रविवार, १३ डिसेंबर, २०२०

ज्ञानदेव चित्ती


ज्ञानदेव चित्ती 
***********
ज्ञानदेव चित्ती 
ज्ञानदेव वृत्ती 
ज्ञानदेव श्रुती 
भरुनिया ॥१॥

ज्ञानदेव मति 
ज्ञानदेव धृति
ज्ञानदेव कृती 
होऊनिया ॥२॥

ऐसे ज्ञानदेवे 
मज वेटाळले 
रावुळ हे झाले 
अंतरंग ॥३॥

घेणे-देणे सारे 
मावळून प्रीती 
हरवू पाहती 
तया तेजी ॥४॥

विक्रांत नावाची 
जड ही उपाधी 
आहे या जगती 
तया प्रेमे ॥५॥

************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

मौन जाग

मौन जाग
*******

सारे काही पाहिलेले
जाणिवेत उरलेले 
मौन मनी उमलून
जग सरो स्वप्नातले 

निखळशी मौन जाग
क्षणांमध्ये ओतलेली 
अंधारल्या नभातून 
उषा व्हावी फुटलेली 

उगीचच विचार हे 
फुटकळ वाहतात 
त्याचं त्याचं चाकोरीत 
नवे भासमान होती  

आपसूक अंत तया
तरंग  विलय व्हावा 
घनदाट मौन डोह 
शांत नितळ  उरावा

काहीतरी होण्याचा हा
क्षोभ ही मिटून जावा
उगमाशी जाउनिया 
मौन मोड अंकुरावा


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

वृक्ष

वृक्ष
****

कृपेचे सिंचन 
करी ज्ञानदेवा 
सोनियाचा व्हावा 
वृक्ष माझा ॥१॥

आकाशाचा माथा 
चुंबण्यास जावे 
कैलास पाहावे 
डोळाभर ॥२॥

पानोपानी तुझी 
अक्षरे उतरो 
अंतरात भरो 
प्रेम भाव ॥३॥

चैतन्य वर्षाव 
प्रकाशाचा स्तंभ 
व्हावे अंग अंग 
उमलून ॥४॥

देई कोवळीक
तांबूस मृदुल 
उन्मेषाचे खुळ 
लागोनिया॥५॥

दत्त त्रिकुटात 
माय हृदयात 
आदेश विक्रांत 
कणोकणी ॥६
****

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********
**********

सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

चित्र

चित्र

****

हरवली चित्र काही 
नवी काही उमटली 
विस्मृतीत डंख गेले 
घाव काही नवे गात्री

मन वेडे असेच हे 
सुखासाठी लाचावले 
आणि कुण्या कटाक्षाने 
उगाची घायाळ झाले 

तीच धाव ठाव जरी 
तेच पांढरे रिंगण 
तोच अंत अर्थहीन 
पण अधीर जीवन 

काळजात खोलवर 
एक उदास दालन 
पेटलेले दीप मंद 
घन दाटलेले मौन

झंकारती सुर काही
रव येता कानावरी 
निःशब्दश्या कल्लोळाचे 
प्रश्न उमटती  उरी


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

एक आकाश

 निळे आकाश
***********

एक निळे आकाश उघडले 
अन अंधारातील पाखरांना 
जाळ्यात जखडलेल्या पंखांना 
जगण्याचे मर्म कळले 

सोडवत नव्हते संस्कार 
हजारो वर्षांचे 
सोडवत नव्हते पाश
मानलेल्या गुलामीचे 
पण कळून चुकले होते 
आता नाही 
तर कधीच नाही 

सूर्य तळपत होता 
शब्द परजत होता 
प्रकाशाचा अर्थ 
गवसत होता 
कणाकणात दाटलेला 
तम  निवळत होता 

खरेतर त्यांना द्यायचा होता 
पर्याय नसलेला पर्याय 
कुठलीही दिशा 
न दाखवणारी वाट 
कुठलाही फलक 
नसलेले देवालय 

पण आधाराची 
सवय असलेले आम्ही 
आम्हाला ते शक्य नव्हते 
निराधार होऊन 
सारे काही सोडून 
पंख पसरून 
स्वतःला देणे सोडून 
वार्‍याच्या झोतावर
म्हणून मग त्यांनी 
हाती दिला एक 
सहज तोडता येणार दोर 
अत्त दीप म्हणत 
भिरकवता येणारा 
प्रत्येक आधार
एक पर्याय म्हणून 

पण आता  
मुक्तपणे उडतांना 
स्वतंत्र  श्वास घेताना 
एक भय  आहे मनात
या पर्यायी दोरीची
एक शृंखला
एक पाश होऊ नये 
कधी भविष्यात 
आमच्याकडून 

********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

गाभाऱ्यात राज्य.

गाभाऱ्यात राज्य
**************
सरले हे शब्द 
सरली ही पूजा 
केला गाजावाजा 
भक्तीचा मी ॥

जाहले लिहून 
जगाला सांगुन 
गाणी उधळून 
सभोवार ॥

जाहला आनंद 
काही लिहण्यात 
काही भोगण्यात 
भाव मनी ॥

परी सारे होते 
आत्म संमोहन 
जणू दिवा स्वप्न 
रंजक ते ॥

वारांगना प्रीत 
केली खंडीभर 
डोळा लाभावर 
ठेऊनिया ॥

आता मज नको 
भीतीची ती भक्ती 
याचनेची रिती 
दांभिक ती॥

विक्रांत उन्हात 
बसे अंगणात 
असो गाभाऱ्यात 
राज्य तुझे॥
*******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, २ डिसेंबर, २०२०

दिवा मातीचा

दिवा मातीचा
*****
दिवा मातीचा मातीचा 
एका पेटल्या मातीचा
एक लहरी फुंकर 
म्हणे आजचा उद्याचा

 नको उगा फडफडू 
ज्ञान अंधाराला सांगू 
चार पाऊले अंतर 
कुण्या पांथस्थाला दावू 

कुणी येईल उबेला 
तया सांगावे वेड्याला 
घेई पेटवून टेंभा
मग लाव शेकोटीला

दिवा जळतो म्हणून 
जगा प्रकाश मिळतो 
तया प्रकाशात परी 
अहं तयाचा नसतो 

तसे जळावे अंतरी 
दैन्य जगाचे पाहुनी 
स्नेह करुणा वातीनी 
जगा जावे उजळूनी

हेचि मागतो मी दत्ता 
हेचि दान दे विक्रांता 
ऐसी करुणा दे चित्ता 
द्यावे सहज जगता

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...