मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

एक कविता दोन विचार



एक कविता दोन विचार
***********************
अ‍

जळो तुझे गीत
माझ्या जीवना रे
ओघळून सारे 
पडो खाली 

तुटो फुटो जग 
लागो तया आग 
अवघाच राग  
व्यर्थ पाही

नको चिटकावू
शब्द गोड गोड 
भ्रमातच कोड
पुरवून

क्षण संवेदना 
अनंत यातना
सारी  दुनिया
अरे  इथे

जळलेले स्वप्ना
राहू दे जळले 
वेदनांची फुले 
सवे माझ्या

जन्म अमावस्या 
येईस्तो मरणा
आपुली आपणा
जाण नाही   

विक्रांत अंधार
निपचित ठार 
असे सभोवार
दाटलेला

0000000000000000000000000000

ब 

फुलो तुझे गीत 
माझिया मना रे
शब्द सुर सारे  
ओघळू दे  

मोहरावे  जग 
यावी तया जाग 
अवघा आवेग  
सार्थ होवो

क्षण संवेदना 
विसरो यातना 
हळुवार तना
सुखव रे
नको अडकू रे
गोड गोड शब्दा
सोड ते जगता
भोगावया

फुलव रे स्वप्ना
तया जे जळले 
वेदनांची फुले 
फुंकरून

जन्म चांदणे हे
सुंदर जगणे
आपण वाटणे   
दोन्ही हाती

विक्रांत होवून
सुखाचा सागर
आनंद अपार
 सभोवार

**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

देहाचे या फुल






सुटू सुटू पाहे 
देहाचे या फुल 
शोधतांना मुळ
जीवनाचे .

आलो उमलून 
कळल्यावाचून 
सौख्याचे घेऊन 
वरदान 

भोगले ते दुःख 
वाटय़ास आलेले 
डंख मारलेले
प्रारब्धाने 

उधळला गंध 
साठलेला आत
केला आसमंत 
सुगंधित 

नाही उमटली 
आस कधी मनी 
ठाऊक कहाणी 
देहाची या 

सुंदर जाहले
अवघे जीवन 
जरी दयाघन
भेट नाही 

फुलाची या माती 
मातीचेच फुल 
फिरते वर्तुळ 
सदोदित 

परि कधीतरी 
येईल तो कुणी 
नेईल खुडूनी
देवालयी

तोवर विक्रांत 
जन्म पुन्हा पुन्हा 
ज्ञानदेव मना
ठेवूनिया 



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

दत्त उरला



 दत्त उरला
*************
मज वाचून मी
मज पाहताना
प्रकटून मना
दत्त हसला
झाले घरदार
हे हवा महाल
सरला सांभाळ
मनातला
विक्रांत जगता
जगत विक्रांता
अवघ्याच वार्ता
बोलायला
कपारिचे फुल
कपारी फुलोरा
कपारी घडला
विश्वोद्भव
घडले घडणे
करण्या वाचून
बीजा उगवून
ये रोपाला
पाहता पाहता
अजब खेळाला
रुप नामातला
हरवला
रे दत्त उरला
हे विश्व भरला
तो शब्द नसला
ओठातला

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

 http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

सरू दे उपाधी





सरू दे उपाधी 

**********



माझी ऐकलीस हाक 

पुरी केलीस त्वा भाक 



खेळ संसारात स्वामी 

माझ्या धावलास कामी 



जरी माहित हे होते 

की मागणे हे खोटे 



तरी मागितले राया 

तुझी अवघड माया 



आता सरू दे उपाधी 

तुझ्या पडू दे रे पदी 



माझी मागणी सरून

तूची राहावा भरून 



वेड लागूनिया तुझे 

दत्त स्वामी राहो वाचे

पदी ठेवुनि विक्रांत 
नित्य वसा ह्रदयात



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...