शुक्रवार, ६ मार्च, २०२०

दावी रस्ता







दावी रस्ता
***********
सरलेल्या आयुष्याचा
सल मनी टोचतो रे
काय मी जगलो नि
कसा आहे जगतो  रे

भिकारीच वृती सदा
देवा तुझ्या दरबारी
नवसाचे डोंगरच
ठेवले रे तुझ्या दारी

सांगतच होते संत
उभा कल्प वृक्षातळी
समजून उमजून
केल्या त्याच चुका तरी

तसा देवा दयाळू तू
नाही म्हटलाच नाही
सारे बाल हट्ट माझे
पुरे केले लवलाही

आता तरी संपू दे रे  
मागण्या या माझ्या व्यर्थ
वठल्या भक्तीस  दे रे
नव्या जाणिवेचा अर्थ

तुझ्या हाती सारे दत्ता
देई दृष्टी दावी रस्ता
आण पुन्हा भानावरी
हरवल्या या विक्रांता  
------------------------
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in



गुरुवार, ५ मार्च, २०२०

पाचोळयाची खेळी




 वर्तुळ
 ******
झन झन झन
करे कणकण
तरीही अंतरी
व्याकूळ स्पंदन॥

जावू पाहे तन
धुपा्रती होऊन
झरते जीवन
अन डोळ्यातून ॥

कशाला श्वासाचे
अडती बंधारे
प्राण जाऊ पाहे
कुठल्या त्या द्वारे ॥

येते जागेवरी
वर्तुळ फिरून
अन केंद्रबिंदू
त्रिज्येला  धरून ॥

जातच आहे रे
पाणी नदीतून
कसे कळावे ते
गेलेले वाहून ॥

विक्रांत वादळी
पाचोळ्याची खेळी
आली काय गेली
कोणाला पडली ॥
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ४ मार्च, २०२०

गुरुशिखरी





 


गुरुशिखरी
*******
मी तो दत्ताचा छावा
आलो दत्ताचिया गावा ॥
गिरी चढलो थोरला
उरी भेटलो पावुला ॥
वाट काढत पाण्यात
कधी मुग्ध चांदण्यात ॥
कधी मेघी हरवून
कधी उन्हात तावून ॥
दत्त येत होता सवे
दत्त नेत होता सवे ॥
ध्यास लागलेला मना
बळ कुठले या तना॥
दत्त कृपाळूवा झाला
केले जवळ बाळाला ॥
विक्रांत भरून पावला
धन्य स्पर्शून शिखरा ॥

 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ३ मार्च, २०२०

अजित चिंतामणि


अजित चिंतामणि
*******************
विचारलेच जर देवाने
पुन्हा मला
कोणकोणते मित्र पुन्हा
हवेत तुला

तर फार मोठी होणार नाही
ती यादी
पण त्यात तुझे नाव असेल
वरती अगदी

तीस वर्ष झाली असतील
शेवटचे  भेटून
पण हा धागा मैत्रीचा आहे
अजून टिकून

एक निरपेक्ष निर्व्याज नाते
ह्रदय भरुन
अगदी भेटिचीही अपेक्षा
ठेवल्या वाचून

अंतकरणातुन उमटणार्‍या
त्या शुभेच्छानी
आपण आहोत एकमेकाना  
घट्ट बांधूनी

अन राहू असेच कायमचे
मित्र म्हणून
आयु आरोग्य लाभो तुला
सदा भरभरून

डॉ,  विक्रांत प्रभाकर तिकोणे

ज्याचा त्याचा दत्त



 ज्याचा त्याचा दत्त
 मिळे ज्याला त्याला
 कुणीही कुणाला
 देत नाही॥
 ज्याच्या त्याच्या वाटा
असो ज्याला त्याला
 कुणीही कुणाला
 नेत नाही॥
 कुणा होत नाही
 जादूचा तो स्पर्श
 क्षणातच मोक्ष
 लाभ काही॥
 तपाचे डोंगर
 कर आधी पार 
 मग शुभंकर
दिसे काही ॥
 हवी तळमळ
 हवी कळकळ
 तरीच सकळ
 लाभ होई॥
 विक्रांता कळले
 चैतन्य वदले
 बोल साठवले
 हृदयात ॥

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २ मार्च, २०२०

जालिंदर नाथ





जालिंदर नाथ
 **********
वैराग्य अग्निच 
जगी  प्रगटला 
धरेवर आला 
जालिंदर|| 

काय सांगू त्यांच्या 
वैराग्याची कथा 
क्षणी राजसत्ता 
लाथाडली  || 

संसार समस्त 
जाणुनिया व्यर्थ 
जाहला प्रबुद्ध 
अंतर्यामी|| 

निर्जर वनात 
निर्भय होऊन 
निजाचे कल्याण 
शोधतसे|| 

असुनी मदन 
जाहला संपूर्ण 
वैराग्य संपन्न 
अग्नीसवे|| 

स्वयम् अग्नीदेवे 
तयाला वाहिले 
दत्तपदा नेले 
शिष्यत्वास ||

दत्तकृपा पूर्ण 
जाहला सज्ञान 
कृतार्थ जीवन 
सारे केले || 

कानिफाचे नाथ
झाले गुरुनाथ 
वाढविला पंथ
दाही दिशी ||

ऐसा तपी थोर
नाथ जालिंदर 
तया माथा भार 
वायु वाहे  || 

मैनावती तात 
असूनी समर्थ 
राहिला लीदीत 
समाधिस्थ  ||

क्रोधाच्या कौतुकी   
जाळल्या त्या मूर्ती 
गोपीचंदा अंती 
नाथ केले  ||

अहो कृपा मूर्ती 
नाथ जालिंदरा
घेऊनी अंतरा  
वास करा  ||

मागतो विक्रांत 
तुम्हाला वैराग्य 
करा पदा योग्य 
महाप्रभू  || 



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 
http://kavitesathikavita.blogspot.in

3/2/20

रविवार, १ मार्च, २०२०

झोका


झोका
°°°°°°°

झोका घेई  मन
पाळण्या वाचून
आत गाते कोण
शब्दाविन॥
प्रकाश फांदीला
असंख्य सुमन
पुंज पखरण
कणोकणी ॥
नाद रुणझुण
इवली कंपण
पराची स्पंदन
भ्रमराच्या ॥
तया पाहणारा
पाहता शोधून
शून्यची संपूर्ण
दाटू आले ॥
विक्रांत वलय
विलय डोहात
तळ कातळात
घनदाट॥

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita. blogspot.com

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...