शनिवार, १३ एप्रिल, २०१९

दत्ताच्या कृपेने




दत्ताच्या कृपेने 
चालला हा जन्म 
अन्यथा मरून 
गेलो होतो 

घडते जगणे
दत्ताला स्मरत 
प्रारब्धा जाळत 
साठलेल्या 

काय केले पुण्य 
सखे बाई मी ग 
आनंदाचे जग 
सारे झाले 

आता फक्त एक 
मनात या हेत
पाहू डोळियात 
छबी त्यांची 

मग हा विक्रांत 
दत्त कीर्ती गंध 
होऊन विश्वात 
पसरेल ॥

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

****


शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

जरी या मनात




जरी या मनात 
आहे दृढभाव 
राजा दत्तराव 
स्वामी माझा ॥ 

घडेना तयाची  
काही केल्या सेवा 
लाडका मी व्हावा 
हेतू पूर्ण ॥ 

भजन पूजन 
तयाचे स्मरण 
नाम संकीर्तन 
किती न्यून ॥

करतो बोभाट 
सांगतो जगात 
राहतो दत्तात
आम्ही सुखी ॥

हाय पण जाते
दाही दिशा मन 
संसारी रुतून 
बसे सदा ॥

जेणे हे जीवन 
दत्ता रात्र दिन
राही चिटकून 
तुज लागी ॥

विक्रांत प्रार्थतो
करावा उपाव 
तुम्ही स्वामीराव 
मज साठी 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

महात्मा ज्योतिबा फुले



महात्मा ज्योतिबा  फुले
******
ज्योतीबा,
तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत
जगत आहोत आम्ही
समतेची स्वातंत्र्याची फळे
चाखत आहोत आम्ही
तू पेटवलेल्या ज्योतीने
आज उजळले आहे
सारे आकाश
या भारतभूमीचे
खरंच इतके सार्थ नाव
या भूमीवर
क्वचितच असेल कुणाचे

मान्य आहे
काही विषमता आहे अजूनही
बरेच शोषणही आहे अजूनही
पण त्याविरुद्ध लढणारा अंगारही
तेवढाच तेजस्वी आहे अजूनही
अन दलदलीतून बाहेर आलेले
हे समाजमन उभे आहे आता
आपल्या पावलावर
देहावर साचलेली
सारी घाण झटकून
या साऱ्याचा उद्गाता आहेस तू
आशेचा निर्माता आहेस तू

कर्मठांच्या किल्ल्यात राहून
लखलखलास  तू
अंधारातील दीप होऊन
अग्नीत पडलेल्या गंजलेल्या
लोहकणांचा परिस आहेस तू
काताळातही शिल्प पाहणारा
शिल्पकार आहेस तू

आज जरी बहुजन वापरणारी
ढाल झाला आहेस तू
धूर्त राजकारणी
स्वार्थी मतलबी लोकांसाठी
एक प्रतिमा झाला आहेस तू
तरीही मी जाणतो की
शोषितांच्या जगातील 
पहिला सूर्य आहेस तू
कोटी कोटी नमनाचा
धनी आहेस तू 
खराखुरा आणि एकमेव
महात्मा आहेस तू

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मागणे ते नाही फार




मागणे ते नाही फार 
तुजवर दत्ता  भार ॥

र्त आहे  माझी थोडी  
 फक्त  देई तुझी गोडी  

दुनियेची सरो गोठी
स्वरूपात राहू दिठी॥

मोकलून साऱ्या आशा 
करी तुझा प्रेमा पिसा

रूप रस गंध नाद 
हरवो रे तुझियात ॥

विक्रांतचा अस्तित्वास 
देई जाणिवेचा ध्यास 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



बुधवार, १० एप्रिल, २०१९

दीपक (दीपकाची गोष्ट गुरुचरित्र)




दीपक

*****

दीपकाची वृत्ती 
असो माझे चित्ती 
कळो गुरुभक्ती 
दत्ता काही 

दीपकाचा भाव 
मज देई देवा 
गुरूचा उरावा 
देह फक्त 

दीपकाचे तप 
घडो काही अंशी 
जेणे तू पावसी 
देवराया 

अचाट अफाट 
दीपक निर्धार 
जणू की सागर 
सेवेचा तो 

दीपका चे भाग्य 
दीपक होऊन 
घ्यावे ओढवून 
अैसे काही 

पाहों वेद धर्म 
डोकाऊन आत
मागतो विक्रांत 
हेच दान ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*******
  

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

संत गजानन महाराज



 संत गजानन  महाराज
*******************
नाही बंकटाची दृष्टी
हरी पाटलांची भक्ती
बाबा गजानना तरी
ठेवा दासावरी प्रीती

नाही भाऊंचे ते प्रेम
देव थांबले उपाशी
नाही पितांबरी निष्ठा
पाने आणली आंब्याशी

मागे करूणा तरीही
पदी घ्या हो दिगंबरा
रूप स्वरूप दाऊनी
वास करा हो अंतरा

बाळाभाऊ गत थोडे
तुझे प्रेम मज देई
बाबू काळेंचे ते भाग्य
देवा विठ्ठल तू होई

भक्त थोरला तो तुझा
असे भोकरे आगळा
तैसा करी काही मला
सदा ठेवा हो पावुला

देई चरित्र पावन
जैसी बायजा माळीण
नका करू हो कधीही
विठोबा वा तो लक्ष्मण

वाट दत्तात्रया माझी
कुळ दत्तात्रेय माझे
 रूप दत्तात्रेय तुझे
लीला अवतार साजे

दान मागतो प्रेमाचे
दत्त अवतारी देवा
नका करू हो दुरावा
दास आपुला करावा

एक तुकडा भक्तीचा
देई तुझ्या भाकरीचा
तुझ्या दारात  विक्रांत
असे याचक जन्माचा

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

सेंड ऑफ टु अॅन




सेंड ऑफ  टू अॅन
**************
कर तो कुछ ना सके 
हम आप के लिए 
मुठ्ठीभर आसमान भी 
न दे सके 
हम आप के लिए  l

अब तो बस 
आँखों में लेकर खड़े हैं ,
कुछ दुआएं 
हम आप के लिये l

ये दोस्त ,
खुश राहो सदा 
यही अारजू करते रहेंगे 
हम आप के लिए l


हर एक चौकटपर
मन्नते हजार 
उस आस्मा वालेसे 
मांगते रहेंगे 
हम आपके लिए l

यु तो गुजर जायेंगी
 यह आवारा जिंदगी 
यादों में फिर भी
कुछ लफ्ज 
लिखते रहेंगे 
हम आप के लिए l

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...