रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

आत्मराज







दत्त नाम घेता प्रेम दाटे उरी 
सुख डोळ्यादारी ओघळते ||
जिवलग माझा जीवाचा तो जीव
स्वानंदाची ठेव आत्मराज ||
जन्म चालवितो संकटी रक्षितो
पाठीशी राहतो सदोदीत  ||
मागीतल्यावीन दिधले अपार
जगण्याचे सार दावियले ||
तयाचा मी ऋणी आहे जन्मोजन्मी
काया ओवाळूनी टाकीयली ||
दयाळा कृपाळा विक्रांता सांभाळा
धरावे हाताला आजन्म या  ||


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in



जन्म सापडत नाही











जन्म सापडत नाही 
.
रातराणी गंध आता
मनी उमलत नाही
रंगविली स्वप्न जुनी
आता आठवत नाही

दूरवर नजरेत
सखी दु;ख पेटलेले
आतड्यात भूक अन
जन्म सापडत नाही

जीवनास माझे म्हणू
ठेवू किंवा कोपऱ्यात
गोठलेल्या वेदनेस
काही समजत नाही

कालचेच गाणे जरी
सुर हरवले आज
फुंकूनही प्राण शब्दी
अर्थ उमटत नाही

हरवली दिशा अन
दुरावली साथ तुझी
भोवताली रात दाटे
सोबतीला हात नाही

ध्यास जरी सराईचा
वाट हि सरत नाही
जडावले पाय अन
गाव ही दिसत नाही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

मन मी अन भास









माझे असणे माझ्या मनात
माळ खुळखुळे या गळ्यात
माझे नसणे माझ्या मनात
मान मोकळी हार मळ्यात

मी आकाशी झालो तारांगण
मी धुळीत असे इवला कण
मी उगवले हिरवे पान
मी वणवा जाळतो हे रान

मन निजता देह निजतो
सारे माझेपण शून्य खातो
जाग येताच क्षणी पाहतो  
तो पाहणारा कोण असतो

एक जाणीव भरे आकाश
एक किरण पाडे प्रकाश
मन कुठले मग तयास
फक्त आहे हेच बाकी भास


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in


वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...