सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

संचित

संचित
***************
फळले संचित
जाहले उदित
वाढवून प्रीत
दत्ता प्रती ॥
मुख मागते हे
दत्त नाम घ्यावे
पाय चालू पाहे
गिरनार ॥
कृष्णेचे ते पाणी
लागो सदा अंगा
वाटते सर्वांगा
व्याकुळता ॥
भस्माचे ते लेणे
बहू गोड वाटे
वासना ती तुटे
कनकाची ॥
कधी टेकवीन
दत्त पदी शिर
वाहिण्या अधीर
प्रेम भक्ती ॥
मायबाप दत्ता
कृपा ही केली
विक्रांती जाहली
उपरती॥
**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

शक्तिचा जागर



शक्तिचा जागर
**********
नावाला नवरा
घर संसाराला
सोडता तयाला
येत नाही ॥
टोचून बोलतो
मारतो गांजतो
उपाशी ठेवतो
वेळोवेळा ॥
न दे खर्च पाणी
म्हणे घे पाहूनी
मजा ये मारूनी
स्वतः परी ॥
देहावरी हक्क
दाखवू पाहतो
मारतो छळतो
नाकारता ॥
का गं बाई अशी
राहते संसारी
वार स्वतःवरी
झेलूनिया ॥
नको कोंडलेली
राहू गोठ्यातली
गाय गांजलेली
कदापी तू  ॥
कशाला हवाय
धनी कुंकवाचा
पुरुषी जगाचा
मक्तेदार ॥
आदिमाया तूच
ओळख स्वतःला
घेऊन शुलाला
सिद्ध होई ॥
करी गं हुंकार
मिरव गजर
शक्तीचा जागर
दावी जगा ॥
विक्रांत विनवी
निद्रिस्त शक्तीला
प्रकट रूपाला
करी आता ॥

**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

दत्त भरलेला





 दत्त भरलेला

डोळीयात दत्त
हृदयात दत्त
जीवनात दत्त
भरलेला
निजण्यात दत्त
जगण्यात दत्त
स्वप्नातया  दत्त
भरलेला
स्मरणात दत्त
विस्मृतीत दत्त
काठोकाठ दत्त
भरलेला
कणोकणी दत्त
मनोमनी दत्त
विश्वाकार दत्त
भरलेला
दत्ताचा विक्रांत
म्हणे दत्त दत्त
जाणिवेत दत्त
भरलेला
.
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

मोडू दे रे खोडी

मोडू दे रे खोडी
****:*******
संसार सुखाची
तुटू दे रे गोडी
मोडू दे रे खोडी
दत्ता माझी ॥
बहु लाचावली
जिव्हा ही रसाला
आणि बोलण्याला
खोटे नाटे ॥
किती गोड वाटे
लोळणे निजने
डोळ्यांनी पाहणे
सुखवस्तू ॥
घडेना साधन
सद्ग्रंथ वाचन
संतांची वचन
स्मरेनाचि  ॥
नामाची संगत
कदापि घडेना
भजनी रमेना
चित्त द्विधा ॥
वाया गेला मंत्र
गुरूंनी दिधला
कोनाडी ठेवला
चिंतामणी ॥
मायबाप दत्ता
करा सोय काही
मार्गी तुझ्या नेई
सनातन ॥
भक्तीने भरू दे
साधने जडू दे
कृपेने भिजू दे
विक्रांत या ॥
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**+

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

अंत व्हावा




अंत व्हावा
******

तुझ्या पायांवरी
देहाचा या अंत
व्हावा भगवंत
मागणे हे ॥॥

सरो ही कहाणी
तुझ्या स्मरणात
प्राणांची ही ज्योत
विझूनिया ॥

बहु मोजले मी
श्वास जगतात
तव विरहात
दत्तात्रया ॥

वाहिले रे ओझे
प्रारब्ध कर्माचे
किती वाहायाचे
अजून हे ॥

मालवून टाक
दीप तू स्वहाते
शून्याच्या पहाटे
हलकेच ॥

विनवी विक्रांत
पुरे झाले जीणे
देवा लाजिरवाणे
तुजविन ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

टेंबे स्वामी


॥ टेंबे स्वामी ॥
***********

शिकवली भक्ती
करुनिया कृती
वैराग्याची मूर्ती
टेंबे स्वामी ॥
तुम्ही दिले भक्ता
मधु शब्द ओठी
आळविण्यात प्रीती
दत्त प्रभू ॥
महाराज स्वामी
महाकृपा केली
शब्दांत रचली
भाव मूर्ती ॥
व्हावे उतराई
तरी शक्य नाही
खरे तर नाही
इच्छा ती ही ॥
तुमच्या भक्तीचा
कण  व्हावा माझा
हीच एक वांच्छा
मनी असे ॥
नमितो विक्रांत
वासुदेवानंदा
दत्त भगवंता
पुनःपुन्हा 
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

वेडी बया



वेडी बया
*******
ती एक वेडीच
अति मूर्ख बया
नाचे थयथया
डोक्यावरी ॥
काय तिज हवे
कळेना मजला
घोरची जीवाला
लावितसे ॥
उधळिते जन्म
गरज नसून
येतसे धावून
भ्रमात चि .॥
करीतसे हट्ट
हक्क तो नसून
जाते बजावून
काही बाही ॥
कुणीतरी सांगा
तिला वेडाबाई
मूढ घरी राही
अज्ञानाच्या॥
बोलावितो  जिस
तिचा न हुंकार
हाक हाके वर
हिचे असे ॥
अशी अवधूता
करशी का थट्टा
अडव रे वाटा
तिच्या आता ॥
कोंडुनिया घाली
हवे तर बळे
मजला मोकळे
राहू दे रे ॥
ऐकू दे मनात
निजलेले गाणे
शारद चांदणे
लपेटून ॥
स्मृतींच्या पखाली
साठवली गाणी
गुढ आळवणी
सदोदित ॥
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...