रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

गिरनार वाट


गिरनार वाट
********

गिरनार वाटेला
पडावी पाऊले 
ह्रदय  भरले
घेवुनिया ॥

मनाचे जन्माचे
तुटावे संशय 
वेदना विलय 
नामी होत ॥
 
मिळावे आशिष 
साधूंचे भक्तांचे 
दृश्य-अदृश्याचे 
माथ्यावर

भरावी ओंजळ 
आपली इवली 
पुण्य साठवली 
अगणित 

प्रत्येक पुनवी
चंद्रमणी होत 
जावे हरवत
दत्त रुपी 

विक्रांत भाग्याचा 
नमीली पायरी
रिघला शिखरी
तया कृपे

दत्त सांभाळता 
झाला स्विकारता
पथी चालविता
पतिताला ॥
***************
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

इवले बिंदुले

इवले बिंदुले
नभी उमटले 
तम मावळले 
अज्ञानाचे ॥१

प्रकाश प्रकाश 
डोळियांच्या आत 
बघण्याची वात 
पाजळली॥२

मी पण एकटे 
उरे दशांगुळे 
निर्वाती संभाळे
आपणाला ॥३

गेली यायायात 
विरे व्याकुळता 
सलणारी व्यथा 
शुन्यी लीन ॥४

नसण्याची गाथा 
झाली सर्वव्यापी 
विक्रांत नुरली 
सांगावया ॥५

सिद्ध सदा दत्त 
उपाधी रहित
जाणिवे सहित 
कळो आला ॥६
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

विहीर

विहीर
***

तुझी सुखाची विहीर 
काळया चिऱ्यात बांधली 
पाणी भरून शेंदून 
भिंत ओली चिंब झाली॥

रोज मारून चकरा 
नाही  रांजण भरत
तुझे दुःखाचे रहाट 
फिरे कण्हत गंजत ॥

किती पडल्या रडल्या 
किती बुद्ध्याच सांडल्या 
जन्म उपसणे सारा 
अंती झिजल्या बादल्या .॥
 
तुझी कथा विहरीची 
खोल कातळ पाण्याची 
जाणे घडो वा न घडो
घडा बांधल्या दोरीची ॥

काय सांगू सई बाई 
पाणी भरता तू घरी
तुझ्या स्नेहाच्या ओलीने
सुख तराराते दारी ॥

तुझ्या काचल्या हाताने
जीवा जीवपण येते
तुझ्या सर्वस्व शिंपणी
जग हिरवे हे होते.॥

कुणा कळावी हि माया 
तुझ्या अंतरी दाटली
कष्ट काबाडली काया 
प्रेमे घरात झिजली ॥

***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

एक कविता

एक कविता
********
एक कविता 
मला माझ्यातच 
दिसते आहे आता 
पण ती कविता 
मला लिहिता येत नाही आता
माझ्यातील ही कविता 
आकाशातील शब्दासारखी 
आकाशात गुरफटलेली 
श्रवणाचे कान तिला 
भेटत नाहीत आता 

तिला न भेटत 
स्पर्श लेखणीचे  
शुभ्र पानाचे 
उद्गार वाहवाचे

तरिही ती असते 
नटून-थटून 
आपलेपणात 
आपलेच अस्तित्व 
सहज सजवत 
खरतर
ती कविता 
मीच असतो 
माझ्याशिवाय 
मला वाचत .

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

दत्त दरवेश


दत्त दरवेश
*********

दत्त होत दरवेशी 
मज नाचवी जगात 
खेळ दाखवी हसवी 
दोरी घालून नाकात 

उड्या मारवी सुखाने
दुःखे लोळवी मातीत 
कधी लढाई खोटीच 
छाती उगा बडवीत 

जशी वेसन हलते 
तसे शरीर वाकते 
अशा अगम्य खेळात 
पशुपण विसरते 

कुणी म्हणती तयास 
क्रूर किती दरवेश 
कुणी करती कौतुक 
त्याचा पाहून आवेश 

मज कळे शरणता 
पाहे अहंता मरता 
मनी सुखावतो किती 
देव सांभाळे विक्रांता.

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

बासरी

बासरी
******
माझिया देहाची 
होऊन बासरी 
वसू दे रे मज 
तुझिया अधरी ॥

तुझिया श्वासाच्या 
मधुर फुंकरी 
रितेपणा भरो 
स्वर्गीय लहरी ॥

आणिक काहीच 
मजला नको रे  
तुझिया रुपास
जीव हा जडो रे

तसा तर वेत 
हा आहे इवला 
पोकळ केवळ 
छिद्रांनी भरला 

फुंकता प्राण तू
होईल जागता 
माझे मी पण हे
मज ये जाणता 

तुझीच कृपा ती
केवळ कान्हाई 
आणेल मजला 
तुझ्याकडे  माई 

एकाच श्वासाचा 
दे एकच स्वर 
एकाच स्पर्शाचा 
दे स्वर्गीय वर 

होईल सार्थक 
मग या जन्माचे 
अनाथ अनाम 
पोकळ वेळूचे 
*******

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https:// Kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

कोजागिरीला!!


कोजागिरीला
***********

उलटून रात्र गेली 
माझे नेत्र आहे जागे 
अजून जागणे का रे 
माझे होत नाही जागे 

झरतो नभात चंद्र 
बघ थेंब अमृताचे 
झेलतो मी देहावरी 
का होत नाही रे माझे

हि आकाश  व्यापलेली 
उज्वल शुभ्र वेदना 
तिमिरास दे उठाव 
ती तुझीच रे कामना 

मी मागतो न तुजला 
उत्सव या गात्रातला 
हा देह मिटून जावा 
होत चांदण्याचा शेला

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...