शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

झेलणारा दत्त

झेलणारा दत्त .
***********
राजा बोले दळ हाले 
कणखर मान डोले 
सारे ठाव बोललेले 
ज्ञान थोर भार झाले 

नवे काही नसुनिया 
सुरामध्ये  सूर चाले
होय होय हेच खरे
होयबाचे झाड डोले

तेच सूर तोच ताल 
घोटलेले तेच बोल 
चढताच वर पट्टी 
कानाखाली दिसे ओल 

हो रे बाबा हेच जिणे
पोटासाठी प्यादा होणे 
तुझा मान तुझे भान 
रद्दीमध्ये गुंडाळणे 

डोईवर छत्र नको 
हुजुरे ते मित्र नको 
रंगुनिया लाख गेले 
त्यात तुझे चित्र नको 

आतमध्ये बसलेला 
त्याच्यासाठी मान डोल 
गादीवर बसल्याचे
उद्या होय शून्य मोल  

सारे काही जाणुनिया
कारे तुझ्या पायी दोरी 
विक्राता रे उडी मारी 
दत्त झेले हातावरी 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

गिरणार याद

गिरनार याद
*********

गिरनार वारा 
उनाड भरारा 
पाऊस पसारा 
मनामध्ये ॥

गिरनार धुके
दृश्याचा पडदा 
दत्ताला शोधता 
खेळ खेळे॥

गिरनार झाडे
जणू की तपस्वी
जिवंत मनस्वी
भाग्यवान॥

गिरनार पशू
उ:शाप भोगती
कर्म मुक्त होती
आपोआप ॥

गिरनार माती 
भक्ताचिया भाळी
भस्माची लावली 
त्रिपुटीच .॥

गिरनार साधू 
सगे सोयरे ते
अग्नी तत्व तेथे 
देही नांदे ॥

गिरनार मनी 
विक्रांत हा जनी
कृपेची वाहणी 
तरी होय ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

वही

वही
*****

माझ्या कवितेची ही वही 
आता भरत आलेली आहे 
या वहीची बरीच पाने ही 
आताशा सुटत चालली आहे.

खरं तर खूप काही लिहायची 
ती उर्मी ही आता विरत आली आहे 

जरी अजूनही सवयीने 
काही शब्द मनी रुंजी घालतात 
काही यमके काही कल्पनाही 
आतून रुजून सजून बाहेर येतात 

तेही एक ऋतुचक्रच आहे
मन असे तोवर चालूच राहणार 
आपण आपल्या सुखदुःखात 
गोल गोल गिरक्या घेत बसणार 

माझी वही ही नाही तुकोबाची 
नाही नामदेव ज्ञाना चोखोबाची
म्हणूनच आकाशाला भिडलेली 
स्वप्ने नाहीत मुळीच तिची 

माझी हि वही  रेघोट्यांची 
डोंगर सूर्य झाडे आणि नदीची 
माझ्यापुरती माझ्या जगाची 
जुळल्या मळल्या सुटल्या शब्दांची 

जर कदाचित उद्या तुला 
माझी वही सापडली तर 
अन वरचे पान काढून तू जर 
चिटकवले तुझे पान त्यावर 

काहीच फरक नाही पडणार 
ती वही तुझीच असणार 
आणि कदाचित लिहिलीस तू 
स्वतःचीच काही रेखीव अक्षर 
तरी ती वही माझीही असणार 

म्हणूनच हे शब्द ही अक्षरे या कविता 
मी माझ्या मानल्याच नाही आजवर 

फक्त या वहीला होणारा
या पेनाचा स्पर्श 
त्या संवेदना त्यातील जिवंतपणा 
मला कळतो समजतो 

या क्षणात त्या चांदण्यात 
तिच्या अस्तित्वाचा अर्थ 
आणि प्रश्नार्थ
तिच्या सवेत माझ्यातही उमटत असतो.

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

दत्ताचिये पायी


दत्ताचिये पायी 
***********
मान-अपमान 
सुख-समाधान 
टाकले वाहून 
दत्ताचिये पायी ॥
 
झाली उठाठेव 
सारा काथ्याकुट 
कारणा सकट 
दत्ताचिये पायी ॥

सुखाचे आसन
भोगाचे दालन
कर्तव्यपालन 
दत्ताचिये पायी ॥
 
जगलो जीवन 
कारणा वाचून 
कारणे पुसून 
दत्ताचिये पायी ॥

असलेल्या खंता
हरवल्या चिंता 
पुरा झालो रिता 
दत्ताचिये पायी  ॥

जाहलो मोकळा 
पाहतोय डोळा 
जीव हा रंगला 
दत्ताचिये पायी ॥

नावाचा विक्रांत 
जगरहाटीला 
फुगा फुटलेला
दत्ताचिये पायी ॥

***==***
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
 

दत्त दिवाळी

दत्त स्मरण दिवाळी 
दत्त भजन दिवाळी 
दत्त नमन दिवाळी 
माझी नित्य रे चालली ॥

दत्त पूजेने मानस 
घडे अभ्यंग ते स्नान 
दत्त कृपेचे प्रेमाचे 
नित्य लावतो उटण ॥

दत्त नामाचा फराळ 
सांगू किती रुचकर 
जीभ लाचावते सदा 
माझे अथांग उदर ॥

दत्त घोषात घुमती 
देही फटाके फुटती 
आत प्रकाश लाटांनी 
सप्त लोक उजळती 

मन रेषेत चालते 
जणू आखली रांगोळी 
वांच्छा मंगल पवित्र 
कणा-कणात उजळी ॥

चाले औक्षण सप्रेम 
जीवा कडून शिवाचे 
तनमन धनासवे 
झाले अर्पण सार्‍याचे ॥ 

ओळ दिव्यांची अंतरी 
ऐसी विक्रांत लागली 
दत्त पूजन आनंद 
घडे मंगल दिवाळी ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

ती माणसं

ती माणसं
*******
होय माणसं सगळी
आपलीच  आहेत ती 
उरात झेंडा द्वेषाचा 
का वाहत आहेत ती ॥

होय माणसं सगळी
चांगलीच आहेत ती 
लेवून संस्कृती भिन्न
का वेगळी आहेत ती ॥

पांघरणे गाफिलता
अतिमूर्खता आहे ती
मित्रात काफिर पाहू 
का लागली आहेत ती ॥

वाचलेस नच का रे
इतिहासी व्रण किती
धर्माध संगिन नग्न
का वाहती आहेत ती ॥

झाले ते ही बरेच कि
डोळे आहे उघडती 
अजुनही किती आया 
भगिनी ते पळवती ॥

महावृक्षावरी माझ्या
घाव सांग झेलू किती 
शोषती ते संपन्नता 
वार अनंत करती ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

दत्त आषाढ

दाटला आषाढ 
पुन्हा अंतरात 
उघडला दत्त 
कृपा मेघ॥

सरले आर्जव 
चातकाची आस 
मृगजळ ध्यास
तृषार्थाचा ॥

सावरली लाज 
येऊनिया आज 
करूणेचा साज 
लेवविला ॥

आता  मी निवांत
जाणीवेच्या आत
बसतो पाहत
दत्ता तुज ॥

विक्रांत कृपेचा 
कण हा पातला  
क्षण प्रकाशला 
दत्त रुपी ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...