शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

गिरनारी



॥ गिरनारी ॥


एकेक पायरी
चढो तुझा दास
ठेवूनी विश्वास
भेटशील ॥
हर एक क्षण
जावो स्मरणात
पडूनी  पथात
विनवितो ॥
माय बाप तूच
जीवनाचा ध्यास
तुझ्यासाठी श्वास
देही घेतो ॥
करी विनवणी
घाले लोटांगणी
मज निरंजनी
ने गे माय ॥
विक्रांत धरूनी
वाहतो देहास
पदावरी श्वास
सुटो माझा ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

अंधार कसला

अंधार कसला ?

हा अंधार असे कसला
दश दिशात उगा भरलेला
तो स्वर्ग हरवला कुठे
जो माझ्यात मी जपलेला

हे बेफान वावटळ उरी
गगनात धुराळा भरला
शत रात्री नभी सजलेला
तो चंद्र कुठे कोसळला

कुणी म्हणती कातरवेळी
भान सारे हरवून जाते
कणाकणात दाटलेला
मग आकांत असे हा कसला

तो प्रकाश काचा फुटला
मज म्हणे थांबू मी कशाला
का लाटेत हरवून गेला
दीप जलात कुणी सोडला

घे नेत्रात सजवून रात्र 
जगण्यात जीव जर गुंतला
दे जलात सोडून जगणे
स्वप्नास जीव जर विटला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

मृत्यू वरन



मृत्यू वरन
*******::
अखेरचा श्वास माझा
सहजी ओंकार व्हावा
प्राण देहाने स्वतःच
हळू मोकळा करावा

सांडूनिया साचलेले
रिक्त सारे चित्त व्हावे
मी माझेपण बांधले
याद काही न उरावे

मिळताच डोळे आत
जग क्षणात तुटावे
जाणिवेच्या सरितेने
सागरात लीन व्हावे

असो गोड किंवा कडू
बीज मागे न रहावे
मरण्या आधीच इथे
मी त्या मृत्यूस वरावे

येणे जाणे व्यर्थ सारे
इंद्रायणीत बुडावे
मावुलीच्या कुशीत मी
माझ्यावाचून  रिगावे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathiकavita.blogspot.in

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

नवे अर्थ


नवे अर्थ
***********

जेव्हा तुझ्या हिरव्या 
ओल्या डोळ्यातून 
उडतात निळी पाखरे 
नाही कसे म्हणू मी 
माझ्या जीर्ण मनाला 
फुटतात नवे धुमारे 

विझलेल्या आगीला 
स्पर्शताच वारे 
उडाव्यात ठिणग्या 
पेटून निखारे 

तसे जागे चैतन्य 
किर्र काळ्या अंधारात 
अन उमटती क्षणात
प्रकाश गोंदले नक्षत्र चेहरे 

जाणवते मला मी 
जिवंत अजून
जगण्याची उर्मी येई
उरी तरारून
मनातील गाणे येई
आकाश होवून 

 राहतात पथ मागे
आकांत कोंडले
उलगडे स्वप्न तेच 
युगोयुगी पाहिलेले 
भरतात जखमा 
सल जुने मिटतात 
जगण्याला कारण काही 
अर्थ नवे भेटतात 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

कुर्मीच्या दृष्टीने

कुर्मीच्या दृष्टीने


कुर्मीच्या दृष्टीने
पाहते माउली
दुरून सांभाळी
लाडक्यास ॥

तूटू गेले बंध
कानी येई नाद
माय तुझी याद
अंतरात ॥

इवल्या जीवास
इवले अंतर
करण्यास पार
जन्म जाई ॥

विक्रांत जाणीव
कवच फुटता
आठवून रस्ता
धाव घेई ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathijavita.blogspot.in

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

तुला पाहिले




तुला पाहिले

तुला पाहिले
मन भरले
मनात एक
गाणे सजले

किती दूर तू
किती जवळी
पापण्यास या
स्पर्शून गेली

आणि मनाचे
खुळे पाखरू
नभी उडणे
गेले विसरू

तरीही वारे
तया झेलती 
अाणिक तारे
हृदया घेती 

तुझिया डोळी
जग दुसरे
नवे पणात
साकार झाले

आस मिटली
आणि वाढली
पुन्हा जगावे
इच्छा जागली

हृदयवीणा ही
अशी झंकारली
तू माझ्यातील
कंपण झाली

झाले जगणे
शुभ्र फुलांचे
गंध माधवी
जग क्षणाचे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

दत्त खुळी



दत्त खुळी

अनवाणी पावलांनी 
तंद्री लागलेल्या मनानी 
ती भटकते पाऊस पांघरुनी
कृष्णेच्या काठावरती 
उंच उंच घाटावरती 

उभी राहते 
पादुकांसमोर ठाण मांडूनी
पाय रोवूनी 
ओरडणाऱ्या
सुरक्षा रक्षकांकडे 
चक्क दुर्लक्ष करुनी
हट्टी मुलीसारखी 
डोळ्यात पाणी आणूनी

आणि बोलत राहते भरभरुनी
महाराजांविषयी 
शब्दात जीव ओतूनी
तेव्हा तिच्या त्या शब्दातून 
डोळ्यातून 
अन स्वरातून 
ओसंडत असते 
विलक्षण श्रद्धा अन प्रेम 
तो कैफ लागताच
आमच्या रुक्ष पणाला 
या मनाच्या बाभळीही
जातात चंदनी होऊनी 

तशी ती पक्की व्यवहारी 
नीटस संसारी 
पण इथे आली की जाते होऊनी 
आत्ममग्न संन्यासिनी 
अन् मला सारखं वाटत राहते 
तिच्या भोवती 
महाराज नक्कीच आहेत म्हणूनी  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...