मंगळवार, ४ जून, २०१९

गुरव सिस्टर


गुरव सिस्टर 
***************

या रुग्णालयातील 
झुंजार मनस्वी व सरळ स्वभावाच्या 
व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती म्हणून 
गुरव सिस्टर सदैव माझ्या ध्यानात राहतील 
त्यांच्यामध्ये अनेक गुण अंगभूत आहेत 
त्यापैकी त्यांच्यातील नेतृत्व गुण हा 
आपल्याला प्रकर्षांने जाणवतो .
त्यांचा स्वभाव असा आहे कि
त्या सरळ प्रश्नाला भिडतात 
माणूस ओळखतात 
आणि समोरचा माणूस जसा असेल
तसाच व्यवहार त्याच्याशी करतात 
संतांची वागताना त्या संत आहेत 
उद्धटासी वागतांना उद्धट आहेत
आणि खटाशी वागतांना खटनट आहेत 
क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर 
म.तु.अगरवाल रुग्णालयाच्या 
त्या पहिल्या फळीतील फलंदाज आहेत 
रुग्णालयावर कुठले संकट आले 
रुग्णालयातील व्यक्ती अडचणीत सापडली 
कि ताबडतोब धाऊन जाणारा 
त्यांचा स्वभाव आहे 
त्यांच्या या स्वभावामुळेच 
त्यांचा मनुष्य संग्रह हा फार मोठा आहे 
रुग्णालयातील प्रत्येक कामगाराला 
त्या त्याचा गुण व अवगुणांसह 
पक्केपणी ओळखतात 
एवढेच नव्हे तर 
त्याचा इतिहास भुगोल बेरीज वजाबाकीहि 
त्यांना ज्ञात आहे.
कामगाराला एकेरीत हाक मारून 
काम करून घेण्याची त्यांची हातोटी !
त्याबद्दल मला खरोखर हेवा वाटतो 
त्यात कुठल्याही अधिकारापेक्षा  
त्यांच्या प्रेमाचा हक्क अधिक जाणवायचा.
सिस्टर भाऊक आहेत सोशिक आहेत 
लढाऊ आहेत मनमिळावू आहेत 
तशाच त्या एक आदर्श आई सुद्धा आहेत 
त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना 
डॉक्टर करून त्यांचा वैद्यकीय सेवेचा वारसा 
आपल्या पुढील पिढीला दिलेला आहे 
ही खूप अभिमानास्पद आणि गौरवाची गोष्ट आहे  

त्यांच्या बद्दल मला नेहमीच 
एक रुखरुख वाटत आली 
ती म्हणजे त्यांना पिवळा पट्टा 
किंवा काळा पट्टा लावायला मिळाला नाही
 त्यांना तसे पाहायला नक्कीच आवडले असते .
काही लोक काळ्या पट्ट्यासाठी जन्माला आल्या आहेत 
असे वाटते त्यापैकी त्या होत्या,आहेत .
पण तसं पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते 
ती म्हणजे कुठलाही प्रकारचा काळा पट्टा न लावताही 
एक काळा पट्टा सदैव त्यांनी बांधलेला होता 
या रुग्णालयाच्या त्या अनभिषिक्त मेट्रन होत्या 
तसेच त्यांना रुग्णांबद्दल वाटणारा 
कळवळा व प्रेम हा त्यांच्या कर्तव्याचा भाग नव्हे
तर तो एक गुणधर्म होता 
तो त्यांच्या शब्दाने कृतीने सहज व्यक्त होत होता
 त्यात कुठल्याही  प्रकारचा नाटकी अविर्भाव नव्हता 
आपण केल्याच्या कृतीचा सार्थ अभिमान होता 
पण मी केलेपणाच्या मोठेपणाचा आव नव्हता 

गुरव सिस्टर बद्दल बोलायचे  लिहायचे किती 
लिहून लिहून कित्येक पाने  खर्च होतील 
इतका चांगुलपण व गुण त्यांच्यात आहेत .

मला त्यांनी सांगीतलेल्या कितीतरी
गोष्टी कथा प्रसंग अनुभव 
माझ्यासाठी एक विशाल संग्रहच आहे.
चंदने सिस्टर, गुरव सिस्टर दिलपाके सिस्टर 
यांच्या सोबत काम करतांना 
आम्ही मेडीकल ऑफीसर किती निर्धास्त होतो 
हे आम्हालाच ठावुक आहे.

तर अश्या या अत्यंत कणखर सरळ व 
रुग्णालयाच्या आधारस्तंभ असलेल्या गुरव सिस्टर 
पला सेवानिवृति निरोप घेत आहेत.
त्यांना जड अंतकरणाने प्रेमपुर्वक निरोप देतो.
अन युरोग्य लाभो हि प्रार्थना करतो .

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, ३ जून, २०१९

द्वैताची पेरणी





द्वैतची पेरणी

****:
येतात विचार
जातात विचार
घेऊन आकार
जगताचा 

नाती गोती सारी
रंगवी रंगारी
अस्तित्व कुसरी
येवुनिया 

आत बाहेरील
जग ना वेगळे
असे एक सरे
क्षण रूप 

पदार्थ वाऱ्याचा
गोळा वा पाण्याचा
हाती का यायचा
कधी कोणा 

पाहता पाहता
बुडालो शून्यात
कुणी ना कुणात
राहियेले 

विक्रांत पाहता
डोळियांचा डोळा
आतलिया खेळा
ओसाडलो॥

दत्ताचिया वाणी
उतरली मनी
द्वैतची पेरणी
करपली ॥


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


*****


रविवार, २ जून, २०१९

पहा रे जगता




पहा रे जगता

**********


माझ्या जाणिवेला
फुटावे धुमारे
जग पाहणारे
यथावत 

होवूनी निवांत
सुटूनिया कष्ट
पाहण्याचे फक्त
कर्म उरो 

अवघाची खेळ
चालला केवळ
वाफेचे ते बळ
इंजिनाला 

दुनिया चालते
मनही धावते
काय अन कुठे  
ठाव नाही 


माय मदालसा
सांगते विक्रांता
पहा रे जगता
निरखून 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

*****





नशा

नशा
(word no tobacco day)

क्षणी सुखद वाटते
अंती दुःखद ती होते
नशा जीवन ओढून
मृत्यू पंथाशीच नेते

विडी तंबाखू गुटखा
यांचा लागता चटका
जीव वेडापिसा होतो
धरी टपरीचा रस्ता

धन जळते धुरात
धन पडते थुंकीत
करी बधिर मेंदूला
येतो अर्धांग देहात

नसा होतात कडक
वाढे रक्तचाप खूप
अंती झटका हृदयी
होय सुखाची ती धूप

मग चकरा दव्याला
चाट पडदा खिशाला
रोग कॅन्सरसारखे
होती कारण घाताला

माझे आइका मित्रांनो
दूर फेका हे लोढण
मनोनिग्रह करून
आणा सुख समाधान

फार नसे रे कठीण
पाहा जागृत होऊन
जीव दुर्दैवी भोवती
नशा केलेले पाहून

मित्र डॉक्टर विक्रांत
तुम्हा मागतो मागणं
विडी काडीची ही बेडी
दूर द्या रे ती फेकून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १ जून, २०१९

दत्ताने दाविले




मनाचा किनारा
चिवट चिकट
सोडता सोडत
नाही कधी ॥

रंगांचे विभ्रम
दाखवी अनेक
घडती कित्येक
भावे

भय दलदल
कधी दाखवून
घेतसे ओढून
स्वतः कडे ॥

कधी अधिकार
कवण्या पदाचा
संतांच्या मठाचा
महाथोर ॥

कधी अनुभूती
ध्यानी ज्या येती 
त्याची संगती
बांधुनिया ॥

रंग रूप रस
अवघे इमले
मनाने बांधले
असे जगी ॥


दत्ताने दाविले
म्हणूनी कळले
विक्रांता घडले
पाहणे ही  


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...