बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

ते आमुचे नव्हतेच




ते आमुचे नव्हतेच
****************

ते आमचे
नव्हतेच कधी
आम्ही तयाचे
जरी झालो कधी ॥
.
काळाने लादलेले
ओझे डोक्यावरी
इच्छे  इच्छेवीन
वाहतोय परी ॥
.
देश दिले त्यांना
मोहल्ले दिले त्यांना
गादीवरी बसायचा
हक्क दिला त्यांना ॥
.
प्रेम दिले त्यांना
इज्जत दिली त्यांना
डोक्यावर घेऊन
नाचलो ही त्यांना ॥
.
पण ते का झाले
नाही इथले कधी
इमान वाळवंटी
वा विसरले कधी ॥
.
तेही खरे "ते" नाही
आमचेच रक्त
भिनुनिया विष
जाहले विभक्त ॥
.
ते विष त्यातून
कधी येईल काढता ?
काय त्यांना कधी
येईल आमुचे करता ?

 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

कैवल्य पुतळा

*
कैवल्य पुतळा
************
कैवल्य पुतळा
म्हणती  तुजला
सख्या ज्ञानेश्वरा
संत सारे 
परि आम्हासाठी
मावुली प्रेमळ
होवूनी केवळ
राही देवा
जरी आम्ही नच
मोक्ष अधिकारी
बसू दे पायरी
सदा तुझ्या
तुझे नाव घ्यावे
तुजला पाहावे
ऐकावे नि गावे
वाटे जीवा
तुझिया शब्दांची   
काय सांगू  मात
जीवाच्याही आत
घर केले ५ 
तुझिया शब्दात
जागतो उठतो
जगतो निजतो
सुखाने मी ६ 
तव ज्ञानेश्वरी
मायेचा पदर
निवते अंतर
तेणे माझे
तुझा अनुभव
अमृताचा गोड
जीवा लावी ओढ   
भेटण्याची
तुझिया विरण्या
ह्रुदयात कळ
प्रेमाचे वाद्ळ
मज दावी
काय किती लिहू
देवा तुझ्या साठी
काळजाच्या गाठी
बैसला तू १०
देवा पांडुरंगा
जन्म दे अनंत
ठेव आळंदीत
परि मला ११
मग मी गाईन
फक्त ज्ञानेश्वर
इंद्रायणी तीर
होवूनिया २ ॥
विक्रांता मागणे
देई देवा हेच
मातीत मी याच
सदा राहो १३



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

रुजलेले बीज



केव्हढाआकांत 
केव्हढा गोंगाट
चालला जगात
माझ्यामुळे

सुख नाही जगी
सांगतात संत
तरीही गाळात
पाकाल मी

जया जिथे जन्म
तया तिथे जीणे
वावगे वाहणे
अन्य कुठे ?

आहे इथे देव
आणिक दानव
होवून मानव
स्वस्थ राहि  

जरी मन नाही
मजा आहे खरी
तरिही धरीत्री
भांडावली

अकार उकार
मकार साचार
सृष्टीचा व्यापार
अहर्निश

विक्रांत गोंगाटी
क्षीण कुजबुज
रुजलेले बीज
अंतरात

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

======

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

तुझे कैवल्याचे देणे





तुझे कैवल्याचे देणे
*******************
तुझे कैवल्याचे देणे
माझ्या मनी उगवले
मन इवले इवले
सारे नभाकार झाले

माझे मावुली प्रेमळ
किती आबाद तू केले
शब्द हिरे मोती सोने
राज्य पृथ्वी मोल दिले

केला  जन्मांचा उद्धार
किती कौतुक मांडले
ऋण सरले वाचेचे
तुवा जवळी घेतले

बाळ नेणताच होतो
खेळ संसारी रमला
हाक मारूनी प्रेमाने
अर्थ सारा दाखवला

तुझ्या प्रेमे जीवलगा
खेळ जन्मची हा झाला
ऐसा  आनंद आनंद
काळा गिळुनि बैसला

इथे नांदतो विक्रांत
देह कारणे केवळ 
आत शब्द ज्ञानदेव
चाले प्रेमाचा कल्लोळ

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

श्री शिव शंकर



श्री शिवशंकर
***********
श्री शिवशंकर डमरू वाजवे
कैलासाला अन जागवे
डुडूम डुडूम डम डं डं डं
ध्वनी हृदयाला हालवे

जटा पसारा नटला
हा व्याघ्रांबरी सजला
बहू देखना कर्पुरगौरा
विभूती वरी भाळला ॥

हाती त्रिशूळ झळाळे
विद्युत पूरच लोटला
केशकलापी गंगामाता
जलफेर भोवती धरला ॥

 वैराग्याचा जणू वोतला
त्रिगुणातीत हा पुतळा
ब्रम्हा विष्णू ज्यात लीन
जगत पसारा मांडला ॥

माय भवानी शक्ती हृदया 
एक रूपी  तो मिनला 
विश्वाकार विश्वात्मा जो
विश्व कोड्यात लपला

शिव शंकरा हे अवधूता
देई शरण या विक्रांता
ठेवी पदा तव सदा सदा
सदाशिवा हे हर दुरीता .॥
**

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

शंभुच्या वेदना


शंभुच्या वेदना
*********

सत्तेचे कुतरे । जयाला चावले ।
तया न उरले । विषामृत ॥१
सत्तेसाठी होते। डोई टोपी गोल ।
आवडे हलाल । आपुल्यांचा ॥२
क्षण सुखासाठी ।भविष्याची राख ।
करती ते खाक। श्रेष्ठ मुल्य ॥३
कुठल्या मातीचे ।घडविले दत्ता ।
पापाचीही खंता ।ज्यास नाही ॥४
विक्रांत शंभुच्या । वेदनांचा भागी ।
ठेवी जखम जागी ।ह्रदयात ॥५

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

श्री शिव छत्रपती



श्री शिव छत्रपती महाराजांना
**********************

माझ्या राजा
तुझ्यासाठी
वाहिन मी
जीव पथी

आयुष्याची
कुरबानी
पुन्हा पुन्हा
करीन मी

पुन्हा येई
जन्म घे
खरा अर्थ
राष्ट्रा देई

देव देश
धर्मासाठी
येई राजा
आम्हासाठी

तुझे नाव
घेणारे ही
उरले ते
तुझे नाही

तुझे नाव
झाले इथे
एक नाणे
खणाणते

आणि आम्ही
तयाला रे
सदोदित
विकलेले

तुझा ध्वज
चारी खांदी
आडवीच
परि फांदी

जयकार
पेटीसाठी
खजिन्यात
कोटी-कोटी

लुटलो रे
तुझ्यासाठी
लुटणार
तुझ्यासाठी

एकदाच
पुन्हा येई
ह्रदयांत
अाग होई

विझणार्‍या
राष्ट्राला या
संजीवन
पुन्हा देई

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...