सोमवार, ८ जून, २०२०

प्रभात फेरी (morning walk)

प्रभात फेरी (morning walk)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सैल झाल्यावरती मॉर्निंग वॉकसाठी निघणारी प्रचंड गर्दी पाहून  सुचलेली ही कविता कदाचित ही कविता त्यांच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते .(जी मुर्खपणा आहे)
प्रभात फेरी मारू या 
चला निरोगी राहू या 
तोंडास मास्क लावुया 
शुद्ध हवा नि घेऊया ॥
लॉकडाऊन संपला 
चला चला चालायला
बुट ट्रॅक सूट घाला 
त्वरा करा फिरायला ॥
तुज मिळे का मजला 
जागा उभा रहायला 
भीती आता ती कुणाला 
पोलिस नाही रस्त्याला ॥
काय म्हणता कोरोना ?
झालाय आता तो जुना 
बसलो घरी महिना 
अंग वस्त्रात जाईना ॥
मरणारे ते मेले  सारे 
आम्ही सारे जगणारे 
मास्क नावा पुरता रे 
चला चला रे पळा रे ॥
होणारे ते होवू द्या रे 
जन्म आहे जगण्याला 
क्षण आज वाया गेला 
पुन्हा मिळेना कुणाला ॥
जर का घरी बसता 
आले असते वाचता
भरल्या नसत्या खाटा 
दाटल्या स्मशान वाटा ॥
आज नाही तो उद्याला 
येणार आहेच साला 
तर चला जगायला 
उद्याचे पाहू उद्याला ॥

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, ७ जून, २०२०

कळत नाही

कळत नाही
*************,
मला कधीच माणसे
ओळखता येत नाही 
लालबुंद छान फळे 
विषारी कळत नाही ॥

एक गुण दिसताच 
गुणसागर वाटतो 
संधिसाधू जरी तो ती
आपले त्यास मानतो ॥

काय करू भोळेपणी
जगात फसला जातो 
फाटता बुरखे त्यांचे 
मीच मनी खंतावतो ॥ 

भ्रष्टाचारी गोडबोले 
कधीच कळत नाही 
कामसुपणा त्यांचा तो
भुरळ घालत राही ॥

काम चोर नमस्कारी
नम्र छान वाटतात 
हो म्हणून तोंडावर 
जणू गायब होतात ॥

नको असे बहुतेका 
काम इथले करणे 
पगाराचे चक्र हवे 
सदैव चालू राहणे ॥

माझे काम तुझे काम 
माणुसकीही लाजते 
तोंडाच्या पट्ट्या पुढती 
लाचार प्रजा नमते ॥

खरेच वाटत नाही 
अश्या व्यक्ति असतात 
करूणेच्या नदीला या 
कसे नक्र ग्रासतात ॥

खरेच कळत नाही 
माणसे वळत नाही 
माणूसकीची प्रतिक्षा 
पण माझी जात नाही॥

दलदलीत कमळे 
चार पवित्र असती 
तयामुळे तलावाची 
संगत नच सुटती॥ 

म्हणतो विक्रांत तुला 
रे इथेच थांबायचे 
चावतील किडे मुंग्या 
परि  तळे राखायचे ॥
******:
"©" डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने.
https://kavitesathikavita.blogspot.com

तुझी सत्ता


 
तुझी सत्ता
********
माझ्या अस्तित्वाचे
मज नाही भान

वाहे देहातून
तुझी सत्ता ॥
कशाला म्हणावे
मज मी भिकारी
माझ्या डोईवरी
हात तुझा ॥
आशाळभूत तो
याचक मनात
सांगी त्या कानात
तू तो नाही ॥
जगत सम्राट
असे आत्मराज
जाणुनिया लाज
सारी गेली ॥
गुरुदेव दत्त
देती अनुभूती
संताचिया पदी
बसवून ॥
विक्रांत चैतन्य
झाले अंग अंग
धन्य संत संग
अवधूता॥

**
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, ४ जून, २०२०

भेटी देई

भेटी देई 
*******

रुसू नको दत्ता 
नको रागाऊस 
परत फिरूस
येता येता ॥
लायकी वाचून 
करतो याचना 
भेटीची कामना 
धरुनिया ॥
मळलेले तन 
मळलेले मन 
भोगात जीवन 
सारे जरी ॥
येई गा धावून 
वादळ होऊन 
चिंब भिजवून 
टाक मला ॥
अन्य न उपाय 
तुझ्या कृपेवीण
घेई गा ओढून 
माय बापा ॥
विक्रांत व्याकुळ
तुझ्या पथावर 
फक्त एकवार 
भेटी देई ॥
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, १ जून, २०२०

सखा ज्ञानेश्वर



सखा ज्ञानेश्वर
**********
सखा ज्ञानेश्वर 
शब्दांचा सागर
तया वाणीवर 
जीव माझा ॥१
एक एक ओळ 
प्रबंध काव्याचा 
बोध अध्यात्माचा 
काठोकाठ ॥२
ग्रंथा ग्रंथातून 
प्रेम ओसंडते 
लाडक्यास घेते 
कडेवर ॥३
अपार करुणा 
जगत कारणा 
माऊलीचे  मना 
ओघळते ॥४
विक्रांत करुणा 
लहरीत  ओला 
जन्म फळा आला 
कृपे तया ॥५

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.com

काळ कावळा व मृत्युंजय


काळ कावळा
***********

काळ कावळा 
घिरट्या घाले
कुणास उचलू  
म्हणून न्याहाळे॥
दुष्ट मुळी न 
सुष्ट मुळी न
घेई उचलून 
मरणासन्न ॥
कधी बालक 
कधी तरुण 
वृद्ध कुठला 
गेला जगून ॥
कुणी बुडून  
कुणी पडून 
स्वतःस किंवा 
फास लावून  ॥
गोळी खाऊन 
वध  होवून 
रोगी खचुन 
जाई संपून ॥
जन्म  जिथे 
मृत्यु तिथे 
काळचक्र हे 
सदैव फिरते ॥
साधू वैद्यही 
गेले राजेही 
दीन पथीचे 
गेले धनीही ॥
जाणार तू ही 
जाणार मी ही 
कुणा न चुकते 
काळ झेप ही ॥
परंतु सोडून
निवांत होऊन 
कुणी काळास 
घेई  बोलवून ॥
तो मृत्युंजय 
जावे होऊन 
देह सहजी 
देत फेकून ॥
हीच मनिषा 
मनी बाळगून 
विक्रांत जगतो 
दत्ता स्मरून ॥
**
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

विश्वाचिया आर्ता


विश्वाचिया आर्ता
***************
पांगुळले जग 
चालवी रे दत्ता 
हरवूनी सत्ता 
विषाणूंची ॥
भिंगुळले डोळे 
तोषवी रे दत्ता 
दावूनिया वाटा 
रुळलेल्या ॥
घाबरले जन 
सावर रे दत्ता
बळ देत चित्ता 
विश्वासाचे ॥
हरली उमेद 
जागव रे दत्ता 
चालण्यास रस्ता 
दृढ बळे ॥
आणि चालणाऱ्या 
सांभाळ रे दत्ता 
शितल प्रारब्धा 
करुनिया ॥
थांबव चालणे 
वणवण दत्ता 
निर्विष जगता
 पुन्हा करी ॥
विक्रांत मागतो 
तुजला श्री दत्ता 
विश्वाचिया आर्ता
धाव घेई ॥
****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...