शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

जीवनाचे रण



जीवनाचे रण

**
थकलेला देह
विटलेले मन
जीवनाचे रण
तरी बाकी

नको तरी हाती
रथाची या वादी
ओढतात नाती
चारी दिशा

काय करू दत्ता
तूच सांग आता
ओढताओढता
हात तुटे

मजला सारथी
अश्व ना दिसती
तरी शर छाती
रुततात

वाहतात ओघ
दु:खाचे रुधिरी
मरणाच्या दारी
नेती मज

थांबवा हा रथ
थांबव प्रवास
निरर्थ सायास
जिंकण्याचे

विक्रांत हातात
पांढरे निशाण
पाहण्यास कोण
दिसेनाची

गजनी जीवन
उद्दाम मग्रुर
भोकसते क्रूर
शस्त्रे उरी

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

कर्ज दत्तावरी आहे



 कर्ज दत्तावरी 
 
*********

इथेही तूच आहेस
तूच आहेस तिथेही
स्वप्न सत्य वेटाळून 
तुझ्याविना नच काही 

येणे इथे परी माझे 
नच खुशामत आहे 
वेडेपण पांघरणे 
आनंदाचे गीत आहे 

होतातही कष्ट काही 
भोगण्यात मजा आहे 
मिळविणे प्रीती तुझी 
हाच हट्ट माझा आहे 

तुच फक्त अवधूता
जीवनाचा अर्थ आहे 
तुझ्याविना जगणे हे
खरोखर व्यर्थ आहे

रिकामेच हात माझे
उभा दत्त दारी  आहे
पाहतो वाट विक्रांत
कर्ज दत्तावरी आहे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

हिंपुटी


हिंपुटी
*****
माझे प्रारब्धाचे
डोईजड ओझे
उतरावे साचे
दत्तात्रेया

अंगी नाही बळ
टाकण्या पाऊले
ओझे जखडले
जीवनास

एक एक दिस
विझवी प्राणास
देहाचा आभास
दृढावून

होई तगमग
श्वासात दाटून
डोळे ओघळून
सदोदित

देई गा बा मज
कृपेचे ते दान
दत्त दयाघन
मावुलीये

विक्रांत उपाशी
नये तव दृष्टी
होवून हिंपुटी
साद घाली


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

दत्त प्रकाश



दत्तप्रकाश
 *********
दत्तप्रकाश होऊनी
येई माझ्या अंगणात
दत्त आकाश होऊनी
भरे सुख जीवनात

दत्त स्फुरलेले गाणे
होई माझ्या हृदयात
दत्त आनंदाचे अश्रू
येती डोळा ओघळत

दत्त भजता भजता
जातो सुखाने भरून
मज नकोसे वाटते
काही श्रीदत्ता वाचून

ओढ एकची मनात
डोळा घडावे दर्शन
जरी खाणा खुणा दावी
दत्त जीवा सुखावून

देई सायुज्यता आता
वेड्या विक्रांता श्रीदत्ता
ठेवी ठेवी गुंडाळून
सारी सरलेली गाथा


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

माझिया दातारा



माझिया दातारा
****
माझिया दातारा
काय मी मागावे
काय ते बोलावे
धजुनिया

येता तो समोर
वाचा होते बंद
मन होते धुंद
मोहुनिया

मनी ठरविले
मनी मावळते
मन न राहते
काही केल्या

हरवे तयात
वृत्तीची लहर
विरते अंतर
भारावले

उरते एकली
विश्व हरपली
आनंद बाहुली
होऊनिया

विक्रांत दत्ताची
होऊन सावली
जगी मिरवली
कौतुकाने


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

माऊलीची आस





माऊलीची आस
 ************
मागतो दत्ताला 
दत्ताचे मागणे 
काय असे उणे 
सांगा तुम्ही 

भक्त अंतरंगी 
तुम्ही संतजन 
कारणा कारण 
जाणकार 

अमृत सागरी 
अमृत प्राशने  
हे चि तो करणे 
असे ना हो 

तया कृपेसाठी 
एका थेंबासाठी 
व्हावी आटाआटी 
जीवनाची 

सृष्टीचे देखावे 
देखवे न डोळा 
समृद्धीचा मळा
रुचेचि ना

बालकांच्या दृष्टी 
माऊलीची आस
खेळणी भकास
वाटे तेव्हा 

तैसा हा विक्रांत 
पाहतोय वाट 
घेऊन डोळ्यात 
तृष्णा तुझी

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

***

विचित्र तह


विचित्र तह
******:**
जया वैर केले
तेची दोस्त झाले
अध्यात्म तयाला
पुरते कळाले ॥
कसे वचन ते
त्यांचे बदलले
बहू प्रेम खुर्ची
पाहताच झाले ॥
बुडाला विचार
बुडाला आचार
सत्तेच्या सुखात
मन मुग्धावले ॥
देई बा परत
मज माझी पत
येऊ नको पुन्हा
माझिया दारात ॥
कशी गर्जनाही
बंदीवान झाली
बाप ह्रदयात
मान घाले खाली ॥
नच कळे आम्हां
काही कुटनीती
आम्ही सैनिक हो
प्रीत झेंड्या प्रती ॥
बरा नव्हे तह
असला विचित्र
वाघ शेळीचे का
होते कधी मैत्र ॥
तुम्हा प्रती प्रीती
म्हणून या ओठी
शब्द काही येती
उदास बहू ती ॥
साहेब तुमची
बहू याद येती
तुम्ही शिकवली
जागे बंड वृत्ती ॥
म्हणूनी मागतो
स्मरुनिया दान
नको लाचारी ती
बळ द्या हो हाती ॥

****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...