शुक्रवार, ३ मे, २०१९

माझे गाणे गाणे सारे




माझे गाणे गाणे सारे 
देवा तुला वाहियले 
माझे जीणे जीणे सारे 
तुझ्या पदी ठेवियले

आणि काय देऊ तुला 
मजपाशी राहियेले 
कणकण माझा घे रे
 स्वप्न हो रे सजलेले

तुझ्यासाठी रात्रंदिन 
उरामध्ये दाटलेले 
भाव माझे सजलेले 
अवधूता मिटलेले

भक्त सारे स्मरतो मी 
दत्तकृपा भारलेले 
तैसी प्रीती उरी दाटो 
जीणे व्हावे मंतरले

कृपाळुवा माझे स्वामी 
हात कारे आखडले 
जळतेय हृदयात 
अट्टाहास सारे केले 

पुसोनिया विक्रांत हा 
शून्य करी जन्म झाले 
कळण्याच्या पलीकडे 
दावी ते रे असलेले


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, २ मे, २०१९

दत्ता तुझ्या हाती




दत्ता तुझ्या हाती
जीवनाची दोरी
तारी किंवा मारी
मर्जी तुझी

फिरती खेळणी
वारीयाचे हाती
नाही स्वयं गती
तया काही ॥

वाहतेय पान
सलिल लहरी
देह तयावरी
जैसा त्याचा ॥

तैसे माझे तुज
असे समर्पण
सर्वस्व वाहून
दिगंबरा

तुझ्या कृपेविन
न चले जीवन
कृपाळ होऊन
चालविशी ॥

विक्रांत निमिष
काळ उदरा
तव प्रकाशात 
उजळला 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, १ मे, २०१९

दत्त पंथ



दत्त पंथ 
****:
होई धर्माला आधार
दत्त अवतार थोर
भुक्तीमुक्तीसाठी जनी
पंथ रचिले अपार 

नाथ अवधूत नागा
महाभाव अवलिया
धर्मपंथ मिळवून
केले ज्ञानी अवघिया ॥

मुख्य वैराग्य भूमिका
धन मानले मृत्तिका
किती मोक्षा लावियले
जागे करून विवेका 

दत्त पाया अध्यात्माचा
जथा जागे झालेल्यांचा
दत्त धर्म तो सेवेचा
जीवी दडल्या शिवाचा 

दत्त नाथ अनाथाचा
असे आसरा खुळ्यांचा
दत्त निर्धास्त निवारा
उधळल्या वासरांचा 

दत्त विक्रांती जाणला
माथ्यावरची धरला
जन्ममरणी वाहता
मला किनारा भेटला 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

दत्त पाहावया गेलो




दत्त पाहावया गेलो
हरवून आलो
त वळूनिया दृष्टी
डोही शुन्याच्या बुडालो 

रूप त्रिमूर्ती सुंदर
यती वेषा शोधू गेलो
झाले काषाय देहाचे
गीती अवधूती न्हालो 

ज्ञान त्रिपुरा सुंदरी
प्रज्ञा झेलण्यास गेलो
सरे त्रिपुटी खळाळ 
डोही चित्ताच्या बुडालो 

बोल खडावा दुर्लभ
घेण्या दर्शन निघालो
नाद हरवले सारे
देही निराकार झालो 

गेले सगुण निर्गुण
मन पहाणे रुसून
घडे पूजा अवधुता
काही केल्या मी वाचून

जग हरवले सारे
स्व रूपास भोगून
झालो अवधूत सु
जन्म मरणा जिंकून 
****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

शब्दांनो




शब्दांनो 
******


माझ्या थकल्या शब्दांनो 
थोडे चाला रे अजूनी
काही उरल्या पायऱ्या
बाकी शिखर अजूनी

पदे रचा रे वदुनी
प्राण अर्थात ओतूनी
हेच साधन आपुले
देणे प्रभूस अर्पुनी

शब्द वाकडे तिकडे
कधी गेयता नसले
वृत्त छंदांनी सोडले
पिल्लू उनाड  सुटले

घरं ओबड धोबड
परी प्रेमाने भरले
गीत  दत्ताचे तयात
यावे वस्तीस सजले

https://kavitesathikavita.blogspot.com/

बुधवार, २४ एप्रिल, २०१९

नावडती




नावडती
*******

काय नावडती
म्हणूनिया दत्त
मज न पाहत
वळूनिया॥

लावूनिया टक
पाहते लोचना
घेईची ना मना
काही केल्या॥

जाता जवळी तो
लागू दे ना वारा
क्षणात भरारा
जाई दूर॥

ऐसिया देहाचे
करू तरी काय
सरता उपाय
भेटायचे॥

व्याकूळ हे मन
जळे कणकण
भिजती नयन
रात्रंदिन॥

जन्मोजन्मी तुझ्या
राहीन दाराला
घेऊन व्यथेला 
भक्तीचिया॥

विक्रांत युगाचा
पुतळा तमाचा  
श्री दत्त नामाचा
टाहो फोडी ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*****


मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

दत्त कृपाराशी





दत्त कृपाराशी
***********

देखिले चरण
भरले हे मन
जगता कारण
वंदीयले  

रोमरोमी माझ्या
दाटली पुनव
प्रकाश पालव
देह झाला

जाहला सोहळा
सखी चालण्याचा
तप वेदनेचा  
साज ल्यालो

पडला उजेड
पूर्व राऊळास
सरूनिया भास
अंधाराचा

प्रभू गिरनारी
कृपा ऐशी केली
वेदनेची झाली
फुले माझ्या

घडले दर्शन
संत सज्जनांचे
मन विनम्राचे
घर झाले

चाले कृपाराशी
सतत सोबती
सुखाचे वाहती
गंध लोट

बाप अवधुत
कृपावंत झाला
हृदयी धरीला
विक्रांत हा

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...