गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

गुन्हा

गुन्हा
****

साधू होता 
म्हातारा होता 
जीव त्यालाही 
प्यारा होता .
जखमा होत्या 
वेदना होती 
डोळ्यात आर्तता 
भरली होती

कुणाचेच त्याने 
काहीही कधीही
बिघडवले नव्हते 
तसेतर
मरायला काहीच 
कारण नव्हते 

घाणेरडे राजकारण 
सडलेले मन 
भगव्या वरील 
द्वेषाचे प्रकटीकरण 
सारे कुयोग कसे 
जुळून आले होते 
मस्तक 
कर्तव्यनिष्ठतेचे 
झुकून खाली होते 
भयाने वा 
आणिक कशाने 
हात निष्प्रभ
बांधले होते 

निरपराध त्यांना
पळता येत नव्हते  
तरी पळावे लागले 
असंख्य घाव वेदनांचे 
देही झेलावे लागले 
आणि पत्करावे लागले 
मरण असे दारूण
पशु समान 
माणसाच्या हातून 
कारणा वाचून 
गुन्ह्या वाचून  . . 

पण कदाचित 
एक गुन्हा 
त्यांनी केला होता 
फक्त भगवा पेहराव 
घातला होता.
********
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

माय दारावर

माय दारावर

********

 

दाटुनिया विश्व भरे सोहं गाणं

चिद्रुपाची खाण ओसंडली ॥

आकारी नटला देव निराकार

चित्त तदाकार होण्याआधी ॥

खेळण्या सादर असे साथीदार

पडता अंधार जाणे घरा ॥

सोहं हेचि साध्य आणिक साधन

शेवटचे ठाणं गाठावया ॥

विक्रांत मनात स्वामी करे घर

माय दारावर उभी असे ॥

****

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे

htps://kavitesathikavita.blogspot.com

 

 

 

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

देवाहाती शस्त्र


देवा हाती शस्त्र असती कशाला 
साधू  रक्षणाला दुष्ट मारण्याला 
वधितो देवही सांगतो वधाया
शेत राखण्यास तण उपटाया
पण कष्ट तेही का द्यावे तयाला 
न्याय सत्ता जर मिरवे स्वत:ला 
न्याय हाच धर्म हीच संविधान  
तर मग घडो तयाचे पालन  
दुष्ट दुर्जनांचे घडावे हनन  
न्यायदेवते हे तुझिया हातून  
साधू  न मरावे पथी तडफडून  
गोवंश न जावा निर्वंश होऊन  
मारावे राक्षस मारावे भक्षक  
धर्म नीती न्याय होउ दे रक्षक.

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
htpps://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २० एप्रिल, २०२०

खुणगाठ



खुणगाठ
*****

माझ्या मनाला
मिळे खुणगाठ
सरू आली वाट
माझी आता ॥

जन्ममरणांचा
सुटू आला गुंता
दत्ताचिया पंथा
चालू जाता ॥

सुटू सुटू आले
हे ऋणानुबंध
असंख्य संबंध
पडलेले ॥

झाले देणे घेणे
जमा शून्या खाती
कर्माची वाहती
गती मंद ॥

जाहलो लाकूड
शुष्क वाळलेले
धुनीशी ठेविले
तयारीत ॥

अवघा पसारा
वाहणारा वारा
तयात धुरळा
विक्रांत हा ॥
***
©®डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

साधू वध

साधू वध
*****

भगव्यातील भोंदूलाही
देव मानणारा
हा हिंदू समाज
जेव्हा पाहतो
तुम्ही क्रुरतेने
हिंसेने मारलेले
रक्तामध्ये लडबडलेले
त्या असाहाय्य निष्पाप अन
त्या वृद्ध साधूंचे शव .
तेव्हा होते आक्रंदण
श्रद्धेचे भावनेचे
आदराच्या उल्लंघनाने झालेलं
लक्षात ठेवा
तेव्हा तुम्ही टाकलेली असते
काडी तेलाचा विहिरीत
मारलेली असते
उडी सिंहाच्या गुहेत

एका लाथेने नहुषाच्या . .
अगस्तीस मारलेल्या. .
तो मदांध झाल्यावर .
पडावे लागले होते त्यास
होवून साप भूलोकावर
कित्येक वर्ष सरपटत
भोगावे लागले होते
त्याचे प्रायचित्त .
आणि हा तर वधआहे
निर्घृणपणे केलेला
त्याची शिक्षा तर
मिळायला हवी
नव्हे ती मिळणारच .
कारण आता उमटणार आहेत
शाप
लाखो अगस्तीचे
एकाच वेळी .
त्यात तुम्ही जळून
भस्मसात होणार
यात मुळीच शंका नाही .

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

मन बहाव्याचे झाले



मन बहाव्याचे झाले
************
येता ओघळून चैत्र
मन बहाव्याचे झाले
दत्त स्फुरण जणू की
कणोकणी ओसंडले ॥
गर्द पिवळा झळाळ
धुंद हळदी खळाळ
दत्त झाला जणू वृक्ष
गळा वैजयंती माळ ॥
अशी किमया सोनेरी
पाहू हरखून किती
चित्त चाकाटले दत्ता
किती देखणी ही सृष्टी ॥
कधी होईल मी ऐसा
तुझ्या प्रेमात रंगला
रंग हिरवा हरला
पित तदाकार झाला ॥
उभा तरूतळी मौन
मनी धुंद मोहरला
वदे विक्रांत वृक्षाला
मी तो तूच तो रे झाला ॥
*********
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogsport.com

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

मज कंटाळला

मज कंटाळला.
*********
का हो दत्तात्रेया
मज कंटाळला
शब्दांचा आटला
प्रवाहो हा ॥
तुझं भ जावया
अन्य न साधन
जाता हरवून
काय करू ॥
शब्दांमध्ये तू ची
शब्द तेही तू ची
ओंजळ जलाची
जलाशयी  ॥
खेळतो शब्दात  
तुझिया रंगात  
ठेवुनी चित्तात  
मुर्त तुझी  ॥
गौण हे साधन  
गौण आराधन  
विक्रांता कारण  
असू द्या हो.॥
********
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...