मंगळवार, १२ मे, २०२०

गुरू दान

 


गुरू दान
.**
आधी करि रिते 
पात्र तव सारे
तरीच ते भरे 
गुरुकृपेने 

घासूनपुसून 
आतील काढून 
जाता ते वाढून 
ज्ञान देती 

अन्यथा दिले ते 
निरर्थ होईन
जाईल नासून 
मूर्खपणे 

करी सारी कोरी
तुच तुझी पाटी 
तरी ते लिहती
नवे काही 

आनिक दुसरा 
इलाज तो नाही 
गुरुपुढे जाई 
पूर्ण रिता 

विक्रांते जाणला 
अर्थ शब्दातला 
अवघा गळाला 
अहंभाव

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ११ मे, २०२०

गुरूचे साधन






गुरूचे साधन

**
करी नित्य नेम 
गुरु ठेव ध्यानी 
आणिक साधनी 
वाहू नको 

गुरूचे साधन 
हेच गुरुदेव 
अन्य भेदभाव 
मानू नको 

पेटविला दीप 
ठेव सांभाळून 
साधना घालून 
तेल तया 

श्री गुरु म्हणजे 
असे गुरुतत्व 
दृढ धरी भाव 
तया ठाई 

सोड धावाधाव 
धर  एक ठाव
तुजला उपाव
दाविन तो 

विक्रांता कळले 
मनी उतरले 
तेच सांगितले 
जगतास 

 
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


रविवार, १० मे, २०२०

श्रीगुरु करुणा






श्रीगुरु करुणा 
*********

वाहते अपार 
श्रीगुरु करुणा 
उगा दीनवाना 
बसू नको 

उघड रे शिड 
होई तया स्वार 
मग भव पार 
जाशील तू 

गुरु नसे देह 
आकारी कोंडला 
मठी बसलेला 
दानासाठी

तयाच्या संकल्पी
जन्म-मृत्यू तुटे 
संसृतिचे काटे
जळू जाती

संपूर्ण तयाला 
जाइरे शरण 
करूनी नमन 
अनन्यत्वे

विक्रांता दिसते
कुठे ते चुकते
वृत्ती चरणाते
वळवली

 
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...