शनिवार, २ मे, २०२०

गोरक्षाची वाणी






गोरक्षाची वाणी 
वसो माझे मनी 
कृपेची कहाणी 
जन्मा यावी 

हसता खेळता 
करो यावे ध्यान 
अवघे जीवन 
दत्त व्हावे 

गुरु भक्ती दिप
जळावा अंतरी 
अविद्या अंधारी 
मार्ग मिळो

सारी धडपड 
सारी खटपट 
देवाशी लगट
होण्या व्हावी 

ज्ञानाचा प्रकाश 
पडावा जीवनी 
चित्त निरंजनी 
लीन व्हावे 

आणि काय सांग
मागावे तुजला 
मायबाप तुला 
सारे ठावे

म्हणून विक्रांत 
होतो आता उगा 
असो नाथ जागा 
हृदयात..
*©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, १ मे, २०२०

चालविले देवे




चालविले देवे 
*********


भक्तीचीया वाटे 
चालविले देवे 
धरुनिया सवे 
हाताला या 

चौकातले श्वान
जरी होते मन 
ठेविले बांधून 
बोध बळे  

कृपेचा पाऊस 
कधी दिले ऊन
केली दाणादाण 
तर कधी 

मान-अपमान 
केले ठरवून 
ठेवण्या बांधून 
दृढ पदी 

मध्यमवर्गाचे 
धोपट जीवन 
नच ओढाताण 
केली कधी

चुकली ना वाट 
सुटले ना सूत्र 
जगात विचित्र 
चालतांना

विक्रांत कृतज्ञ 
कृपेने दाटून 
घाली लोटांगण 
दत्ता पदी

**

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

येई रे






येई रे 
*****

येई रे वळून 
घेई रे खुडून
फुल हे फुलून
आले दत्ता 

रंग गंध फार 
नाही रे सुंदर 
वाहण्या अधीर 
तरीसुद्धा 

वाहतो शरीर
मन हळुवार 
भक्तीचे केसर 
अळुमाळू 

धरी रे ओंजळ 
करी रे सांभाळ  
सुमन कृपाळ
दत्तात्रेया 

विक्रांत उत्सुक 
अधीर जीवन 
पाहण्या चरण 
अवधूता
 ****




©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बीज




बीज
****
कासया हवाय
तुज गुरुस्पर्श
चिकटणे त्यास
उगाचच ॥
मिळालेले बीज
ठेव ह्रदयांत
जाय उतरत
अंतरात ॥
कृतज्ञता असे
जरी मनी थोर
नम्र पायावर
उभा राहा ॥
ध्यान हीच सेवा
असे खरोखर
आणिक आचार
सांगीतला  ॥
श्रीगुरु वदले
निक्षून म्हटले
विक्रांते ऐकले
सर्वभावे ॥
दत्त मावळला
सर्वत्र भरला
विक्रांत नुरला
पाहावया ॥
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.bloggspot.com

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

दान



परत फेडीची
आस नको दाना
स्वर्ग आरोहना 
जाणे किंवा

नको अनुष्ठान 
नको अभिषेक 
नको अतिरेक 
कर्मकांडा 

पोटाचा तो यज्ञ 
एक मज ठाव
अन्नाचा अभाव 
न हो तिथे 

पुण्य पाप सारे 
मनाचेच शिक्के 
पाप कोणी विके 
पुण्यासाठी 

घेऊन हे हात 
टाक माझे दत्ता 
वाहो तुझी सत्ता
 तयातून 

घडो सारे जीणे 
माझे दत्तासाठी 
पापपुण्य गाठी 
पडू नये दो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २६ एप्रिल, २०२०

गुंजन

गुंजन
****

सुरा वाचून 
स्वरा वाचून 
मनात चाले 
सदैव गुंजन 
ददम दत्त दम
तदम दत्त तम 

अर्था वाचून 
मंत्रा वाचून 
बोल उमटती 
उगाच येऊन 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम

दुचाकीच्या 
स्वरा मधून
पदरवाच्या 
बोला मधून
बोलाविल्या मी
कधी वाचून 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम

मंत्र नसे हा 
दिधला कोणी 
वा काढला 
कुण्या ग्रंथातूनी
सहज स्फुरते 
अद्भुत वाणी 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम

शब्दातच त्या 
लय लागुनी 
जाते भान 
कधी हरवूनी 
केवळ उरतो 
तोच ध्वनी 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम

खुळ्या मनाचा 
खुळेपणा हा 
बडबड गीता 
मोठेपणा वा
झिंग तयाची
बहु वाहवा 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम 

सुटला विक्रांत 
फुटला विक्रांत
वेड मिरवतो
या जगतात
शब्द तेच ते
बसतो गात
ददम दत्त दम 
तदम दत्त तम 

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

दत्तात्रेया

ठेव दत्तात्रेया  
मज निरंजनि
काजळीवाचूनी
कल्पनेच्या

पाव दत्तात्रेया
मज कृष्णेकाठी
गिरनार गाठी 
कधीतरी 

बस दत्तात्रेया 
मज  ध्यानी मनी 
सुटूनी त्रिगुणी 
अट्टाहास 

 ऐक दत्तात्रया 
कधी माझी गीत 
होऊनिया मित 
जीवलग 

देई दत्तात्रेया
मज भक्ती भाव 
संतसंग दाव 
सर्वकाळ  

मग दत्तात्रेया 
विक्रांत भाग्याचा 
होईल सुखाचा 
हिमालय 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesarthikavita.blogspot.com


वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...