रविवार, २१ जून, २०२०

मनीचे वस्त्र

मनीचे वस्त्र
**********

माझिया मनीचे 
वस्त्र हे घडीचे 
तुझिया पदाचे 
स्वप्न पाहे ॥

किती सांभाळावे 
किती रे जपावे 
डाग न पडावे 
म्हणूनिया ॥

मोडली न घडी 
परी डागाळले 
मोहाचे पडले 
ठसे काही ॥

कुठल्या हवेचे 
कुठल्या वाऱ्याचे 
गंध आसक्तीचे 
चिकटले ॥

कुठल्या ओठांचे 
कुठल्या डोळ्यांचे 
पालव स्वप्नांचे 
फडाडले ॥

बहु दत्तात्रेया 
समय तुम्हाला 
आम्हा जोडलेला 
काळ थोडा ॥

पाहुनिया वाट 
जाहलो विरळ 
फाटे घडीवर 
आपोआप ॥

या हो क्षणभर 
स्पर्शा हळुवार 
विक्रांत जुनेर 
धन्य करा॥


*****
https://kavitesathikavita.blogspot.com
+++

शनिवार, २० जून, २०२०

सोनार


सोनार 
*****
श्रीदत्त सोनार 
मज दे आकार 
फुंक हळूवार 
मारूनिया॥

जाळ वळवून
तपे तापवून
किंचित ठोकून 
आणे गुणी॥

वितळवी मुशी 
दे दोष  जाळून 
सद्गुण घालून 
किंचितसे ॥

करी घडवणं 
देऊन आकार 
नाम अलंकार 
अनाम्याला ॥

नीट घडवितो
परी कर्मागत
जगण्या प्रारब्ध 
वाट्याचे ते  ॥

जगात विक्रांत 
जरी मिरवितो 
स्वरूप ठेवतो 
परी ध्यानी ॥
****
 copy @डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, १९ जून, २०२०

वेध आषाढीचा

वेध आषाढीचा 
**********
वेध आषाढीचा 
माझिया मनीचा 
विठ्ठल भेटीचा 
नित्य जरी ॥
आमुच्या नशिबी 
कुठली पंढरी 
होणे वारकरी 
भाग्यवान ॥
आम्ही तो चाकर 
माणसे नोकर
गुंतलो संसार 
व्यवहारी ॥
का न कळे पण 
येताच आषाढी 
मनाची या गुढी 
उंच जाय ॥
माझ्या ज्ञानोबाचा 
देव तुकोबाचा 
असंख्य भक्ताचा 
लडिवाळ ॥
तयांचे ते प्रेम 
पाहिले मी देवात 
भाव सावळ्यात
कोंदाटला ॥
भक्ती आकाशात 
ऊर्जा घनदाट 
कृष्ण विठ्ठलात 
आषाढीला 
विक्रांत घरात 
पंढरी मनात
आनंद भोगत 
वारीतला.॥

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

माझे महाराज

माझे महाराज
**********
माझे महाराज 
प्रेमाचा पुतळा 
आनंदाची कळा 
मुर्तीमंत ॥
चित्त तया पदी 
लागता रांगता 
सुखाचीच वार्ता 
सर्वांगात॥
नाव त्यांचे  घेता 
जीव सुखावतो 
अंतरी कळतो 
स्पर्श त्यांचा ॥
तया पाहण्याची 
डोळ्यात या आस
उपाय तयास
अजून ना ॥
हे ही सुख आहे 
तया आठवावे 
आणि आळवावे 
क्षणोक्षणी ॥
विक्रांत स्मृतींचा 
जाहला खळाळ 
तयाच्या प्रेमळ
नामी वाहे ॥
*****
HTTPS://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, १८ जून, २०२०

दत्त ध्यास

दत्त ध्यास
*******

तुझिया कीर्तीचे 
देहाला तोरण 
बांधुनिया मन 
मिरवीते ।।
दत्ताचा विक्रांत 
कानाला या गोड 
किती रे भासत 
असे सारे ।।
तुझिया मर्जीला
जाणल्या वाचून
जगा बजावून 
सांगतसे ।।
म्हणता म्हणता 
तुझा मी होईन 
ध्यासच घेईन 
रूप तुझे ।।
ध्यासाचिये ओढी
दुकान हे थाटे 
दत्त नाम वाटे 
जगताशी ।।
देता-देता वाढो
तुझे प्रेम जोडो
जेणे मज भेटो
तूची दत्ता  ।।
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, १३ जून, २०२०

सखी बाई.

(चित्र आंतरजालावरून साभार )

सखीबाई.
********

म्हटलो मी तुला किती 
क्रांती कर जीवनात 
हसुनी तू बागेमध्ये 
फूललीस फूल होत ॥
 
व्यर्थ आहे जगणे हे
नसतेच प्रेम इथे 
पाहत तू खोलखोल 
हसलीस डोळ्यामध्ये ॥
 
का ग डोळ्यात अजून
तव दुःख भरलेले 
तू म्हटली सहज हे 
स्वप्न आहे थांबलेले ॥
 
देई सोडून  ही नाती 
झाली उगाच बेगडी 
चेहऱ्यावरी तुझ्या तो
उमलली गुलछडी ॥
 
हे तो तुकडे सुखाचे 
असतात इवलाले 
बघ ओंजळीत माझ्या 
मी रे प्राजक्त भरले ॥
 
देहाविन धनाविन 
कोण प्रेम ते करते 
भोगण्याच्या रिंगणात 
कोण उगाच चालते ॥
 
मनाच्याही पलीकडे 
एक मन असते रे
थांबले रे तिथे उगा 
पाही कोण  भेटते रे ॥
 
काय म्हणू सखी बाई 
तू तो मुलखा वेगळी 
सुख डोह अंतरात 
वनवा का जरी जाळी ॥

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, ८ जून, २०२०

चालवी जगता

चालवी जगता
**********

हे गणनायका 
सिद्धिविनायका 
प्रभू विघ्नांतका 
पाव वेगी ॥
हे गजवदना 
सिंदूर लेपना
अरिष्ट  भंजना 
धाव वेगी ॥
रे तुझ्यावाचून 
येईल धावून 
संकट नेईन 
कोण दुजा॥
तुजला स्मरता 
संकटे पळती 
अशी तव ख्याती 
आहे जगी ॥
तुजला भजता 
कामना फळती 
सुखी अवतरती 
म्हणताती ॥
म्हणून मागतो 
तुझिया चरणी 
विर्विष अवनी 
करी सारी ॥
सुखी दीनजन 
करी हे सज्जन 
अवघे संपन्न 
विश्व होय ॥
देई रिद्धी सिद्धी 
तव तू जगता 
असे माता पिता 
सकळांचा ॥
करितो विक्रांत
तुजला प्रार्थना 
चालवी जीवना 
पथावरी ॥
****
डॉक्टर   विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...