बुधवार, २० डिसेंबर, २०१७

माझे महाराज

॥ माझे महाराज ॥

लखलखता तारा
माझे महाराज
चकाकता हिरा
माझे महाराज

नामाचा अवतार
माझे महाराज
ज्ञानाचा आधार
माझे महाराज

प्रेमाचा बाजार
माझे महाराज
योगियाचा संसार
माझे महाराज

महाराज आठवे
हृदय भरते
घ्यावेसे वाटते
नाम सदा ते

नाम कल्पतरू
विक्रांता भेटला
संदेह मनीचा
अवघा मिटला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

खेळ




 खेळ

हवे पणाची
ओढ विलक्षण
कळल्यावाचून
प्राण व्याकूळ ||

कधी सुखाची 
गूढ हुरहूर
अथवा काहूर 
दु:खाचेही ||

ये अंधारून
नको असून
किती पराधीन
जगणे हे ||

म्हणते कुणी
नकोच थांबूस
हरवून जावूस
घोर तमी  ||

परी धावणे
घडते पडणे
जन्म शोधणे
रानोमाळ ||

कसला खेळ
खेळे दिगंबर
जळते अंतर
रात्रंदिन ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

गाडा


गाडा


जगायची सक्ती नाही
तरी जगेन म्हणतो मी
असेच मरता येत नाही
अन्यथा मेलो असतो मी

तसा पोटास लागलो आहे
अन सुखाने जगतो मी
दोन तपे होतो जसा की
तसाच अजून दिसतो मी

हे सालं लचांड जगण्याचे
कधी पासून शोधतो मी
नाहीतर हे फेकून सारे
कधीच गेलो असतो मी

बायको पोरे धन मान
चारजना गत राहतो मी
रोज घाबरत उठतो अन
रोज घाबरत निजतो मी

हसणे खेळणे गाणे वगैरे
तसा रोज म्हणतो मी
अन डोळ्यात अंधार पेरून  
मलाच रोज शोधतो मी

मातीचाच हेका माझा
मटका असून धरतो मी
साठलेल्या पाण्यात अन  
हळू हळू विरघळतो मी

तसे तर लाखो विक्रांत
डोळ्या समोर पाहतो मी
तुटणाऱ्या जंगलास या
गाडा होवून वाहतो मी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

बोलती महाराज (गोंदवलेकर)॥



॥ बोलती महाराज (गोंदवलेकर)॥

मायाळू शब्दांचे
कनवाळू बोल
अमृत ओघळ
कैवल्याचे ॥

बोलती महाराज
सुर्य उधळत
विश्व उजळत
भक्ती प्रेमे ॥

हृदयी भिडती
डोळे ओलावती
किल्मिष जाळती
मनातील ॥

सहज सुलभ
परी अलौकिक
वेदांचे मौलिक
सार जणू ॥

एकेका वाक्यात
असे महाबोध
भक्तीचे विशद
तत्त्वज्ञान ॥

ऐकून विक्रांत
जहाला कृतार्थ
कळू अाला अर्थ
नामातील ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

माझ्या लेकीस



माझ्या लेकीस

तू आलीस अन् हे घर

हे जीवन
दरवळून गेले
रजनीगंधाच्या सुगंधाने
घराचा कोपरा अन् कोपरा
कण नि कण
गेला सुगंधी होवून
तुझ्या बोबड्या बोलांनी
गेले कान तृप्त होऊन
तुझा मृदू  स्पर्शानी
मीही गेलो मवाळ होऊन
तुझे मोठे होणे
शाळेत जाणे
कधी परीक्षा
पिकनिकला जाणे
दिवस आले
सोन्याचे पंख लावून
किती भरभर गेले उडून

मित्र म्हणतात

कन्या तर
दुसऱ्याचे धन असते
कधीतरी आपल्याला सोडून जाते
त्या कधी तरीचा
मी कधीच विचार करत नाही
तिने हे जीवन
इतके समृद्ध केले आहे
इतके सुगंधी केले आहे की
ती कुठेही असली
कशीही असली तरी
तो सुगंध सदैव राहीन                                    
माझे भावविश्व व्यापून


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

खुळी तुझी स्वप्न



खुळी तुझी स्वप्न
जातात उडून
हाती आल्याविन
काळ ओघी ॥
कधी आकाशाचे
कधी या मातीचे
परंतु अभ्रांचे
सारे गाव ॥
अडके आकडा
जसा काळजात
दुःखाचा संघात
तैसा सवे ॥
कोण तो दयाळू
मांडे असा डाव
शोधूनिया ठाव
लागेचिना ॥
जीवा फरपट
सुख संपत्तीत
दुःखाचे गणित
कळेचिना  ॥
सरो व्यवहार
जपणे ठेवणे
आयुष्याचे देणे
पुरे झाले ॥
सरो साचलेले
गाठी मारलेले
तुवा कोंबलेले
दिगंबरा ॥
विक्रांत याचक
फुटक्या भांड्याचा
वाहे जगण्याचा
भार उगा॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

मित्र आणि अपमान




मित्र आणि अपमान

आजकाल अचानक अपमानांना
माझे स्मरण होवू लागले आहे
मित्र ही आता तिरमिरीत येत
काही काही बोलू लागले आहे ||

मित्रांवर रागावयाचे असेल तर
त्यांना मित्र तरी का म्हणावे
आयुष्य असे काही धडे मजला
सहजच शिकवू लागले आहे ||

मान्य ,खुर्चीलाच मान असतो
बाकी तास ओझे वाहणे असते
समोर सन्मान देणारे आता
फोनवर झापू लागले आहे ||

मर्म ठावूक झाले की मग
मांजरानाही वाघबळ येते   
विझलेल्या आगीवर घोडे
कागदाचे नाचू लागले आहे ||

काय कुणाचा किती आहे ते
कधीच पर्वा नव्हती परंतु 
अजून जळला ना स्वयं अहं   
विक्रांतास दिसू लागले आहे ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...