गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

सुख पात्र




सुख पात्र 

******
सुखाचे हे पात्र 
भरे काठोकाठ 
आनंदाची वाट 
सापडली ॥

होते हरवले 
काही सापडले 
मनी प्रकाशले 
चांदणे या ॥

आता वाहू दे रे 
घर दार सारे 
सरिता मी झाले 
सागराची ॥

राणी मी क्षणाची 
सम्राज्ञी विश्वाची 
गती जगण्याची 
आकळली ॥

प्रकाशाचे दान 
झिरपले देही 
भरूनिया जाई 
जगत्रय ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

तुझे प्रेम



तु़झे प्रेम
*******

तुझ्या प्रेमाने तुडुंब भरलेले
अनंत लहरींनी उचंबळून आलेले
हे अथांग गर्द निळे सरोवर
लाख यत्न करूनही मज नाकारता
येत नाही कधीच


तुझी अविरत आकांक्षा
तुझी सर्वव्यापी मनीषा
जड करते माझे प्रत्येक पाऊल
होतो बंदिस्त  तुझ्या डोळयात
अन् मला पुढे खरच
जाववत नाही कधीच 


तुला अन् मलाही न कळणारा
हा विलक्षण खेळ खेळत राहते मन
घेऊन तुजला कुशीत स्मृतीच्या
पुन्हा पुन्हा कसे राहते ते मज
कळत नाही कधीच


तुझे थोपवणे अन बोलावणे
तुझे थांबवणे वा साद घालणे
हसणे पाहाणे बोलणे
गुढ अस्पष्ट कुजबुजणे
वा कधी मज टाळणे
हे सारे जीवघेणे बहाणे मी
विसरत नाही कधीच 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

तो



तो .

येताच ती जीवनात
हरवले त्याचे सारे
यम नियम ध्येय 
प्रतिष्ठा वगैरे

तिच्या डोळ्यांच्या 
निळ्या आकाशात
गेला तो हरवत
पाखरू होत

घन गर्द गूढ
कलापांच्या डोहात 
स्वतःला विसरत
बंदिस्त करत

तिच्या हळव्या स्पर्शात
त्यांची राकट काया
गेली विरघळत
दुधातील साखरेत

त्याला नव्हते भय
नव्हती फिकीर कसली
संयम अन् संस्काराची
घडी बांधून ठेवली 
 
स्वीकारत 
दुराचारी अनाचारी
पदव्यांची मिरास  
बहाल केले स्वतःला
कुण्या एका वादळास

तिच्या रूपात 
रंगात केसात
मिसळले रंग 
जणू क्षितिजात 

कवटाळले जिणे 
त्याने बेगुमानपणे
समाजाची चौकट 
हवी तशी वाकवत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

हव्यास


हव्यास
********


एका बाण रुतलेला
काळजात घुसलेला
आवळून प्राण पिसा
वेदनेत उसवला


ध्यास सुखाचा हा जुना
करी प्राणांचा पाचोळा
जन्म सोसत ठोकरा
करे कणकण गोळा


नसा आखडून साऱ्या
हात मागे हा येईना
शाप हव्यास युगांचा
दुःख जीवाचे सरेना


घेऊ पदरी निखारा
जीवा देण्यास उबारा
वेड्या बेभान ओढीचा
देह मनात भोवरा


गंध चाफ्याच्या श्वासात
उटी चंदनी देहात
भान निसटूनी चाले
खळखळत्या गाण्यात.


देह विक्रांत मनाचा
ठोक ठोकून बांधला
तटबंदीत कापुरी
वडवानळ कोंडला


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

अर्थ




हरवून जावा अर्थ
मज वाटते रे आता
कुहूरात नसण्याच्या
मी हरवावे सर्वथा ।।

ही ओडंबरीची माया
मज लागली छळाया
उसवून बुजगावणे
लागे मातीत मिळाया ।।

मी म्हणतो माझे मला
नाहीच अर्थ इथला
वाटेवरी सांडलेला
दानाच रुजून आला ।।

सरला ऋतू भराचा
मधू काळ तो जळाचा
वाचून ठरले काही
भार खाली सोडायचा  ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blobspot.in

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

गिरनार स्मृती



गिरनार स्मृती

माझे निवले अंतर
रूप पाहून सुंदर
दिव्य दिसता पावुले
डोळा सुखाचा पाझर ॥

फडफडती पताका
घोष जय गिरनार
मंत्र जागर मनात
ऊठे दत्त दिगंबर ॥

भाग्ये विनटलो थोर
धुनी पाहिली प्रखर
प्रभू दिव्य वैश्वानर
होये स्वयं दिगंबर ॥

थोर संतांच्या पाऊली
होय पुलकित माती
तया लावतो मी भाळी
पुण्ये फळुनिया येती ॥

वारा करीत झंकार
जणू  फिरे गरगर
नाथ गोरक्ष लाडका
भाव भक्तीचे शिखर

होय पुलकित काया
गळा हुंदका दाटला
मायबाप दत्तात्रेय
जीवे भावे ओवाळीला ॥

नच उरला विक्रांत
मुद्रा मनात नामाची
गिेरनारच्या पाषानी
एक गणना खड्याची ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

तर काही घडे




जे नव्हते ते गेले
तेव्हा हाती जे नुरले
कुणी तयास हरवले
म्हणावे का ।।

इया ग्रहणाचिया काला
चंद्र हरवून गेला
ऐशा दुःखाने व्यापला 
तो शहाणा काय ।।

धावे उदंड हे मन
जागा सोडल्यावाचून
जागा पाहता शोधून
मरे शोधणारा ।।

वृत्ती निवृत्तीच्या मागे
भान क्षणभर जागे
तया स्मृतीचे ते धागे
होय फास पुन्हा ।।

बोलू जातो ते सारे
आहे अज्ञानचे वारे
होई विक्रांत उगा रे
तर काही घडे।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...