुन॥

मी तू पण सारे हरवून 
आत्मरंगी त्या रंगून 
जावे दत्तची होऊन 
दत्त भजतांना॥

दत्त सांगे विक्रांता या 
ऐसे प्रेमे भजावया
भाव उपजे ह्रदया
तीही कृपा तयाची॥

.********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...