शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

दत्ताचिये वाटे


दत्ताचिया वाटे जाता
मन हरवून जाते
भक्ती सुखात रमते
पुन्हा माघारी न येते ।।

दत्ताचिया प्रेमामध्ये
देहभान विसरते
घरदार संसार वा
नच आपुले उरते ॥२॥

दत्ता तुझ्या वाटेवरी
मला सदा राहू दे रे.
दत्ता तुझे गीत नित्य
माझ्या ओठी येवू दे रे ।।

दत्ता तुझे रूप सदा
डोळा भर पाहू दे रे .
दत्ता तुझा भक्त खुळा
असा मला होवू दे रे ॥॥

दत्ताचिया वाटेवरी
विक्रांत बहु रमला
स्वप्न सत्य सुषुप्तीत
दत्त रूपासी जडला।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

घरदार


घरदार
******
ज्याचे त्याला असे
घरदार प्रिय
जपती स्वकीय
आप्त काम ॥

निवाऱ्याची साथ
निवाऱ्यास पिल्ले
निवारा भरले
घरकुल ॥

कुणा जागा वर
कुणास ती खाली
घरटी टांगली
जागोजाग ॥

सहस्त्र घरटी
एका झाडावर
वृक्ष धरेवर
कोटी कोटी ॥

विक्रांत ढोलीत
कुठल्या बसला
स्वर्गात रमला
मनाचिया ॥

खेळ मांडियेला
अनिकेता खुळा
आरंभ अंताला
पार नाही॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

या शहरात


या शहरात
********

येताच या शहरात
जळतात श्वास आत
मरणगंध घेवूनी
रोज जागते पहाट

वाहतात प्रेत सारी
संवेदना बोथटली
जीवनाच्या लत्करांनी
 इंच इंच व्यापलेली

एक फक्त पोट इथे
जीवनाचा सूत्रधार
अस्तित्वाच्या संगरात
कत्तलींचा रोज वार

रोज थवे जल्लादांचे
फिरती  बेभान इथे
पापण्या कापून निजे
रोज रोज स्वप्न इथे

 राहतो इथे कशाला
विक्रांता का लाज नाही
हरवले काय तू  ते
तुला तो अंदाज नाही

डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

पापाच्या गावाला


पापाच्या गावाला
*************

पापाच्या गावाला
पुण्याचा हा रस्ता
जाई का रे दत्ता
सांग मला ॥

उदर भरण
जरी साधारण
लुटीचे धोरण
का रे तिथे ॥

तुझिया नावाचा
होतोय व्यापार
हक्क नावावर
कुणाचा रे ॥

भरे मंत्रचळ
किती खुळे जन
ज्ञानाचे अंजन
नसे का रे ॥

धावती आंधळे
कळप मेंढ्यांचे
लोचट हाताचे
प्रसादाला ॥

पायाखाली कोण
जाती तुडवले
श्वास अडकले
कुणाचे ते ॥

तया ना फिकीर
तमा ती कशाची
व्यर्थ त्या कृपेची
हाव फक्त ॥

विक्रांत थकला
देवा  बाजाराला
परत चालला
खिन्नपणे॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

किर्र रानी



किर्र रानी
****:
किर्र काळ्या राती होते
कुणीतरी भटकत
रानातल्या काजव्यांना
क्षणभर साथ देत॥

थबकून तरुखाली
होते रान सजवत
हरवून देहभान
स्वतःतच प्रकाशात .॥

रुजुनिया खोलवर
गेले वेडे झाड होत
किर्र गुंजारव स्वर
देहामध्ये कोंदाटत ॥

गंध हवेतला धुंद
होता युगे साठवत
अस्तित्वाला हरवून
कणकण उजळत ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspo

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

हिरण्यगर्भी



हिरण्यगर्भी
*******

पसरे प्रकाश
निळ्या नभांतरी
स्वर्ण जरतारी
धागियात ।।

कोण उधळतो
कोण सावरतो
स्थिर फिरवितो
परिघात ।।

अनंत काळाचे
सतत वाहणे
धरणे सोडणे
कालातीत ।।

नव्हते आकाश
तेव्हाही जे होते
विश्वाचे बीज ते
लखाखते ।।

कळणे धुराचे
धरणे धुक्याचे
जाणणे तयाचे
तैसे काही ।।

विक्रांत पाहतो
पाहता नसतो
माघारी फिरतो
हिरण्यगर्भी ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

क्रिकेट




क्रिकेट
******

कुणी एक तो त्वेषाने
चेंडू कुणाकडे फेकतो
कुणी एक तो
फळीच्या तुकड्याने 
त्याला दूर फटकारतो
त्याचा मागे
धावतात दहाजण
नियमात बांधलेल्या
जणू यंत्रागत
अन त्याच त्या क्रियेत
राहतात फिरत

तिथे प्रेक्षागृहात
बसलेले हजारोजन
दूरचित्रवाणी संचाच्या
समोर बसलेले लाखोजन
धावाच्या काल्पनिक संज्ञेत
रममाण होत
पाहत राहतात
तो तमाशा
पदरचे पैसा आणि
अमूल्य वेळ खर्च करीत

ती झिंग तो आवेश
ते हरणे ते जिंकणे
ते रडणे ते नाचणे
त्या क्षणी खरे असते
शिरे वाचून रक्तात
अड्रेनालीन घुसवणे असते
आणि रोजचे
धोपट कंटाळवाणे जगणे
विसरणे असते .

पण तो प्रत्येक आवेश
संपणारा असतो
किनाऱ्यावर फुटणाऱ्या
लाटेसारखा
क्षणिक ठरतो

यातून कोण काय कमवतो
अन कोण काय गमावतो
हे ज्याचे त्यालाच
ठावूक असते .



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in







वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...