सोमवार, ११ मे, २०२०

गुरूचे साधन






गुरूचे साधन

**
करी नित्य नेम 
गुरु ठेव ध्यानी 
आणिक साधनी 
वाहू नको 

गुरूचे साधन 
हेच गुरुदेव 
अन्य भेदभाव 
मानू नको 

पेटविला दीप 
ठेव सांभाळून 
साधना घालून 
तेल तया 

श्री गुरु म्हणजे 
असे गुरुतत्व 
दृढ धरी भाव 
तया ठाई 

सोड धावाधाव 
धर  एक ठाव
तुजला उपाव
दाविन तो 

विक्रांता कळले 
मनी उतरले 
तेच सांगितले 
जगतास 

 
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


रविवार, १० मे, २०२०

श्रीगुरु करुणा






श्रीगुरु करुणा 
*********

वाहते अपार 
श्रीगुरु करुणा 
उगा दीनवाना 
बसू नको 

उघड रे शिड 
होई तया स्वार 
मग भव पार 
जाशील तू 

गुरु नसे देह 
आकारी कोंडला 
मठी बसलेला 
दानासाठी

तयाच्या संकल्पी
जन्म-मृत्यू तुटे 
संसृतिचे काटे
जळू जाती

संपूर्ण तयाला 
जाइरे शरण 
करूनी नमन 
अनन्यत्वे

विक्रांता दिसते
कुठे ते चुकते
वृत्ती चरणाते
वळवली

 
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, ८ मे, २०२०

गुरुदेव थोर






गुरुदेव थोर 
ज्ञानी प्रकाशले 
कुणाला भेटले
भाग्य वसे 

ज्ञानाची ओंजळ 
भरून अमृत 
स्वहाते पाजत
प्रेमभरे 

परी भाग्य हिन
घेईना का घोट 
उघडून तोंड
आदराने 

बस रे ध्यानात 
अथवा नामात 
उलट स्वतः त
उतरत 

तुझे ते पचन 
करणे तुजला 
ज्ञान मुरायला 
लागे बरे

विक्रांते ऐकले 
मनात ठसले 
कल्याण जाहले 
जन्माचे या  

 
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

**

बुधवार, ६ मे, २०२०

नाथ जोगी



नाथ जोगी
********

डंका वाजतो वाजतो 
नाथ जोगी मिरवतो 
ओस पडल्या मनात 
ध्वनी अलख गाजतो ॥

धुनी जळते जळते 
पाप दोष हरविते 
नाथ ओंकार साकार 
विश्वभान हरविते ॥

शब्द शाबरी विद्येचे 
वेद मूर्तिमंत झाले 
जड जीवास तारण्या 
जनी कृपे मिसळले ॥

नाथ विरक्त उदास 
आत्मरति सदा मग्न
भक्ती शोधते जयाला 
ऐसे पृथ्वीमोल रत्न ॥

सदा डोळ्यात विक्रांत 
स्वप्न नाथांचे पाहतो 
दत्त स्नेहाचे चांदणे 
मनो मनी पांघरतो ॥

प्रेम करता पिलांस
माय मनी सुखावते 
प्रेम जाणूनिया खरे
माय कृपावंत होते 

नाथ दत्त अैसे मज 
दोन्ही भेटले कृपाळू 
झाले जिवलग किती
प्राण तयास ओवाळू

दृढ ठेवा मज इथे 
आणि काही न मागणे 
बाकी घडो काही मग
देहा येणे आणि जाणे


*©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...