सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

मरण

झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी

मरण
*****
असे हवे रे
सुंदर मरण  
ज्यात ओघळून 
जाईल जीवन

असे असावे 
सहज मरण  
अट्टाहासावीन 
जगणे अजून

हळूच जावे 
कोणी फुंकून
ज्योत इवली 
सायासाविन 

होती ज्योत हे
कळल्या वाचून
घन तिमिरात  
जावी बुडून

काही तडफड 
झाल्या वाचून
वलय जावे
विलय होवून 

जसा उमटून
जातो हरवून
शब्द नभात
उरल्यावाचून

उरते स्मृति का
कुण्या फुलाची
खुण राहती
वा मृग सरीची 

हे आनंदाने
गाणे सजले
आनंदात च
व्हावे सरले 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********


 

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

ज्ञानदेव माय


 ज्ञानदेव माय
**********
नाही डोक्यावर 
पडला तो हात 
ज्याने हा विक्रांत 
नाही होय  ॥१॥
बहुत ऐकली 
कोणाची ती कीर्ती 
स्वाधीन ती शक्ती 
जया असे ॥२॥
परी दगडास 
मिळाली ना स्फूर्ती 
मिटली ना वृत्ती 
देहातील ॥३॥
म्हणतात कोणी 
बीज रे पेरले 
होय उगवले 
एके दिनी ॥४॥
घडो ते घडणे
कुणाला कळणे 
जीव तहानेने 
व्याकूळला ॥५॥
बसली पंगत 
उपाशी विक्रांत 
तोंडावर हात 
ठेवलेला ॥६॥
ज्ञानदेव माय 
झडकरी येत 
घास या मुखात 
घालना ग॥७॥
हट्टी या बालका 
नको रागावूस 
सोडून देवूस 
गर्दीमध्ये ॥८॥
शोध ग मजला 
धरी ग हाताला 
घेऊन घराला 
जाय पुन्हा ॥९॥
********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

कोरना काळातील कविता



कोरना काळातील कविता 
(कोरोनाकाळात बरेच निर्बंध होते लिहायला म्हणून ही कविता प्रकाशित करायचे राहिली होती  )
****
मरतात जन 
धडाड येऊन 
श्वास अडकून 
कळल्यावाचून ॥

येतसे मरण 
होय आक्रंदन 
पीईपी कुणास
प्लास्टिक कफन ॥

येतात सयंत्रे 
मागणी वाचून 
जागा न ठेवाया 
राहती पडून ॥

नवीन सामग्री 
नवीन कॉन्ट्रॅक्ट  
संधीसाधू च्या 
अवघे खिशात ॥

जयाची पॉलिसी 
तया मिळे जागा
इतरांचे माथी
नशिबाने भोगा 

भरे प्रायव्हेट 
हॉस्पिटल ऐसे
चार गोळ्या खात
रिते झाले खिसे 

भितीचे सावट 
कुणा भांडवल 
भुके मरू गेले
कुणी ते कंगाल

रडतात मुले 
बायका रडती 
धास्तीत पळती  
शेजारी दडती 

कोण लावतोय 
बाजी ती जीवाची 
झोकून स्वतः घे 
काळजी जगाची 

आणि कुणी घेतो 
श्रेय ते फुकट 
वशिला लावून 
ट्रॉफीच्या सकट 

मरण तांडव
जगाने पाहिले
कुणाच्या स्वार्थाने 
हाताने ओढले

लागण होऊन 
जगले वाचले 
पुढे तयासाठी
काय ते ठेवले 

सांगेन काळ ते 
तोवर प्रार्थना 
जगता सांभाळा 
दत्त दयाघना


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

दत्त दर्शन


दत्त दर्शन (व्हिडिओ वर)
*******
पाहियला दत्त 
डोळा मी भरून 
घडले दर्शन 
तंत्रज्ञाने ॥
जाहले दर्शन 
सुखावले मन 
सुयोग जुळून 
आला आज ॥
पाहिला कृष्णा-
माईचा प्रवाह 
शुचिर्भूत देह 
जणू झाला ॥
तोच आवडता 
सुंदरसा घाट 
मंडपाचा थाट
मनोहर ॥
गुरुदेव मूर्ती 
पादुका वरती 
सुख जागवती 
ह्रदयात ॥
गौराईचे प्रेम 
ठेवून स्मरण 
दिली घडवून 
भेट ऐसी ॥
विक्रांत देतसे 
धन्यवाद साचे 
आशिष दत्ताचे 
सदा तुज ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

वाट

वाट
****

काय माझे मन 
कळेना तुजला 
विसरून मला 
गेलीस का ॥
शोधतो मी वाट 
येण्या तुझ्याकडे 
परी ना सापडे 
काही केल्या ॥
रोज तुझे स्वप्न 
पाहतो मी डोळा 
भेटीचा सोहळा 
कल्पनेत ॥
थकलेले तन 
विझलेले मन 
जगण्याचा शीण
कणोकणी ॥
बांधलेले पाय 
संसार चक्रात 
कर्म कचाट्यात 
जणूकाही ॥
बोलाव गं माय 
मज माहेराला 
तुझिया कुशीला 
आसावलो ॥
विक्रांत मानस 
विरक्त विराण
चैन तुजविण 
मुळी नाही ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

ज्ञानदेव चित्ती


ज्ञानदेव चित्ती 
***********
ज्ञानदेव चित्ती 
ज्ञानदेव वृत्ती 
ज्ञानदेव श्रुती 
भरुनिया ॥१॥

ज्ञानदेव मति 
ज्ञानदेव धृति
ज्ञानदेव कृती 
होऊनिया ॥२॥

ऐसे ज्ञानदेवे 
मज वेटाळले 
रावुळ हे झाले 
अंतरंग ॥३॥

घेणे-देणे सारे 
मावळून प्रीती 
हरवू पाहती 
तया तेजी ॥४॥

विक्रांत नावाची 
जड ही उपाधी 
आहे या जगती 
तया प्रेमे ॥५॥

************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

मौन जाग

मौन जाग
*******

सारे काही पाहिलेले
जाणिवेत उरलेले 
मौन मनी उमलून
जग सरो स्वप्नातले 

निखळशी मौन जाग
क्षणांमध्ये ओतलेली 
अंधारल्या नभातून 
उषा व्हावी फुटलेली 

उगीचच विचार हे 
फुटकळ वाहतात 
त्याचं त्याचं चाकोरीत 
नवे भासमान होती  

आपसूक अंत तया
तरंग  विलय व्हावा 
घनदाट मौन डोह 
शांत नितळ  उरावा

काहीतरी होण्याचा हा
क्षोभ ही मिटून जावा
उगमाशी जाउनिया 
मौन मोड अंकुरावा


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...