गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

अवघे दत्त



अवघे दत्त

हे तन दत्ताचे
हे मन दत्तांचे
जगणे दत्ताचे
कार्य जणू ॥

हे श्वास दत्तांचे
हे भास दत्ताचे
करणे दत्ताचे
गुह्य जणू ॥

हे घर दत्ताचे
हे दार दत्ताचे
असणे दत्ताचे
प्रेम जणू ॥

हे गीत दत्ताचे
संगीत दत्ताचे
स्फुरणे दत्ताचे
साह्य जणू ॥

विक्रांत दत्ताचा
सेवक जन्माचा
मागतो कृपेचा
क्षण अणु


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

घर नावाचे बिळ



घर नावाचे बिळ
**********

म्हटले तर ते
तिचे घर होते
जगापासून बचावाचे
एक सुरक्षित बिळ होते

आत आत खोलवर
अंधाराचे राज्य होते
गटारांची ओल अन
व घाणीचे साम्राज्य होते
झाडांची मुळे होती
रोज धडपडणे होते
किड्या मुंग्यांचे चावे
तर पाचवीला पुजले होते

पण तरीही
ते तिचे घर होते
रात्रभर लपायाचे
घट्ट दार बंद होते

ट्रेनच्या जाण्याने
हादरणे होते
बसच्या ब्रेकने
दणाणणे होते
कोसळण्याचे खाली कधी
जरी उरी भय होते
तरी ते सारे तिला
स्वीकार्य होते
कारण शहराच्या
या जंगलाचे
कायदे तिला माहित होते
उघड्यावर शिकार होणे
रोज रोज घडत . .
दिसत होते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

एकपणे एक



एकपणे एक
********

मिटुनि तुझ्यात
व्हावे तदाकार
सरूनि आकार
देहाचा या ॥

उरू नये माझे
वेगळे ते काही
नुरावे रे तूही
माझ्या सवे ॥

एकपणे एक
दुरावा सारून
कळणे होऊन
अवघेच ॥

मोडुनिया साऱ्या
जगाच्या वल्गना
सारूनियां स्वप्ना
कालातील ॥

असे उगेपण
तुझ्या माझ्यातले
विश्व मावळले
होवो आता ॥

विक्रांत पाहूणा
मेघुटा मृगाचा
तुझिया मातीचा
अंश होवो ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८

ते एक पत्र



ते एक पत्र

नाव गाव नसलेले
ते एक पत्र होते
वेडेपण भरलेले
जणू धाडस होते

शब्दोशब्दी भरले
खरे खुळेपण होते
अनामिक भावनेचे
धुंद उदंड बंड होते

पत्र नव्हतेच जणू ते
सर्वस्व पणाला होते
नावगाव नसूनही
स्पष्ट साक्षीदार होते

जर घेणारे हात
विस्तवाचे असते
तर विनाशाच्या दारी
जीवन उभे होते

त्याचा अव्हेर करणे
केवळ अक्षम्य होते
स्वीकारणेही परंतु
एक प्रश्नचिन्ह होते

भावनांचा जय झाला
नि नाते जुळून आले
नावगाव नव्हते तयास
शब्दातीत काही घडले


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

नाटक



नाटक
****

सरले नाटक पट पडला
मुखावरचा  रंग पुसला  

जाय आता तू तुझिया घरी
मौज मजा ही सरली सारी

थोडे उथळ होते भडक
त्याने काय तो पडतो फरक

तीनच तास काहीच मास
म्हटला तर साराच भास

थोडा उन्माद उत्तेजना ही
घडले मग रडणे काही

दोषारोपही होवून गेले
पदरी कुण्या काही पडले

आता उद्याला नवा खेळ नि
सवंगडीही नवीन कुणी

नवे असे रे काय ते त्यात
खेळ चालतो रोज  पिटात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

पाहीली दिवाळी






पाहिली दिवाळी
संतांच्या पाऊली
हृदयात उषा
चैतन्याची झाली

कृपेच्या प्रवाही
मन चिंब झाले
माझे मीपण रे
मज कळू आले

सोहंचा डिंडिम
घुमला कानात
उरे पडसाद
जीव जाणिवेत

अनसुयानंद
जाहला कृपाळ
संत संगतीत
करतो सांभाळ

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in 

हुतात्मा (१५ ऑगष्ट निमित्त)



हुतात्मा 
****::

झुंड लांडग्यांची वाढतेच आहे 
एक एक वाघ मरतोच आहे 
मग पेटीवर ती गुंडाळून ध्वज 
देश श्रद्धांजली वाहतोच आहे 

कुणी गोळ्या खाऊन हिरव्या 
ईमान मातीचे विकतोच आहे.
कुणी एक रक्त सांडून आपुले 
पांग तिचे पण फेडतोच आहे 

होतील भाषणे ते देतील नारे 
प्रश्न शतकांचा जळतोच आहे 
फिरतील संदेश सजतील झेंडे 
अश्रू घरी कुठल्या झरतोच आहे 

तसे फार काही कठीण हे नाही 
सिंहासनी हिशोब अडतोच आहे 
मेलीत लाख लाख मरतील अजूनी
पदकांची टांकसाळ आपुलीच आहे 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in


सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...