रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

आदिशक्ती



आदिशक्ती
*********

सोनेरी बिंदूला
क्षितिज भाळाला
तिने लावियेला
हळुवार ||

केशरी पिंजर
भांगात भरला
मेघांचा बांधला
कचपाश ||

कृपेची किरणे
ओघळती डोळे
रहाट चालले
जगताचे ||

जागी झाली माय
लागली कामाला
उठवी जगाला
निजलेल्या ||

तिला न विसावा
का न ये थकवा
लावली पायाला
युगचक्रे ||

चैतन्याची मूर्ती
आई आदिशक्ती
रचे नवी सृष्टी
क्षणोक्षणी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

नादान मरण



नादान मरण
***********

मला काहीही होणार नाही
या नादान गुर्मीत
वेड्या उधाण मस्तीत
मरून गेलेली ती पोरं
त्यांचे ती निष्प्राण कलेवर
चिंब भिजलेली
पांढरी पडलेली
पावसामुळे

त्यांच्याकडे पाहून हळहळल्या शिवाय
कुणी काही करू शकत नव्हते
शेकडो रात्री आजारात
जागून काढणारी आई
आणि आयुष्य भर
हाडाची काडे करणारा बाप
त्यांना कळत नव्हते
ही शिक्षा त्यांना का मिळाली

शेकडो अपघाती मृत्यूंचा साक्षी मी
पुन्हा व्यापून गेलो
त्याच विषण्ण पराधीनतेच्या जाणीवेनी
विचारांनी हतबल होत

जर मरण हा एक अपघात आहे
तर जन्म आणि जगणेही
अपघातच नसेल का ?
या न सुटणाऱ्या प्रश्नाचे
आवर्त एक होवून
सुन्नपणे होतो बसून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

उलट हा वृक्ष



ज्ञानदेवी चिंतन

ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व सूचित मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचे ॥

मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे । तें चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥

ऐसे भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥ ९१,९२,९३/१५

ब्रह्मतत्त्व आणि माया यांच्या दृढ संबंधांचे आळे तयार होऊन त्यात या वृक्षाची निर्मिती होते. असंख्य देहरूपी अंकूर फुटून त्याचा अपार विस्तार होतो. अशा या संसारवृक्षाचे मूळ (माया) ते वरच्या बाजूस म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी रुजले की फांद्यांचा विस्तार सतत वाढत राहातो…


विश्व-संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा देऊन त्याची निर्मिती आणि विस्तार कसा होतो याचे सविस्तर वर्णन केले आहे...

************


उलट हा वृक्ष कुणी लावियेला
विश्वी जो भरला सर्वथैव ।।
असंख्य आकारी विरुढे अपार
फांदीफांदीवर जगत्रय।।

कुणा न कळला कुणी न तोडला
तयात कोंडला जीव खुळा ।।
परी सोडुनिया हिरवा हव्यास
मुळांच्या शेंड्यास जाता कुणी ।।
सुटते दिसणे वृक्षाचे असणे
मायेचे खेळणे हवेतील।।

परि कळेना ती वृक्ष सळसळ
सापडेल मूळ तया कसे ।।
उरी उपजता काही कळकळ
अज्ञान पडळ कळों येता।।
सापडेल वाट जाणारी ती आत
सरूनिया भ्रांत आकाराची ।।

ज्ञानदेवी कृपे शब्दात दिसले
परि ना कळले अनुभवी ।।
शब्द जागवता होऊनिया स्पर्श
उपजावा हर्ष  स्वानंदाचा।।

विक्रांत शरण अन्यन होऊन
वैराग्य घेऊन येई दत्ता।।
ज्ञानाच्या शस्त्राने टाकी रे खंडून
संसार दारुण अधोवृक्ष  ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

पापाच्या डोंगरी पुण्याचा महाल




पापाच्या डोंगरी पुण्याचा महाल
पाहता कळेल ज्याचा त्याला ||
मातीचा डोंगर मातीचा महाल
परंतु कमाल पाहण्याची ||
घडता घडले रूपी सजविले  
जगा न कळले काही केल्या ||
कुणी वाढवली कुणाला कळली
चिंता सजविली प्रतिमेने ||
उघडले डोळे झाले किलकिले
प्रकाशा बिहाले आवडून ||
अंतरी बाहेरी चाललाय खेळ
विक्रांत केवळ नाव आहे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



सोमवार, ३१ जुलै, २०१७

वृक्ष प्रकाश आणि मी




वृक्ष प्रकाश आणि मी
******************

माझ्या घरात येणारा
प्रकाश अडवून
उभा आहे हा वृक्ष
घनदाट हिरव्या पानांचा

त्याच्या ओल्या फांद्या
ओले काळे खोड
अन ओली गर्द पाने
तृप्तीच्या आनंदाने
डोलत असतात

मला माहित आहे
त्या प्रकाशावर फक्त
माझाच अधिकार नाही
तरीही त्या दाट फांद्या
छाटून टाकण्याचा विचार
मनातून झटकता येत नाही

खरतर माझ्या पेक्षाही
त्यालाच जास्त गरज आहे
त्या प्रकाशाची !
त्याच्या त्या स्वामित्वाचा
अन  अधिकाराचा
मी करताच स्वीकार
सारे घर प्रकाशाने
भरून जाते

काठोकाठ !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २९ जुलै, २०१७

मुखवटा



मुखवटा
********

चेहरा म्हटले की मुखवटा आलाच
किंवा चेहरा हेच मुखवट्याचे
दुसरे नाव आहे
आता कुठला मुखवटा चांगला कुठला वाईट
हे तर पाहणारा ठरवतो
पण मुखवट्याचे खरे काम तर
जे नाही ते दाखवणे असते
आणि मुखवटा लावणारा
त्या मुखवट्याचा निर्माता
हे मनोमन जाणून असतो

पण या मुखवटयाच्या जगात
इतके मुखवटे लावतो आपण की
मुखवटयाविना जगूच शकत नाही आपण
अन हळूहळू मुखवटयावर
इतके प्रेम जडते आपले
की आपला खरा चेहराच  
विसरून जातो आपण
कधी कधी असा प्रश्न पडतो  
खरा चेहरा तरी आहे का आपल्याला ?
अन ज्याला आपण आपला खरा चेहरा  म्हणतो
तो ही
आपल्याला फसवणारा
एक मुखवटाच असेल तर ?

डॉ विक्रांत प्रभाकर  तिकोणे
htttp://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २७ जुलै, २०१७

रिकामी ओंजळ




उगाच या वाटा
पायास फुटती
क्षितिजी खिळती
आखलेल्या ||
डोळ्यांची बाहुली
भिरभिरे डोही
खोल किती काही
कळेचिना  ||
नभी उगवले
नक्षत्र तुटले
रंग उधळले
जळतांना ||
पुन्हा वादळाने
बांधले मनाला
जाहला पाचोळा
अंकुराचा ||
काय सांगू सखी
रिकामी ओंजळ
मोत्यांची उधळ
मागू नको ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...